एसटी महामंडळाच्या 'शिवशाही'चा एसी बंद

सोमवार, 28 मे 2018

उन्हाळा असल्याने शिवशाहीने प्रवास करायला गेलो आणि मनस्ताप झाला. गरजेच्या वेळी एसटीच्या हेल्पलाईन कडूनही मदत मिळत नाही. एसटी महामंडळाने अशा बसमधील एसी बंद झाल्यावर व्हेंटिलेशनसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सोय केली पाहिजे तसेच असा एखादा प्रसंग उद्भवलाच तर प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैसे परत केले पाहिजेत आणि झालेल्या गैरसोयीची भरपाई म्हणून पुढचा एक प्रवास फ्री दिला पाहिजे. 
- मंदार अडकर 

पुणे- 'एसटी प्रवास- सुखाचा प्रवास' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवाशांना दर्जेदार व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाकडून शिवशाही बस सुरु करण्यात आली मात्र या सेवेला सुरवातीपासूनच ग्रहण लागले. शिवशाहीचा प्रवास आरामदायी होण्याऐवजी त्रासदायक होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. शिवशाहीच्या बंद एसीचा वाईट अनुभव पुण्याचे रहिवाशी मंदार अडकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केला. 

'उन्हाळा असल्याने एसी बस चांगली म्हणुन त्यांनी शिवशाहीने जाण्याचे ठरवले. परंतु नाशिकहुन निघाल्यानंतर दीड तासातच एसी बंद पडला. प्रवाशांनी विनंती केल्यानंतर रस्त्यावर असलेल्या गॅरेजमध्ये गाडी नेण्यात आली परंतू तेथेही काम होऊ शकले नाही. त्यामुळे तशीच ही बस पुण्यात आणण्यात आली. जवळ जवळ अडीच तास बसमधल्या अबाल वृद्धांचे भयानक उकाड्याने अतोनात हाल झाले. दरम्यान मदतीसाठी एसटी महामंडळाच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र 20 मिनिटे फक्त त्यांची जाहिरात ऐकायला मिळाली, मदत मिळालीच नाही', असे मंदार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.

मंदार अडकर यांची संपुर्ण फेसबुक पोस्ट-

शिवशाही 'एसी' बस असल्याने खिडकी उघडत नाही. बसच्या छताला दोन व्हेंट देण्यात आले आहेत मात्र त्यातुनही पुरेशी हवा येत नाही अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अशाप्रकारची अडचण उद्भवल्यास त्याला पर्यायी व्यवस्था देण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सध्या राज्यभरात 2000 शिवशाही बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एसटी महामंडळाच्या स्वतःच्या 500 गाड्या आहेत तर खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या 1500 गाड्या आहेत. 

(एसटी महामंडळाच्या 'शिवशाही' बसचा तुम्हालाही असा अनुभव आला आहे का?  असल्यास webeditor@esakal.com आम्हाला वर पाठवा)

 

Web Title: shivshai bus ac not working facebook post gone viral