Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

पुणे शहरात भाजपने शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. तर पिंपरीतील एकमेव जागा आणि जिल्ह्यातील पुरंदर, खेडची जागाही धोक्यात आली आहे. जुन्नरमध्येही राष्ट्रवादीची हवा आहे. सेनेच्या या चारही जागा सध्या घोक्यात असल्याची चिन्हे आहेत. निकालात तसे झाल्यास शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल.

पुणे : पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून 3 आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेला यंदा अस्तित्वाची लढाई लढावी लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहे. भाजपने वाचविले तर तरेल अन्यथा शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल, अशी चिन्हे आहेत. 

शिवसेनेचे पुरंदरमध्ये विजय शिवतारे, खेड- आळंदीमधून सुरेश गोऱ्हे आणि पिंपरीमध्ये गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. मनसेच्या उमेदवारीवर जुन्नरमधून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

पुरंदरमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवतारे यांच्या समोर काँग्रेसचे संजय जगताप यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा शिवतारे यांच्या अंगलट येईल, अशी चर्चा आहे. 

खेडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार गोऱ्हे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यातच भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख रिंगणात आहेत. गोऱ्हे आणि देशमुख यांच्या मतविभागणीत मोहिते निसटून विजयी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पिंपरीमध्ये सेनेचे विद्यमान आमदार चाबुकस्वार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात सिंधी समाज हा बनसोडे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपचेही कार्यकर्ते चाबुकस्वार यांच्याबद्दल नाराज असल्याने ते निष्क्रिय होते, असे सांगण्यात येत आहे. तसे असेल तर बनसोडे यांचे पारडे जड असेल. 

पुणे शहरात भाजपने शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. तर पिंपरीतील एकमेव जागा आणि जिल्ह्यातील पुरंदर, खेडची जागाही धोक्यात आली आहे. जुन्नरमध्येही राष्ट्रवादीची हवा आहे. सेनेच्या या चारही जागा सध्या घोक्यात असल्याची चिन्हे आहेत. निकालात तसे झाल्यास शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल आणि त्याचे दूरगामी परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होतील, अशी चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena may be loss all three seats in Pune District in Maharashtra Vidhan Sabha 2019