जिल्हयात पावसाचे दमदार पुनरागमन,भातरोपांना दिलासा,

जिल्हयात पावसाचे दमदार पुनरागमन,भातरोपांना दिलासा,
Published on

सिंधुदुर्गात पावसाचे दमदार पुनरागमन; भातरोपांना दिलासा
--
अकरा दिवसांच्या खंडानंतर मुसळधार सरी; दुबार पेरणीचे संकट टळले
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : तब्बल अकरा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात रविवारी (ता. २१) पावसाचे पुनरागमन झाले. त्यानंतर सोमवारी (ता. २२) सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या सुमारे तीन हजार हेक्टरवरील भातरोपवाटिकांना मोठा दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकटही टळले आहे.

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस समाधानकारक पाऊस झाला. मात्र १० जूनपासून पावसाने दडी मारल्याने भात लागवडीसमोरील अडचणी वाढल्या. पावसाचा अभाव आणि कडक उन्हाचा तडाखा यामुळे सुमारे तीन हजार हेक्टरवरील भातरोपवाटिका धोक्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी अपेक्षित उगवण झाली नव्हती, तर काही भागांत रोपे वाळण्याच्या स्थितीत पोहोचली होती.

परिस्थिती गंभीर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोपे वाचविण्यासाठी कृत्रिमरीत्या पाणी देण्यास सुरुवात केली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी दुष्काळाच्या चर्चेमुळे अधिकच चिंतेत होते.

दरम्यान, शनिवारी (ता. २१) सायंकाळपासून वातावरणात बदल जाणवू लागला. काही भागांत रात्री हलक्या सरी झाल्यानंतर रविवारी दुपारनंतर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, देवगड, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांतील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. घाटमाथा व घाटपायथ्याच्या परिसरात दमदार सरी कोसळल्या.

सोमवारी सकाळपासून जिल्हाभर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या भातरोपवाटिकांना जीवदान मिळाले असून रखडलेली शेतीची कामे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पेरणीनंतर जमिनीतील ओलावा पूर्णपणे कमी झाल्याने नांगरणीची कामे थांबली होती. नव्या पावसामुळे शेतकऱ्यांना ती पुन्हा सुरू करता येणार आहेत. मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

२४ जूनपर्यंत येलो अलर्ट

जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी (ता. २२) विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २३ आणि २४ जून रोजीही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी २४ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

छायाचित्र ओळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने भातरोपवाटिकांना दिलासा मिळाला आहे. वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील भातरोपवाटिकेत पावसाचे पाणी साचल्याचे चित्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com