शिवसेनेचा पहिला शत्रू राष्ट्रवादीच - विनायक राऊत

शिवसेनेचा पहिला शत्रू राष्ट्रवादीच - विनायक राऊत

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी तब्बल पंचवीस वर्षांनंतर भारतीय जनता पक्ष-शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. युती तुटल्याने ज्यांच्या मनांत आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो, आमचा पहिला शत्रू राष्ट्रवादी कॉंग्रेसच असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ठणकावले. प्रचारासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीन ते चार सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

भाजपबरोबरची युती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने पक्षाची भूमिका मांडली. निवडणुकीत आपला पहिला शत्रू कोण?, याचे उत्तर देताना राऊत म्हणाले, 'भाजपशी युती न करण्याच्या निर्णयाने ज्यांच्या मनांत आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, त्यांना आमचे सांगणे आहे. आमचा पहिला शत्रू राष्ट्रवादी कॉंग्रेसच असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजवर केलेल्या भ्रष्टाचारामुळे आम्ही त्यांच्याबरोबर कदापि जाणार नाही. स्थानिक विकासाचे प्रश्‍न घेऊन आम्ही जनतेसमोर जात असताना राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार, त्यांची गुंडगिरी जनतेपुढे आणणे हा आमच्या प्रचाराचा मुद्दा असेल.''

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात "पंचवीस वर्षांत शिवसेना सडली' असा जो उल्लेख केला, त्यातच सर्वकाही आले. युतीमुळे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला हे उद्धवसाहेबांनाही मान्य आहे. कार्यकर्त्यांची घुसमट त्यांना दिसत होती; पण युतीमुळे आमचे हात बांधलेले होते. युती न करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यात सर्वत्र शिवसैनिकांत जो उत्साह निर्माण झाला, तो आमच्या अपेक्षेपेक्षा मोठा आहे. शिवसेनेचा भगवा आता प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात पोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच महापालिका असो, की जिल्हा परिषद निवडणूक पक्ष सर्व ठिकाणी पोचणार आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला आजच्या परिस्थितीत 45 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करून राऊत म्हणाले, 'शहरात पहिल्यांदाच शिवसेना हा एकमेव एकसंध पक्ष दिसतो आहे. कार्यकर्त्यांत व नेत्यांत समन्वय दिसत आहे. भाजपमध्ये राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर "इन्कमिंग' झाल्याने तेथे जुन्या-नव्यांचा वाद रंगला आहे. गळतीमुळे राष्ट्रवादी हैराण झाली आहे. आज आम्हाला 45 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात तीन ते चार सभा होणार आहेत. त्यानंतर वातावरण संपूर्णपणे बदललेले असेल. या जागांमध्ये निश्‍चित वाढ होईल.''

राष्ट्रवादी कॉंग्रेसला या वेळी सत्तेवरून पायउतार व्हावेच लागेल, असे सांगून राऊत यांनी शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या असतील, असा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेच्या मनातून उतरली आहे. भाजपने इतके दिवस त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा केला; पण निवडणूक जवळ येताच भाजप गप्प बसला आहे; पण आम्ही प्रचारातून राष्ट्रवादीच्या प्रकरणांचे वस्त्रहरण करू.''

शिवसेनेची अंतिम यादी उद्या
निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाबरोबर जायचे? सत्तेत राहायचे की विरोधात बसायचे? याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. शिवसेनेला सर्व म्हणजे 32 प्रभागांत उमेदवार मिळाले आहेत. आमच्या उमेदवारांची अंतिम यादी सोमवारी (ता. 30) पक्षप्रमुख जाहीर करतील, असे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com