esakal | कारल्याची भाजी अन् विसरलेला स्वेटर
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

कारल्याची भाजी अन् विसरलेला स्वेटर

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

आजही डब्यात कारल्याची भाजी बघून राजीवच्या कपाळावर आठ्या चढल्या. ‘कारल्याची भाजी प्रकृतीला खूप चांगली असते. जेवताना जर ही भाजी नसेल तर माझे बाबा उपाशी राहायचे’ ही नेहमीची कॅसेट हेमांगीने वाजवल्यावर राजीवने कानात कापसाचे बोळे घातले. लग्नाआधी ज्या मुलीला आपण महागडे चाॅकलेट आणि कॅडबऱ्या दिल्या. म्हणेल तेव्हा पिझ्झा-बर्गर दिला. तीच मुलगी लग्नानंतर दररोज डब्यात कारल्याची भाजी आणि भेंडी देते हे पाहून ‘परमेश्वरा, माझं काय चुकलं रे’ असा काळजाला हात घालणारा प्रश्न तो आकाशाकडे बघून विचारायचा. ‘कारल्याची आणि भेंडीची भाजी मला डब्यात रोज देत जाऊ नकोस. माझे मित्र हसतात,’ असंही राजीवनं अनेकदा सांगितलं. त्यावर कारल्याच्या भाजीचं महत्त्व ती तासभर त्याला ऐकवायची.

या भाज्यांपासून सुटका होण्यासाठी राजीवनं एक पर्याय निवडला होता. सी विंगमधील मनोज त्याचा खास मित्र होता. घरून निघाल्यानंतर पाच-दहा मिनिटे तो गप्पा मारण्यासाठी मनोजकडे यायचा. तेव्हा सायलीवहिनींना ‘आज काय स्पेशल भाजी केलीय’ असं विचारायचा व बिनधास्तपणे भाज्यांची अदलाबदल करायचा. अनेकदा संपूर्ण डबाच तेथून न्यायचा. महिन्यांतून दहा-बारा वेळा तरी असं व्हायचं. मात्र एक दिवस सोसायटीच्या गेटजवळ हेमांगी आणि सायलीवहिनी भेटल्या. त्या वेळी सायलीवहिनी म्हणाल्या, ‘ताई, तुम्ही कारल्याची भाजी किती छान बनवता हो. मला शिकवा ना एकदा,’ असं म्हटलं. त्यावर हेमांगीनं विचारलं, ‘पण मी केलेली भाजी तुम्ही कधी खाल्ली?’ त्यावर ‘महिनाभरात आठ-दहा वेळा तरी मी तुम्ही केलेली भाजी खाते,’ असं सायलीवहिनींनी सांगितलं. तेवढ्यात काहीतरी आठवल्यागत त्या म्हणाल्या, ‘भावोजी फारच विसरभोळे आहेत. आता जेवणाचा डबा का कोणी विसरतं? पण ते विसरतात. त्यांचे दोन डबे माझ्याकडे आहेत,’ असे म्हणून वहिनींनी लगबगीने घरी जाऊन ते डबे हेमांगीच्या हातात दिले. घरी आल्यानंतर हेमांगीने रुद्रावतार धारण केला. ‘त्या सायलीच्या घरी तुम्ही डबा विसरताच कसे?’ असा तिने जाब विचारल्यावर राजीवची पाचावर धारण बसली. शंभरवेळा माफी मागितल्यावर त्याची या प्रकरणातून तात्पुरती सुटका करण्यात आली. या आठवड्यात राजीवची कंपनीत थर्ड शिप्ट होती. रात्री बारा ते सकाळी आठ अशी त्याची ड्युटी होती. कामावरून सुटल्यानंतर तो थेट घरी निघाला.

रस्त्यातच त्याला हेमांगीचा फोन आला. तिने त्याला कोपऱ्यावरील किराणामालाच्या दुकानातून काही वस्तू आणायला सांगितल्या. त्यानुसार त्याने त्या वस्तू खरेदी केल्या. तेवढ्यात तिथं त्याला सायलीवहिनी भेटल्या. ‘‘वहिनी, मनोजचं काय चाललंय,’’ अशी सहज त्याने विचारपूस केली. दोन -तीन मिनिटं इकडचं -तिकडचं बोलणं झाल्यानंतर राजीव घरी आला. दहा मिनिटांनी बेल वाजल्याने हेमांगीने दार उघडलं. दारात सायलीवहिनी उभ्या होत्या. ‘‘ताई, भावोजी किती विसरभोळे आहेत ना ! आता शाल आणि स्वेटर या वस्तू कोणी विसरेल का? पण भावोजी तेही विसरले.’’ त्यावर वहिनींच्या हातून त्या गोष्टी हिसकावून घेत, ‘‘आधी यांच्याकडे बघते आणि नंतर तुला हिसका दाखवते,’’ असं म्हणून वहिनींच्या तोंडावर हेमांगीने दार आपटलं. राजीवला जाब विचारत ती म्हणाली, ‘‘मी एवढा कष्टाने आणि प्रेमाने केलेला डबा त्या सायलीला नेऊन देता, तिच्या घरी डबे विसरताय. आज तर कहरच केला. शाल आणि स्वेटरच तिच्या घरी विसरून आला. रात्रपाळीला जातोय, असं सांगून, तिच्या घरी मुक्काम करताय काय? काय जनाची नाही मनाची लाज वाटते का? कधीपासून तुमचं सुरू आहे.’’ हेमांगीच्या या भडिमारामुळं राजीव पुरता घायाळ झाला. सध्या तो दोन्ही कान पकडून शंभर उठाबशा काढणे ही शिक्षा भोगतोय.

loading image
go to top