video : अवतरली शिवशाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

फुलांनी आकर्षक सजावट केलेला जिजाऊ शहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ... एकापाठोपाठ येणारे सरदार घराण्यांचे रथ... रणरागिणी व मावळ्यांची चित्तथरारक तलवारबाजी, दांडपट्टा आणि साहसी खेळ... तुतारीचा घुमणारा निनाद... छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा शिवभक्तांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांमुळे हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या वातावरणात शिवजयंती महोत्सवाची रंगत वाढली.

पुणे -  फुलांनी आकर्षक सजावट केलेला जिजाऊ शहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ... एकापाठोपाठ येणारे सरदार घराण्यांचे रथ... रणरागिणी व मावळ्यांची चित्तथरारक तलवारबाजी, दांडपट्टा आणि साहसी खेळ... तुतारीचा घुमणारा निनाद... छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा शिवभक्तांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांमुळे हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या वातावरणात शिवजयंती महोत्सवाची रंगत वाढली.
 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १९) ‘शिवजयंती महोत्सव समिती’तर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याची भव्य मिरवणूक जल्लोषात काढली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सुनेत्रा पवार, संगीतकार अजय -अतुल, उद्योजक पुनीत बालन, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, आमदार दिलीप  मोहिते, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, संग्राम थोपटे, संजय जगताप, भीमराव तापकीर उपस्थित आदी होते. 

फुलांनी सजलेले रथ, तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिकृती, सरदार तानाजी मालुसरे यांचा गोल फिरणारा पुतळा यासह महाराणा प्रताप, श्री शिवछत्रपती, छत्रसाल बुंदेला यांच्या मूर्ती असलेला स्वराज्यरथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौकात रथांचे शिवभक्तांनी उत्साहात स्वागत केले. फुलांची व रंगबिरंगी कागदांची उधळ करून शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा शिवभक्‍तांनी दिल्या. औरंगासुरमर्दिनी भद्रकाली रणरागिणी, महाराणी ताराराणी शौर्य पथक यांनी लाठीकाठ्या, तलवारबाजी, दांडपट्टा यासह युद्धकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बाल शिवाजीचा सहभाग लक्षवेधी ठरला. शिवगर्जना ढोल-ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.

सहकुटुंब पारंपरिक वेशात 
लहान मुलांना घेऊन नागरिक सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुरुष फेटा, झब्बा, पायजमा, तर महिला नऊवारी साडी नेसून नटूनथटून मिरवणुकीत सहभागी झाल्या. दोन- अडीच वर्षांच्या मुलांपासून अनेक मुले बाल शिवाजीच्या वेशात सहभागी झाली. या मुलांसोबत सेल्फीसाठी शिवभक्तांची लगबग सुरू होती.

आठव्या वर्षी ८५ रथ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत शौर्य गाजविणाऱ्या सरदारांच्या वंशजांनी आठ वर्षांपूर्वी महोत्सवाला सुरुवात केली. पहिल्या वर्षी सात रथ मिरवणुकीत होते. यंदा ही संख्या ८५ वर पोचली आहे. जिजाऊ शहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे यांसह अन्य सरदार घराण्यांचे रथ मिरवणुकीत होते.  

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
‘एसएसपीएमएस’ शाळेच्या प्रांगणातील श्री शिवछत्रपतींच्या जगातील पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यावर ईशान गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तेव्हा महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. 

शिवजयंती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti in pune