शहरात स्केटिंगचा सराव करणे शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील (प्रभाग क्र.८) २.४७ एकर जागेवरील सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाच्या कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंकचे (पहिला टप्पा) नुकतेच उद्‌घाटन झाले. यापूर्वी, शहरातील खेळाडूंना विमाननगर (पुणे) अथवा कासारसाई (हिंजवडी) येथे सराव, स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी जावे लागत असे. आता, खेळाडूंना शहरातच सराव करणे शक्‍य होणार आहे.

या स्केटिंग रिंकचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. महापौर राहुल जाधव अध्यक्षस्थानी होते. ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ‘ई’ प्रभाग अध्यक्षा भीमा फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी या प्रसंगी उपस्थित होते.   लांडगे म्हणाले, ‘‘कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू असलेल्या कै. पै. मारुती कंद यांनी पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे नाव स्केटिंग रिंकला देण्यात आले आहे. या रिंकच्या माध्यमातून शहरामधून अधिकाधिक खेळाडू तयार होतील.’’ सुमारे २०० मीटर परिघाच्या या रिंकच्या पहिल्या टप्प्यामध्ये १०० मीटरची सराव रिंक, मुख्य प्रवेशद्वार, सीमाभिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण आदींवर खर्च करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रसिद्ध
रिंकच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच सुरू होणे अपेक्षित असून, त्यासाठी १.८६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या टप्प्यात दोन प्रेक्षक गॅलरी, स्वतंत्र चेंजिंग रूम्स, स्वच्छतागृहे आणि परिसराचे सुशोभीकरण आदी कामांचा अंतर्भाव असेल.

Web Title: skating rink