
हुशार असणे म्हणजे फक्त ढीगभर गुण मिळवणे नाही. हुशार असणे म्हणजे फक्त इंजिनिअर आणि डॉक्टर होणे नाही.
मैदान गाजवत श्रुतीने मिळवले ९१ टक्के गुण
पुणे - हुशार असणे म्हणजे फक्त ढीगभर गुण मिळवणे नाही. हुशार असणे म्हणजे फक्त इंजिनिअर आणि डॉक्टर होणे नाही. मेंदू सोबतच मन आणि मनगटही भक्कम करते तेच खरे शिक्षण! याची पुरेपूर जाणीव झालेल्या श्रुती मनीष नीता महाबळेश्वरकर या जिगरबाज क्रिकेटपटूने दहावीच्या परीक्षेच्या पिचवर सुद्धा गुणांचा पाऊस पाडला. क्रिकेटचे मैदान गाजवताना तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१ टक्के गुण मिळवले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारतीय सलामीवीर स्मृती मानधना, अशा दिग्गज खेळाडूंकडून प्रेरित झालेली श्रुती ही अवघी १६ वर्षांची आहे. ती वेगवान गोलंदाज असून महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाचे तिने प्रतिनिधित्व केले आहे.
पुण्याच्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ती शिकते. परंतु शाळेच्या चार भिंती पेक्षा ती क्रिकेटच्या मैदानावरच जास्त रमलेली असते. आई, वडीलांच्या शैक्षणिक अपेक्षा आणि अभ्यासाच्या दबावाला न जुमानणाऱ्या व क्रिकेटच्या मैदानावर असे कितीतरी आउट-नोटाउट पचविलेल्या श्रुतीला मात्र आपल्या यशाची पक्की खात्री होती.
बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर अभ्यासाची पुस्तके बाजूला सारून, ४ ते ७ मार्च या कालावधीत, ती राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरली आणि ही स्पर्धा तिने आणि तिच्या संघाने गाजवून सोडली. त्यांनी ही स्पर्धा नुसती गाजवलीच नाही, तर तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा पटकावले. पाच वर्षांपासून क्रिकेट शिकत असलेल्या श्रुतीला, या खेळाची आवड तिची मावशी सीमा रगडे (क्रिकेटपटू) यांच्यामुळे जडली. आता तिने या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करत असताना शैक्षणिक प्रगतीचे झेलही यशस्वीपणे झेलले आहेत. परंतु, पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे महिलांच्या क्रिकेटला भारतात अजूनही पुरेशी प्रसिध्दी मिळत नाही व त्याचा परिणाम महिला खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा व संधींवर होत असल्याची खंतही तिने यावेळी बोलून दाखवली आहे.
थोडासा पण मनापासून केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, त्यामुळेच क्रिकेट सोबतच दहावीच्या खेळपट्टीवरही मी चमकले. भारतासाठी क्रिकेट खेळपट्टीवर घाम गाळणे हे आता माझे अंतिम ध्येय आहे व त्यासाठी मी कठोर मेहनत घेणार आहे.
- श्रुती महाबळेश्वरकर, युवा क्रिकेटपटू
Web Title: Shruti Mahabaleshwarkar Ssc Exam Result Success Cricket Player
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..