esakal | सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

sinhagad fort little girl was tortured accused arrested Raigad

कुरण खुर्द (ता. वेल्हे जिल्हा पुणे) येथे आपल्या घरासमोर खेळत असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील दोन वर्षांच्या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने रिक्षातून अपहरण केले होते.

सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी Pune News : सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस मालखेड-थोपटेवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह मिळालेल्या दोन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे व त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संजय बबन काटकर (वय 38, रा.  कादवे ता. वेल्हे, जि.पुणे) या नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून सिंहगड परिसर सुन्न झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

15 फेब्रुवारी रोजी पानशेत जवळील कुरण खुर्द (ता. वेल्हे जिल्हा पुणे) येथे आपल्या घरासमोर खेळत असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील दोन वर्षांच्या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने रिक्षातून अपहरण केले होते. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीला मालखेड परिसरात घेऊन आल्याचे समजताच वेल्हे व हवेली पोलिस ठाण्याकडून कसून शोधकार्य सुरू होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख हे स्वतः मलखेड परिसरात 16 फेब्रुवारी रोजी तपासावर लक्ष ठेवून होते. श्वानपथक व पुणे ग्रामीण पोलीस दलातील शेकडो पोलीस कर्मचारी मालखेड व आजूबाजूचा परिसर पिंजून काढत असताना मालखेड-थोपटेवाडी रस्त्यावरील पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्या शोधासाठी वेल्हे, हवेली, राजगड, भोर आणि पौड पोलिस ठाण्यांची मिळून एकूण अकरा तपास पथके तैनात करण्यात आली होती.

आणखी वाचा - पुण्यातल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या 70 लाखांच्या नेटवर्किंगची चोरी

घटना घडल्यापासून फरार असलेला संशयित आरोपी नाटे (ता. महाड जि. रायगड) येथील एका वीट भट्टीवर लपून बसलेला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी संजय बबन काटकर यास अटक केली आहे. आरोपीने क्रूर कृत्याची कबुली दिली असून, याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास करण्यात आला. आरोपीला 60 तासांत अटक करण्यात आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण