छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर ग्रामस्थांकडून अशा प्रकारे अभिवादन... 

शरद पाबळे
Thursday, 14 May 2020

कोरोनाच्या सावटामुळे तुळापुरात (ता. हवेली) आज ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्त निवडक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजाभिषेक करून राजांना अभिवादन केले. 

कोरेगाव भीमा (पुणे) : कोरोनाच्या सावटामुळे तुळापुरात (ता. हवेली) आज ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्त निवडक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजाभिषेक करून राजांना अभिवादन केले. 

कोरोनाची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने लढूयात...

छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्ताने तुळापुरात शंभूभक्त व अनेक मान्यवरही येत असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्याने या पुढील सर्व कार्यक्रम रद्द करावेत आणि स्थानिक पातळीवर फक्त धार्मिक पूजाविधी करावेत, शंभूभक्तांनी गर्दी टाळावी, असे आवाहन पुण्यतिथीच्या वेळीच पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्याचवेळी पुढील सर्वच कार्यक्रम रद्द करून समाधिस्थळी दर्शनही बंद करण्यात आले आहे. तसेच, संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करीत पोलिसांनी येथील प्रवेशद्वारेही बंद ठेवली आहेत. केवळ दैनंदिन पूजाविधी मात्र सुरू ठेवण्यात आले आहेत. 

पुणेकरांनो, हा आलेख सांगतोय, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे

आज छत्रपती श्री संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे सरपंच रूपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत, माजी सरपंच गणेश पुजारी, माजी उपसरपंच संतोष शिवले, योगेश शिवले आदी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर फक्त धार्मिक पुजाभिषेक करून राजांना अभिवादन केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या वेळी राजांच्या जयजयकारासह घोषणाही देण्यात आल्या. भीमा, भामा व इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात असलेला हा परिसर नेहमीच शंभूराजांच्या पुण्यतिथी, जयंती व राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शिवशंभूभक्तांचा गजबजाट व "जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो,' अशा जय जयकाराने अक्षरशः दणाणून जातो. मात्र, सध्या हा परिसर पूर्णपणे शांत आहे. 

स्वराज्य रक्षणासाठी रणांगणात शौर्य गाजवत अखेरच्या श्वासापर्यंत लढलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा प्रत्येक शंभुभक्ताला सार्थ अभिमान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यःस्थितीत कार्यक्रम स्थगित करावे लागले असले, तरीही राजांचे प्रेरणादायी आदर्श विचार शंभूभक्तांना नेहमीच ऊर्जा देत राहतील. कोरोना संसर्गाचा धोका संपल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच राजांचे कार्यक्रम उत्साहात साजरे करू. 
- रूपेश शिवले
सरपंच, तुळापूर (ता. हवेली)  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simply celebrate Chhatrapati Sambhji Maharaj Jayanti program at Tulapur