ज्याचा शेवट ‘गोड’ ते सारेच गोड... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
ज्याचा शेवट ‘गोड’ ते सारेच गोड...

ज्याचा शेवट ‘गोड’ ते सारेच गोड...

‘जा जा... मी नाही बोलणार गोड. काय करायचे ते करा. परत जर मला ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’च्या शुभेच्छा दिल्या तर मी पोलिसांत जाईन.’

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देणारे सोसायटीचे सचिव कार्लेकर यांच्यावर जनुभाऊ आज सकाळी चांगलेच उखडले होते. त्यामुळे तिळगूळ न घेताच ते परत गेले. त्यावर कावेरीबाई म्हणाल्या, ‘‘अहो आज मकरसंक्रात आहे. किमान आज तरी लोकांशी गोड बोला.’’ त्यावर उसळून जनुभाऊ म्हणाले, ‘‘आम्ही बोलतो तेच गोड मानून घ्या. आमच्याकडून नाही त्या अपेक्षा ठेवू नका.’’ त्यावर कावेरीबाई थोड्या काळजीत पडल्या.

‘अहो, असं एकाएकी चिडायला काय झालं? दारात तिळगूळ द्यायला आलेल्या व्यक्तीवर कोण चिडतं का?’

त्यावर जनुभाऊ वरमले. ‘‘अगं पहाटे पाचपासून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा लोकांनी पाठवल्यात. एकवेळ हेही क्षम्य पण साडेसहापासूनच लोकांनी फोन करून शुभेच्छा द्यायला सुरवात केल्यावर डोकं फिरेल नाही तर काय होईल. त्यातच अनेकांनी दहा-दहा मिनिटे काव्यमय शुभेच्छा द्यायला सुरवात केली. कसं तरी ‘ट’ ला ‘ट’ जोडायचं आणि द्यायचं पाठवून. काय तर म्हणे ‘कणभर तीळ, मणभर प्रेम; गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा’. असा कोठं स्नेह वाढतो का? या लोकांना काही कामधंदे आहेत की नाहीत. तेवढ्यात कार्लेकर समोर आले. त्यामुळे सगळा राग त्यांच्यावर निघाला.’’ असं म्हणून जनुभाऊ पोटमाळ्यावर चढले.

गेल्यावर्षी तिथे ठेवलेल्या मकरसंक्रातीच्या पाट्या त्यांनी खाली काढल्या व दरवाजा व भिंतीवर लावल्या. ‘तिळगूळ देण्या-घेण्याची वेळ सकाळी अकरा ते एक आणि सायंकाळी चार ते आठ आहे. दुपारी एक ते चार या वेळेत तीळगुळ द्यायला येऊ नये, आल्यास गोड बोलण्याची अपेक्षा ठेवू नये,’ ‘कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्या व्यक्तींनीच तिळगुळासाठी यावे व सोबत सर्टिफिकेट बाळगावे’, ‘तिळगूळ देताना मास्क चेहऱ्यावरच हवा, हनुवटीवर नाही. अन्यथा तिळगूळ दिले जाणार नाही,’ ‘तिळगूळ दिल्या-घेतल्यानंतर जाताना सॅनिटायझर मागू नये. येतानाच आपल्या पिशवीत बाटली आणावी,’ ‘तिळगुळाची वडी घरी जाऊन शांतपणे खावी, येथे आमच्यासमोर खाऊन पाणी मागू नये.’ ‘किती छान वड्या झाल्यात, असं सांगून गूळ पाडू नये. वडी एकदाच दिली जाईल, याची नोंद घ्यावी,’ ‘आज तुमच्याशी गोड बोललो म्हणून वर्षभर तशी अपेक्षा ठेवू नये,’ सगळ्या पाट्या लावून झाल्यानंतर जनुभाऊ खुश झाले तर कावेरीबाईंनी डोक्यावर हात मारून घेत म्हणाल्या, ‘अहो, वर्षातील एक दिवस तरी लोकांशी गोड बोला. पाट्या वगैरे न लावता, लोकांचं प्रेमानं स्वागत करा.’’ त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘‘ठीक आहे. तू म्हणतेस म्हणून आजच्या दिवस गोड बोलेन. पण रोज माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका. माझ्या तत्वाविरोधात ही गोष्ट आहे.’’ असे म्हणून ते सगळ्यांशी गोड बोलू लागले. फोनवरून शुभेच्छा देणाऱ्यांची आत्मीयतेने चौकशी करू लागले. थोड्यावेळाने ते तिळगूळ घेऊन कार्लेकरांच्या घराकडे निघाले. मात्र, रस्त्यातच दोघांची गाठ पडली.

‘कार्लेकर, मघाशी रागावल्याबद्दल सॉरी बरं का ! तिळगूळ घ्या, गोड बोला.’’ जनुभाऊंनी प्रेमाने म्हटले. त्यावर आवाज चढवत कार्लेकर म्हणाले, ‘‘जनुभाऊ, हा काय प्रकार आहे? हे मी मुळीच खपवून घेणार नाही. आधी लशीचे दोन डोस घेतल्याचे सर्टिफिकेट दाखवा. मगच तिळगूळ घेईन.’’ कार्लेकर यांनी आपली हुबेहुब नक्कल केल्याचे पाहून जनुभाऊ जोरात हसले. कार्लेकरांनी त्यात आपला स्वर मिसळला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना तिळगूळ देत शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Panchnama
loading image
go to top