सिंहगड पर्यटकांना खुणावतोय, पण... 

पूजा ढेरिंगे
बुधवार, 31 जुलै 2019

पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

पुणे - पावसाळा सुरू होताच पुणेकरांना सिंहगड खुणावू लागतो. मग आपसुकच पावले गडाकडे वळतात... आणि मग गर्दी, पार्किंगची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडीमुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

गर्दीमुळे गडावरील अपुऱ्या सोयीसुविधांवर ताण येत आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी मे महिन्यात सुमारे २७ हजार पर्यटक गडावर आले होते. तर पावसाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत वाढ होऊन जून महिन्यात ही संख्या ६३ हजारांवर पोचली. त्यात शनिवारी-रविवारी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. गडावर दीड हजार वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असून, दैनंदिन येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे दुप्पट आहे. पार्किंग क्षमतेच्या अधिक वाहने येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगेत तासन्‌तास उभे राहण्यापेक्षा पर्यटक रस्त्यावरच वाहने लावतात. 

पर्यटकांच्या सोयीसाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी वन विभागाने घाट रस्त्याची दुरुस्ती केली. परंतु छोटे संरक्षक कठड्यांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने गडावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीची शक्‍यता आहे. पर्यटकांना उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. दरम्यान, महिन्याला लाखो रुपयांचा पर्यटक निधी वन विभागाला मिळतो. परंतु कामांची पूर्तता होत नसल्याची खंत गिर्यारोहक आणि स्थानिक संस्थांनी व्यक्त केली. गडावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती बिकट आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महिला स्वच्छतागृहात सुविधा नाहीत. सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी नाही. यासंदर्भात पर्यटकांनी तक्रारी केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

पर्यटक निधी सिंहगड घेरा समितीला जातो. मात्र त्याचा वापर सुविधांसाठी होत नाही. सद्यःस्थितीला सिंहगडावर कुठलीही नवी सुधारणा पाहायला मिळत नाही, या निधीचे काय होते, हा प्रश्‍नच आहे. 
- प्रतीक हेसी, गिर्यारोहक 

सिंहगड वनविभाग, सिंहगड घेरा समिती, पर्यटन आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे सिंहगडाची शान आणि पावित्र्य धोक्‍यात येत आहे. 
- महेश पवळे,संस्थापक, राजे शिवराय प्रतिष्ठान

घाट रस्त्यातील संरक्षक कठड्याची समस्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करू. रुग्णवाहिकेची सुविधाही आठवडाअखेरीस सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
- मधुकर तेलंगे, सहायक वन संरक्षक अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhagad fort issue