esakal | पिंट्या खेळला गेम भारी बाबा भज्यांवर ताव मारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पिंट्या खेळला गेम भारी बाबा भज्यांवर ताव मारी!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

आई-बाबांचे निरोप एकमेकांना पोचवणे, ही ‘पोस्टमन’ची नोकरी करून पिंटू जाम वैतागला होता. ‘तुमची होतात भांडणे आणि मधल्यामध्ये माझे हाल होतात’ अशी तक्रारही त्याने केली. (SL Khutwad Writes 13th July 2021)

‘काय मस्त पाऊस पडतोय ना. कुरकुरीत कांदा-भजी कर ना’’ अशी फर्माइश पिंटूच्या बाबांनी काल सकाळी केली आणि त्यावर ‘‘असं चटक-मटक सारखं खायला पाहिजे. पोट किती सुटलंय बघा आधी. घर म्हणजे काय हॉटेल वाटलं का? फक्त ऑर्डर सोडायला’’? असं फणकऱ्याने उत्तर देऊन पिंटूच्या आईने भांड्यांची आदळआपट केली. त्यावर ‘‘कधीच्याकाळी भजी करायला सांगितलं तर झाली हिची नाटकं सुरु’’, असं बाबांनी उत्तर देऊन आगीत तेल ओतलं. त्यानंतर दोघांमध्ये अबोला सुरू झाला. त्यानंतर दोघांचे निरोप एकमेकांना पोचवणं हेच पिंटूचं काम झालं.

‘पिंटू, बाबांना म्हणाव जेवण तयार आहे. गिळायला या,’’ असा आईचा निरोप पिंटू बाबांना द्यायचा. ‘‘मला भूक नाही. तिला सांग की माझ्यावाटेचंही तूच खा.’’ हा बाबांचाही निरोप तो पोचवू लागला. मात्र, दोघेही आपला राग पिंटूवर धपाटे घालून कमी करु लागले. दोघेही एकमेकांना टोमणे मारायची एकही संधी सोडत नव्हते.

हेही वाचा: कोरोना मृत्यूमध्ये ‘साठी’च्या वरचे सर्वाधिक

‘‘पिंटू बाळा, खूप खूप अभ्यास कर. सतत पहिल्या नंबरने पास झालास तर तुला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. मोठीऽऽ नोकरी असल्यानंतर तुला खूप सुंदर, नम्र आणि आज्ञाधारक बायको मिळेल. मग तू कधीही तिला कांदाभजी करायला सांगितलंस ना. तर ती प्रेमाने तुला खाऊ घालेन...’’ बाबांचे हे बोलणे ऐकून पिंटू म्हणाला, ‘‘बाबा, तुमच्या लग्नाच्यावेळी अशी काही स्कीम नव्हती का?’’ पिंटूचे हे बोलणे ऐकून आईने पिंटूच्या पाठीत धपाटे घातले. मात्र, आपण असं बोलल्यानंतर बाबा का हसत आहेत, याचं कोडं त्याला उलगडलं नाही. ‘‘पिंटू, तू अभ्यासापेक्षा व्यायामावर लक्ष दे. नाहीतर ‘एका माणसा’सारखे नुसतं पोट सुटायचे आणि खाव-खावही सुटायची.’’ आईने असं म्हटल्यावर पिंटूने लगेच मान डोलावली व लागलीच त्याने जोर मारायला सुरवात केली. त्यावर बाबांनी त्याला धपाटा घातला. ‘‘असं सतत कोणाचं लगेच ऐकत राहिलास तर बायकोचा नंदीबैल होशील. बाबांसारखा कर्तृत्वान पुरुष हो,’’ असा सल्ला दिला. मग पुन्हा आई-बाबांची धुसफूस झाली. मग बाबा चिडून बेडरुममध्ये गेले. दोघांच्या धपाट्यांपासून आपण वाचलं पाहिजे तसेच ही ‘पोस्टमन’ची नोकरीही संपली पाहिजे, असं पिंटूला सारखं वाटू लागलं. यासाठी काय करता येईल, याचा तो विचार करू लागला आणि चुटकी वाजवत तो बाबांकडे गेला. ‘‘बाबा, आईने ‘सॉरी’ म्हटलंय. झालं गेलं विसरून जा, असं ती म्हणाली.’’

पिंटूचे हे बोलणे ऐकून बाबांचा चेहरा उजळला. मग पिंटू किचनमध्ये आईकडे गेला ‘‘आई, बाबांनी कान पकडून ‘सॉरी’ म्हटलंय. माझं चुकलं. मी कधीच तुझ्याशी असं वागणार नाही. मला माफ कर, असा निरोप दिलाय.’’ पिंटूचे हे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. पाच मिनिटांत तिने गरमागरम कुरकुरीत कांदा-भजी केली. एक प्लेट भरून ती बाबांच्या हातात देत ती म्हणाली, ‘‘पाऊस किती छान पडतोय ना. अशावेळी भजी पाहिजेतच. तुम्ही मनोसक्त खा. अजून एक प्लेट तयार आहे.’’ पिंटूच्या आईचे बोलणे ऐकून बाबांनी शीळ वाजवत आनंद व्यक्त केला तर पिंटू गालातल्या गालात हसू लागला.

loading image