जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी इंदापूरात विक्रमी प्रतिसाद

डॉ. संदेश शहा
Wednesday, 5 September 2018

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा 
उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली.

इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा 
उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली.

मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी इंदापूर विधानसभेची उमेदवारी ही काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क असून यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहूल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्हास सन्मानपुर्वक आघाडी हवी मात्र इंदापूरच्या जागेबद्दल तडजोड केली जाणार नाही असे सुचित केले. 

यावेळी हर्षवर्धन पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणा देणा-या कार्यकर्त्यांबरोबरच अशोक चव्हाण हे देखील उस्फुर्त सहभागी झाले. यावेळी स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी चार वर्ष फसवे राजकारण केले. शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती असून ते मस्तवाल झाले आहेत. सन 2014 ला त्यांची बेटी बचाव ही घोषणा होती 
मात्र आता बेटी भगाव हे त्यांचे तत्व झाले आहे. सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता ही त्यांचे सुत्र झाले असून सैनिकांच्या कुटुंबा- बद्दल अपशब्द काढणे, महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत त्यांच्यातील काही जणांची मजल गेली आहे.

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र जनतेत मात्र दारिद्रय अशी बिकट स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळे इंदापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राफेल विमान खरेदी 126 विमानांची 623 कोटी रूपयाने करण्याचे काँग्रेस राजवटीत ठरले. मात्र त्यानंतर काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर सत्तेतील भाजपा सरकारने केवळ 36 विमानांची खरेदी 1660 हजार कोटींना ठरली. यामध्ये 40 हजार कोटी रूपयांचा भष्ट्राचार झाला असून हा भष्ट्राचार जगात सर्वाधिक रूपयांचा झाला आहे. शेतक-यांना दीडपट हमीभाव नाही, युवकांना रोजगार नाही. त्यामुळे या दिशाभूल करणा-या सरकारला त्याची जागा दाखवा.

यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रामहरी रूपनवर व जयकुमार गोरे, दिपक जाधव आदींचीही यावेळी भाषणे झाली. सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर तर आभार प्रदर्शन काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixth day of the Jana Sanghrsh Yatra in Indapur