esakal | आधी सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करा!
sakal

बोलून बातमी शोधा

 flyover

आधी सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करा!

sakal_logo
By
जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता : विठ्ठलवाडी ते वडगाव या दरम्यान होणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सक्षम पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिल्यानंतरच सुरू करण्यात यावे, अन्यथा यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशारा राजकीय पक्षासह स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. वाहतूक विभागाची संपूर्ण भिस्त मुख्य सिंहगड रस्त्यावरच आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागेल. परिणामी नागरिकांचा वेळ, इंधन मोठ्या प्रमाणात खर्च होईल. सोबतच प्रदूषण वाढेल. (Pune News)

नागरिकांना दैनंदिन मनस्ताप सहन करावा लागेल, तसेच त्यांचे वेळेचे नियोजन कोलमडणार आहे, त्यामुळे पुलाचे काम सुरू होण्याअगोदर सक्षम पर्यायी रस्ते उपलब्ध करावेत, यासाठी आम आदमी पक्षाचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष श्रीकांत चांदणे, महिला अध्यक्षा राजलक्ष्मी शिंदे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. याबाबत संबंधित सर्व विभागांना निवेदन देऊन वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जात आहे.

हेही वाचा: शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक

विठ्ठलवाडी ते वडगाव फन टाइम थिएटर यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे वडगाव आणि त्यापासून पुढील म्हणजे धायरी, नांदेड, नांदेड सिटी, नऱ्हे, कोल्हेवाडी, किरकटवाडी, खडकवासला तसेच सिंहगड किल्ला या भागात जाणारी सर्व वाहने पुलावरून जातील आणि सनसिटी आनंदनगर, हिंगणे, माणिक बाग या भागातील वाहने पुलाखालून जाणार, असा आराखडा तयार करण्यात आला आहे, मात्र यावर नागरिकांनी विभिन्न मते नोंदवली आहेत. आनंदनगरचा उड्डाणपूल २.६ किमी लांबीचा असून १३५ कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. त्याची निविदा प्रक्रियादेखील झाली आहे. तीन लेनचा हा पूल सहा चौक ओलांडेल. आमदार माधुरी मिसाळ यांच्या पुढाकारातून हे काम सुरू असून त्यावर लवकरच कार्यवाही होणार असल्याची माहिती नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी दिली.

हेही वाचा: Live Update : 'एमआयएम'ने उघडले खाते

वाहतुकीसंदर्भातील निर्णय या भागात होणाऱ्या पुलाच्या कामामुळे काय समस्या निर्माण होणार आहेत, याबाबतची अधिक माहिती घेऊन मगच घेतला जाईल.

- उदयसिंह शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग

प्रकल्पासाठी निधी कमी पडू नये म्हणून विशेष तरतूद करणे गरजेचे आहे. यासाठी मुख्य सभेची मान्यता आवश्यक आहे, ती मिळाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य प्रकल्प अभियंता

विठ्ठलवाडी वडगाव दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलामुळे पुढील भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, त्यामुळे हा पूल आवश्यक आहे, परंतु असे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध असणे गरजेचे आहे.

- राहुल घुले, स्थानिक रहिवासी

नदीकाठचा रस्ता, तळजाईचा बोगदा, कालव्याशेजारील रस्ता पूर्णपणे उपलब्ध करून द्यावा, मगच पुलाचे काम सुरू करावे.

- अशोक वेल्हाळ, रिजन ट्रॅफिक फाउंडेशन

loading image
go to top