एक महिन्यात सहा लाख प्रवाशांनी केला पुण्यातील मेट्रोतून प्रवास ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Metro
एक महिन्यात सहा लाख प्रवाशांनी केला पुण्यातील मेट्रोतून प्रवास !

एक महिन्यात सहा लाख प्रवाशांनी केला पुण्यातील मेट्रोतून प्रवास !

पुणे - शहर (Pune City) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) मेट्रो प्रकल्पातील (Metro Project) पहिल्या टप्प्यात सुमारे ६ लाख प्रवाशांनी (Passenger) महिनाभरात प्रवास केला आहे. त्यातून मेट्रोच्या तिजोरीत सुमारे ८० लाखांचे उत्पन्न (Income) जमा झाले आहे. एकूण प्रवाशांत पुण्यातील चार लाख तर, पिंपरी चिंचवडमधील दोन लाख प्रवाशांचा समावेश आहे.

पुण्यातील वनाज - गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटरच्या तर, पिंपरी - फुगेवाडी या सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. दोन्ही शहरांत पहिल्या दिवसांपासूनच नागरिकांनी मेट्रो प्रवासाबद्दल उत्सुकता दर्शविली. दोन्ही शहरांत सुट्टीच्या दिवशी मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण महामेट्रोने नोंदविले आहे.

पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्याची लोकसंख्या जास्त आहे. तसेच पुण्यातील मेट्रो मार्गाभोवती लोकसंख्येची घनताही जास्त आहे. त्यामुळे पुण्यातील मेट्रोला प्रतिसाद जास्त आहे, असे वाटत असले तरी, पिंपरी चिंचवडमध्येही मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. वाढदिवस, पुस्तक प्रकाशन, काव्य मैफील आदी उपक्रमही पुणेकरांनी मेट्रोमध्ये केले. तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सहलींनीही मेट्रो एक महिन्यांत गजबजून गेली, असेही महामेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रोच्या वेळेत वाढ

मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन झाले तेव्हा सकाळी ८ ते रात्री ९, अशी मेट्रो प्रवासाची वेळ होती. मात्र, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शनिवार, रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रोची वेळ १ तासाने म्हणजे रात्री १० वाजे पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच प्रवासी संख्या लक्षात घेता मेट्रोच्या वारंवारितेत अर्ध्या तासाऐवजी २५ मिनिटे वेळ करण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यात नजीकच्या काळात बदल होऊ शकतो, असेही त्यंनी सांगितले.

- महामेट्रोचे निरीक्षण

- शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी प्रवासी संख्येत वाढ

- पुण्यातील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १५ हजार

- पिंपरी चिंचवडमधील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या ६ हजार

- वनाज- गरवारे महाविद्यालय मार्गावर विद्यार्थ्यांची मोठी संख्या

- पिंपरी चिंचवडमध्ये कामगार वापरू लागले मेट्रो

- दोन्ही शहरांत हौशी प्रवाशांचीही संख्या अजूनही लक्षणीय

पुढचा टप्पा -

- गरवारे कॉलेज ते डेक्कन - सप्टेंबर २०२२

- गरवारे कॉलेज ते शिवाजीनगर न्यायालय - डिसेंबर २०२२

- फुगेवाडी ते रेंजहिल्स, शिवाजीनगर - डिसेंबर २०२२

हेमंत सोनवणे (महाव्यवस्थापक, महामेट्रो) - दोन्ही शहरांत मेट्रो प्रवाशांत लोकप्रिय व्हावी, यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे. दोन्ही शहरांत पीएमपीची फिडर सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. ती सेट होत असून, भाडेतत्त्वावर सायकलीही वापरण्यास प्रवाशांनी सुरवात केली आहे.

प्रवासी म्हणतात.....

अक्षय जोग (किनारा कॉर्नर) - वनाजपासून मला रोज डेक्कन जायचे असते. सध्या मी मेट्रोनेच जातो. एसी प्रवास हे उन्हाळ्यात सुख आहे. मेट्रो डेक्कनपर्यंत लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे.

तन्मयी कुलकर्णी (वनाज) - वनाजपासून मला रोज बीएमसीसीमध्ये जायचे असते. सुरवातीला मेट्रो वापरली. त्यावेळी बरं वाटले. परंतु, गरवारे ते बीएमसीसी कॉलेज हे अंतर जास्त आहे. त्यामुळे पुन्हा मी दुचाकी वापरू लागले. मेट्रो डेक्कनपर्यंत आली तर मला सोयीचे होईल.

Web Title: Six Lakh Passengers Travel Through Pune Metro In A Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TravelpuneMetroOne Month
go to top