खडकवासला धरण साखळीतील चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasala-dam

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

खडकवासला - पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चारही धरणातून विसर्ग सुरू आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून पाच हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

टेमघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. या तिन्ही धरणातून मिळून खडकवासला धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी १० हजार २४६ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून आत्तापर्यंत ११ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.

टेमघरच्या सांडव्यावरील मनमोहक दृश्य

टेमघर धरण शुक्रवारी पहाटे पूर्ण भरल्याने भरून वाहू लागले. धरणाच्या उंच दोनशे फूट सांडव्यावरून पाणी खाली वाहत येत असल्याचे सुंदर मनमोहक दृश्य दिसत आहे.

टेमघर धरणातून सकाळी १०० क्यूसेकचा विसर्ग सुरू झाला आहे. टेमघरच्या खालील गावातील नागरिकांनी तसेच नदीलगतच्या शेतकऱ्यांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.

सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सज्ज राहावे. नदीपात्रात वाहने लावू नयेत, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.

Web Title: Simultaneous Water Release From All Four Dams In Khadakwasla Dam Chain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :waterKhadakwasala Dam