esakal | वाहतूक कोंडीत अडकलाय? हॉर्न वाजवण्यास मुले मिळतील | SL Khutwad
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
वाहतूक कोंडीत अडकलाय? हॉर्न वाजवण्यास मुले मिळतील

वाहतूक कोंडीत अडकलाय? हॉर्न वाजवण्यास मुले मिळतील

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

मा. पालकमंत्री,

विषय - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे होत असलेल्या फायद्यामुळे आभार मानण्याबाबत.

साहेब, उपरोक्त चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर रोज सकाळ- संध्याकाळ चार- पाच तास वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तिथेच अनेक तरुण- तरूणींची एकमेकांशी ओळख होत आहे. त्याचे रूपांतर प्रेमात होऊन, त्यांची लग्नेही ठरत असल्याचे समजते. कोरोनामुळे महाविद्यालये अजूनही बंदच आहेत. त्यामुळे तरुण मुले व मुलींची ओळख तरी होणार कोठे? अशा तरुणांना आपण वाहतूक कोंडीद्वारे आशेचा किरण दाखवला आहे. आपल्या प्रियजनांशी गोपनीय ठिकाणी भेटावे, मनोसक्त गप्पा माराव्यात, यासाठी हक्काचे ठिकाण असलेली चित्रपटगृहेही कोरोनामुळे आपण बंद ठेवली आहेत. त्यांच्यासाठी वाहतूक कोंडीसारखा दुसरा पर्याय नाही.

पूर्वी ‘सारसबागेत वा झेड ब्रीजवर ये’ असे निरोप दिले जायचे. आता ‘संध्याकाळी पाचला विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीत ये, मस्त तीन-चार तास गप्पा मारू,’ असे निरोप दिले जात आहेत. आपण तरूणांच्या प्रेमाला व्यासपीठ मिळवून दिल्यामुळे आपले कोणत्या शब्दांत आभार मानावेत, हेच कळत नाही. साहेब, कामावर उशिरा पोचणाऱ्यांचाही कोंडीमुळे फायदा होऊ लागला आहे. कोणी काही विचारण्याआधीच ‘वाहतूक कोंडीत अडकलो होतो,’ असे सांगितल्यावर कोणी काही बोलत नाही.

साहेब, माझे अत्यंत नावडते पण जवळचे पाहुणे नगरवरून आमच्या घरी औंधला आले होते. आपण दहा-बारा दिवस मुक्काम ठोकणार असून, आमची चांगला सरबराई करा, असा ‘दम’ त्यांनी येतानाच भरला. सकाळी दहाला ते शिवाजीनगरला आल्यानंतर ‘आम्ही पंधरा-वीस मिनिटांत पोचू. झणझणीत मटण करा,’ अशी ऑर्डर त्यांनी दिली. कुठपर्यंत आला आहात, हे विचारण्यासाठी फोन केला असता, विद्यापीठ चौकातील कोंडीत अडकलोय, असं त्यांनी उत्तर दिल्यानं आम्हाला हायसं वाटलं. दर अर्ध्या तासाने आम्ही त्यांची ‘ख्याली- खुशाली’ विचारत होतो. अखेर साडेपाचच्या सुमारास ते अक्षरशः घामाघूम होऊन घरी आले. ‘फक्त वरण-भात द्या, बाकी काही नको,’ असे ते म्हणाले. कोंडीत ते एवढे दमले होते, की त्यांनी रात्रीचे जेवणही नाकारले.

हेही वाचा: एकतर्फी प्रेमातुन अल्पवयीन मुलीचा खुन; शीर धडापासून झाले वेगळे

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना शनिवारवाडा, सारसबाग बघायला जा, असे सुचवले. त्यांनी चहा-पाणी घेतल्यानंतर तिकडे कूच केली. मात्र, नऊ वाजता ते पुन्हा कोंडीत सापडले. तीनपर्यंत ते तिथेच होते. मग मात्र कोंडीत पुन्हा सापडू नये म्हणून ते परस्पर नगरला निघून गेले. ही बातमी समजताच आम्ही आनंदाने वेडे व्हायचे बाकी होतो. आम्ही औंध भागात घर घेतलंय, याचा आम्हाला पहिल्यांदा अभिमान वाटला. कोंडीत अडकलेल्यांसाठी काहीजण वेगळीच सेवा पुरवत आहेत. ‘‘तुम्ही आमच्या छोटेखानी मंडपात या. गोव्यातील बीचप्रमाणे तेथील आरामखुर्चीवर तीन-चार तास आराम करा. कोल्ड्रिंक्स प्या. तोपर्यंत आमचा ड्रायव्हर तुमची गाडी कोंडीतून बाहेर काढेल.’’ यालाही प्रतिसाद मिळत आहे.

कोंडीत अडकलेले काहीजण सतत हॉर्न वाजवून कंटाळून जातात. त्यांचंही बरोबर आहे म्हणा ! सलग तीन-चार तास हॉर्न वाजवणं, हे काय खायचं काम नाही. त्यामुळे काहीजणांनी ‘वाहतूक कोंडीत हॉर्न वाजवून देण्यासाठी मुले मिळतील,’ अशीही जाहिरातही केली आहे. साहेब, चौकातील कोंडीमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. अनेकजण वडा-पाव, भजी, मसाला डोसा अशा नाश्‍त्यांसह पंजाबी डिशही कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पुरवत आहेत. काहीजण मोटारींमध्येच लंच वा डिनर घेत आहेत.

साहेब, नव्या उड्डाणपुलाचे काम दहा- पंधरा वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत आम्ही कोंडीचा मनापासून आनंद लुटत आहोत. काळजी नसावी.

कळावे, आपला विश्‍वासू, एक आनंदी पुणेकर

loading image
go to top