सिंहगड रस्ता : पर्यायी मार्गावरील प्रवासही खडतर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड रस्ता : पर्यायी मार्गावरील प्रवासही खडतर!

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्याला पर्यायी मार्ग म्हणून कॅनॉल रस्ता तयार केला आहे.

सिंहगड रस्ता : पर्यायी मार्गावरील प्रवासही खडतर!

पुणे - सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने त्याला पर्यायी मार्ग म्हणून कॅनॉल रस्ता तयार केला आहे. पण या अरुंद रस्त्यावर वडगावकडे जाणाऱ्या महात्मा बसवेश्वर चौकात फेरीवाल्यांमुळे अर्धा रस्ता व्यापला आहे. तर हिंगण्यामधून दामोदरनगरकडे जाताना कॅलिंक पुलाच्या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे मुख्य सिंहगड रस्त्यापेक्षा या कॅनॉल रस्त्याचा पर्यायी मार्ग डोकेदुखी ठरत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊनही अतिक्रमण विभागाकडून याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

डेक्कन किंवा स्वारगेटकडून खडकवासला, धायरी, नऱ्हे, वडगाव, किरकटवाडी या भागात जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव सोईचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने कोंडी होत आहे. त्याला पर्याय म्हणून राजाराम पूल ते फन टाइम थिएटर असा २ हजर १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात असून, सध्या या उड्डाणपुलाचे पिलर टाकण्याचे काम सुरू आहे.

या उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार असल्याने काम सुरू करण्यापूर्वी फनटाइम थिएटर ते पर्वती जल केंद्राची मागची बाजूपर्यंत कॅनॉल रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. सध्या विठ्ठलवाडी पर्यंतचा रस्ता वापरात आहे. पु. ल. देशपांडे उद्यानामागील कॅनॉल रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण अद्याप कमी झालेला नाही.

काय आहे स्थिती?

 • कॅनॉल रस्त्यावर वडगावकडे जाण्यासाठी नवीन रस्ता

 • पण येथील महात्मा बसवेश्वर चौकात दुपारपासून भाजी विक्रेत्यांसह इतर वस्तू विक्रेते रस्त्यावर बसतात

 • रस्ता साडेसात मीटर रुंदीचा असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते

 • त्यात परत हे विक्रेतेही त्याच ठिकाणी असल्याने या चौकात रोजच वाहतूक कोंडी

 • वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात

 • कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक गोयलगंगा चौकातून पुन्हा सिंहगड रस्त्यावरून धायरीच्या दिशेने जातात

 • अतिक्रमण विभागाकडून रस्ते अडवून पथारी टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही

काय करता येईल ?

सिंहगड रस्ता वाहनचालकांसाठी एक तापच झाला आहे. रोजची कोंडी, त्यात अतिक्रमणाची भर व त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सगळेच अवघड झाले आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

वॉर्डन नियुक्तीचा फायदा

हिंगण्यामधून दामोदरनगरकडे जाताना कॅनॉलच्या पुलाच्या चौकात रस्ता अरुंद असणे, चारीही रस्त्यांवरील वाहनांची संख्या जास्त असणे व येथे रस्ता समान पातळीवर नसल्याने उंचवटा निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी होती आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तेथे वॉर्डन नियुक्त केल्याने कोंडीचा त्रास कमी झाला आहे.

कॅनॉल रस्त्यावर हे करणे आवश्‍यक

 • रस्त्यावरील अतिक्रमण काढणे व कायमस्वरूपी झालेल्या मोठ्या गाड्यांचे पार्किंग बंद करणे

 • महात्मा बसवेश्वर चौकात वाहतूक नियंत्रण करणे

 • रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढली आहेत, त्यांच्या फांद्या कापणे

 • सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने दुचाकी घसरत आहेत, हे रस्ते दुरुस्त करणे

 • फनटाइम पासून ते पर्वती पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी तयार करणे

Web Title: Sinhagad Road Travel On Alternative Routes Is Tough

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..