
...अन् वन विभागाने केले दोन सुरक्षा रक्षक तैनात
सिंहगड: वन विभागाने सिंहगडाच्या घाटरस्त्यावरील गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर रात्रीचेही दोन सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत. सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याने मध्यरात्री घाटरस्ता व सिंहगडावरील गाडीतळापर्यंत सुरू असलेल्या प्रेमी युगुलांच्या मुक्त संचारास चाप बसला आहे. सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वन विभागाने तातडीने दखल घेत कारवाई केली आहे. गोळेवाडी येथे वन विभागाचा उपद्रव शुल्क आकारणी व तपासणी नाका आहे. वन समितीने नेमलेले कर्मचारी याठिकाणी तैनात असतात. अगोदर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतच या नाक्यावर कर्मचारी तैनात असल्याने रात्री दहा वाजल्यानंतर ये-जा करणारांना अडवण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी कोणीही नसायचे.
याचा गैरफायदा प्रेमीयुगुलांकडून घेण्यात येत होता. दै. सकाळ'च्या पाहणीत ही धक्कादायक बाब उघड झाल्याने याकडे बातमीच्या माध्यमातून वन विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर दुसऱ्याच दिवशी कारवाई करत रात्रपाळीसाठी दोन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नागरिक घालतात वाद
रात्री अपरात्री अनेक नागरिक व तरुण सिंहगडावर जाण्याचा हट्ट धरतात. त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात व नियम सांगितले तर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातही वन व विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पोलीसांचीही गस्त असावी
सिंहगड किल्ला व घाटरस्ता हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे रात्री गड बंद होण्याच्या सुमारास सिंहगडावरील गाडीतळापर्यंत पोलीसांनी दैनंदिन गस्त घालावी अशीही मागणी गडप्रेमींकडून करण्यात येत आहे.
" दोन कर्मचारी रात्रीच्या बंदोबस्तासाठी तातडीने तैनात करण्यात आले असून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे शस्त्र नसल्याने त्यांनाही मर्यादा आहेत. घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ सुसज्ज तपासणी नाका तयार करण्याचे विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या उपद्रवी पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे."
- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.
Web Title: Sinhgad Fort Golewadi Security Check Post Deployed Two Security Guards For Safety And Love Couples
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..