esakal | स्थानिकांना विश्वासात घेऊन सिंहगडाचा जीर्णोद्धार करणार : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड

"स्थानिकांना विश्वासात घेऊन सिंहगडाचा जीर्णोद्धार करणार"

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगडावरील स्थानिक रहिवासी, किरकोळ विक्रेते व इतर व्यावसायिक यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय न होऊ देता शास्त्रीय पद्धतीने सिंहगड किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. वनविभाग, पुरातत्त्व विभाग, जिल्हा परिषद व पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड किल्ल्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगडावरील पुणे दरवाजा, छत्रपती राजाराम महाराज समाधी, तान्हाजी कडा, कल्याण दरवाजा, देवटाके या ठिकाणांची पाहणी करून उपवनसंरक्षक राहुल पाटील व सिंहगड अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी स्थळी पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगडाच्या नियोजित विकासाबाबत माहिती दिली.

हेही वाचा: मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सिंहगडावर मोठ्या प्रमाणात बकालपणा वाढला आहे. काहींनी अतिक्रमण केलेले दिसून येत आहे. मूळ रहिवासी व व त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेविषयी माहिती घेण्याचे वन विभागाला कळविले आहे. अतिक्रमण आढळल्यास ते कोणाचेही असो काढण्यात येणार आहे. सिंहगड किल्ला पर्यटक व इतिहास प्रेमींना ऐतिहासिक वैभवाप्रमाणे पाहता, अनुभवता व ऐकता यावा म्हणून सर्व सुविधा करण्यात येणार आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. किल्ल्यावरील ऐतिहासिक बांधकामाची दुरुस्ती करताना सिमेंट कॉंक्रीटचा वापर न करता जुन्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. जे चालू शकत नाहीत अशा पर्यटक किंवा इतिहास प्रेमींना सिंहगड अनुभवता यावा म्हणून रोप-वे चाही विचार सुरू आहे."

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्ते वन विभागाने वन्यप्राण्यांच्या बचावासाठी तयार केलेल्या शीघ्र कृती दलाच्या (आर.आर.टी) वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर वनविभागाने उभारलेल्या 'माझा सिंहगड माझा अभिमान' या प्रतीकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पुणे पुरातत्व विभागाचे उपसंचालक विलास वाहाणे, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघ ग्रामीण चे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, माजी उपमहापौर दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके यांसह अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ई-बस मधून उपमुख्यमंत्री सिंहगडावर...

सिंहगडावर जाण्या-येण्यासाठी पुढील काळात खाजगी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटक व इतिहास प्रेमींसाठी ई-बसची सोय करण्यात येणार आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी आज करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख , उपवनसंरक्षक राहुल पाटील व पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यासह सिंहगड पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी चौकातून पुढे सिंहगड किल्ल्यापर्यंत ई-बसने प्रवास केला.

पुढील आठवड्यात सिंहगड सुरू करायचा की नाही याबाबत विचार...

सिंहगड किल्ल्यासह जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे व गड किल्ले खुले करायचे की नाही याबाबत आठ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी मास्क वापरुन इतर खबरदारी घ्यायला हवी असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

जिल्हा परिषद व एमटीडीसीच्या गेस्ट हाऊस बाबत नाराजी...

जिल्हा परिषदेने उभारलेल्या गेस्ट हाउस विषयी व काहीच महिन्यांपूर्वी पर्यटन विकास महामंडळाने उद्घाटन केलेल्या पर्यटक निवासाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. गडाच्या ऐतिहासिक वैभवाला साजेसे बांधकाम असायला हवे असे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने उभारलेल्या गेस्ट हाऊसचे उद्घाटन आपल्याच हस्ते झाल्याची खंतही उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलून दाखवली.

loading image
go to top