सिंहगड घाट रस्त्यावरील दरड अखेर वन विभागाने हटवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinhgad Ghat Landslide

चार दिवसांपासून सिंहगड घाट रस्त्यावर पडून असलेला दरडीचा ढिगारा अखेर वन विभागाने हटविला आहे.

सिंहगड घाट रस्त्यावरील दरड अखेर वन विभागाने हटवली

सिंहगड - चार दिवसांपासून सिंहगड घाट रस्त्यावर पडून असलेला दरडीचा ढिगारा अखेर वन विभागाने हटविला आहे. ई-सकाळ मधून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत काल दि. 17 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटविले आहेत. दरम्यान घाट रस्त्यावर इतरही चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

दि. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सिंहगड घाट रस्त्यावर गोळेवाडी तपासणी नाक्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पहिल्या मोठ्या वळणावर दरड कोसळली होती. सुदैवाने त्या दिवसापासूनच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. त्यावेळी तातडीने सदर दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले होते.

हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनीही दरड कोसळल्यानंतर संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी केली होती व वन विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे या दोघांचाही दावा पोकळ आश्वासन ठरला कारण चार दिवस सदर दरडीचा ढिगारा आहे तसाच रस्त्यावर पडून होता.

दरडीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला लोखंडी दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत रस्त्याकडे झुकलेला होता. त्यामुळे सदर ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. याविषयीचे वृत्त सकाळमधून प्रसिद्ध झाल्यानंतर चार दिवस शांत असलेला वन विभाग खडबडून जागा झाला व तात्काळ दरडीचा ढिगारा काढून घेण्यात आला.

'ज्या दिवशी दरड पडली त्याच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. जेसीबी बोलविण्यात आला असून दरड ताबडतोब हटविण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते. असे असताना चार दिवस काम का झाले नाही त्याबाबत तात्काळ वन विभागाशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने दरड हटविण्यात आली.'

- निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Web Title: Sinhgad Ghat Landslide Forest Department Move

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..