भोरमध्ये "प्रतिनिधी बदला; परिस्थिती बदला' यात्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

शिवसेनेच्या वतीने भोर विधानसभा मतदारसंघात "प्रतिनिधी बदला; परिस्थिती बदला' यासाठी जनजागृती पदयात्रेची सुरवात रविवारी (ता. 25) सकाळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्‍वर पठारावरील शंभूमहादेवाच्या मंदिरात अभिषेक करून या पदयात्रेची सुरवात करण्यात आली.

भोर (पुणे) : शिवसेनेच्या वतीने भोर विधानसभा मतदारसंघात "प्रतिनिधी बदला; परिस्थिती बदला' यासाठी जनजागृती पदयात्रेची सुरवात रविवारी (ता. 25) सकाळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्‍वर पठारावरील शंभूमहादेवाच्या मंदिरात अभिषेक करून या पदयात्रेची सुरवात करण्यात आली.

शिवसेनेकडून पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधून मतदारसंघात असलेल्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. मतदारसंघातील न झालेली विकासकामे आणि अनुत्तरीत प्रश्‍न याबाबत परिवर्तन गीते व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. पदयात्रेच्या पहिल्या दिवशी आंबवडे खोरे, वीसगाव खोरे व भोर शहरात जनजागृती करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 1 सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 ते 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 7 या वेळेत भोर व वेल्हे तालुक्‍यांतील सर्व गावांमधून पदयात्रा जाणार आहे. 5 ते 9 सप्टेंबरदरम्यान पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याचे आयोजक अमोल पांगारे यांनी सांगितले. आम्हाला तालुक्‍यातील युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी सांगितले.

रविवारी माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या हस्ते रायरेश्‍वरावरील शंभू महादेवाला आणि आंबवडे येथील नागेश्‍वरास अभिषेक केल्यानंतर जनजागृती पदयात्रेस सुरवात झाली. या वेळी शिवसेनेचे विधानसभा सहसंपर्कप्रमुख मिलिंद हांडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर शिंदे, दीपक बर्डे, मुळशीचे तालुकाप्रमुख दादा मोहोळ, वेल्ह्याचे शैलेश वालगुडे, अमोल पांगारे, निशा सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, युवासेनेचे केदार देशपांडे, युवराज जेधे, नारायण कोंडे, हनुमंत कंक उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Yatra