सिंहगड घाट रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सिंहगड घाट रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी

सिंहगड : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आज सिंहगडावर तुफान गर्दी झालेली दिसून आली. सिंहगडाच्या घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्यापासून गडावरील गाडीतळापर्यंत वाहणांच्या रांगा लागल्याने पर्यटकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. घाट रस्त्यावर पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेले असताना हवेली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस गडाच्या पायथ्याशी पावत्या करण्यात तर वन समितीचे कर्मचारी उपद्रव शुल्क गोळा करण्यात व्यस्त असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत होते.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रविवारी सिंहगडावर सरासरीपेक्षा अधिक पर्यटक येण्याची शक्यता 'सकाळ' ने अगोदरच वन विभाग व हवेली पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली होती. दर रविवारी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अनुभव लक्षात घेता या रविवारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज होती ; मात्र दुर्दैवाने प्रशासनाने घाट रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना न केल्याने पर्यटकांना मोठे हाल सहन करावे लागले. दोन ते तीन तास पर्यटकांना वरही जाता आले नाही व वळून मागेही फिरता आले नाही.

प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची मनमानी......... एका बाजूला घाट रस्त्यावर पायी चालणे अवघड झालेले असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसले. घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर वाहतूक बंद केलेली असताना वन अधिकारी व वन समितीच्या कर्मचाऱ्यांना न जुमानता हे प्रवासी वाहन धारक जबरदस्तीने वाहने घेऊन जात होते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांच्या दडपशाहीपुढे वन अधिकारीही हतबल असल्याचे दिसत होते.

घाट रस्त्यावरील चित्र

•कोंढणपूर फाट्यापासून सिंहगडावरील गाडीतळापर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा.

•रस्त्याच्या कडेने अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी, चारचाकी वाहने.

•अरुंद रस्त्यामुळे वाहने एकमेकांना खेटत असल्याने पर्यटकांमधे शाब्दिक बाचाबाची.

•वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी ना पोलीस ना वन विभागाचे/वन समितीचे कर्मचारी.

•पायी चालणेही कठीण. लहान मुले,वयोवृद्धांचे हाल.

•घाट रस्त्यावर वाहनांच्या क्लच प्लेटचा वास. अनेक वाहनांतून धूर येण्याच्या घटना.

•काही पर्यटकांचा वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार.

"खुप वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडलो. गर्दी एवढी आहे की माघारी जाता येईना. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणीही दिसत नाही. प्रशासनाने पर्यटकांचे हाल कमी करण्यासाठी नियोजन करायला हवे."

कुणाल बिऱ्हाडे, पर्यटक.

"वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळीच सिंहगडाकडे पाठविले होते. मी स्वतःही वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिंहगड घाट रस्त्यावर चाललो आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे."

निरंजन रणवरे, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Web Title: Sinhagad Ghat Road Traffic Jam Severe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..