बारामतीत सहा जणांचा मृत्यू, तर रुग्णसंख्येने ओलांडला नऊशेचा टप्पा

मिलिंद संगई
Wednesday, 2 September 2020

शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज 900 चा टप्पा वेगाने ओलांडला.

बारामती (पुणे) : शहरातील कोरोना रुग्णसंख्येने आज 900 चा टप्पा वेगाने ओलांडला. गेल्या 24 तासात बारामती शहर व तालुक्यातील सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बारामतीकरांची झोप उडाली आहे. काल आणि आज मिळून 56 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज 901 पर्यंत गेला आहे. बारामतीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील सहा जण बारामती शहर व तालुक्यातील आहेत. कोरोनाने आतापर्यंत बारामतीत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 

वेगाने वाढणारा मृत्यूचा आकडा बारामतीकरांची धडधड वाढविणारा असून वारंवार प्रशासनाकडून विनंती करुनही मास्कचा वापर न करणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या दोन्ही बाबींबाबत नागरिक उदासिनच आहेत. पुरेशी काळजी न घेतल्याने कोरोनाची लागण होण्यासह इतरांनाही त्याचा प्रसाद देण्याचे काम काही महाभागांकडून झालेले आहे. कोरोनाचा फैलाव आता शहरासह तालुक्यातही सर्वदूर होऊ लागला आहे. सामान्यांपासून ते अगदी प्रतिष्ठितांपर्यंत अनेकांना कोरोनाची बाधा झालेली असल्याने पुरेशी काळजी घेणे हाच यावरचा उपाय असल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बारामतीत व्हेंटिलेटर्सची असलेली अपुरी व्यवस्था हेही काळजीचे कारण आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात वीस व्हेंटीलेटर्स येत्या काही दिवसात कार्यान्वित होणार असले तरी आज चिंताजनक असलेल्या रुग्णांसाठी ही कमतरता जाणवते आहे. 

गर्दीचा संपर्क टाळायला हवा...

बारामतीत व्यवहार सुरळित झाल्यानंतर आता गर्दीचे प्रमाणही वाढू लागले आहे, अनेक दुकानांमध्ये मास्कविना येणा-या ग्राहकांना काहीही बोलले जात नाही, अनेकांनी आता सॅनेटाय़झर्सचा वापरही थांबविला असून बहुसंख्य ठिकाणी येणा-या ग्राहकांच्या नाव, पत्ता मोबाईलचा तपशिलही नोंदविला जात नाही. अनेक टप-यांवर खाद्यपदार्थ व चहासाठी होणारी गर्दीही चिंता वाढविणारी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six corona patients death in baramati