esakal | तत्त्वज्ञानाची किमया | Panchnama
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
तत्त्वज्ञानाची किमया

तत्त्वज्ञानाची किमया

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘आयुष्यात आणि बसमध्ये पुढं चालत राहा. एकाजागी थांबू नका. थांबला तो संपला.

दाराजवळ गर्दी करू नका, नाहीतर यमराज तिकीट फाडेल. तुमचं तिकीट काढायची संधी मला द्या...’’ पीएमपीमधील दत्तू कंडक्टरचं बोलणं ऐकून आम्हाला फार गंमत वाटली. प्रचंड गर्दीतही त्यांचे काम हसत- खेळत चालले होते. कोणावर रागवणे नाही की चिडचिड नाही.

आम्ही शिवाजीनगरचे तिकीट काढलं. राहिलेले पैसे हातावर टेकवत ‘तुमचा लाखो रूपयांचा सगळा हिशेब मिटवला आहे. काही शंका असल्यास ‘मनातच’ ठेवा.’ असे म्हणून मिश्‍कीलपणे ते हसले. त्यानंतर दुसऱ्या प्रवाशांशी अशीच चेष्टा- मस्करी करत, ते तिकीट काढू लागले. स्वारगेटला गर्दी कमी झाली होती. ही संधी साधून आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.

‘तुम्हाला कसं काय जमतं एवढं आनंदी राहणं?’’ आम्ही सरळ प्रश्‍न विचारला.

‘तेवढी एकच गोष्ट माझ्या हातात आहे. दुसऱ्यांच्या मूडवर माझा मूड मी का बनवू. दुसरे चिडलेले असले की मीदेखील चिडलंच पाहिजे का? काही भडकल्यावर रॉकेल टाकायचं की

पाणी टाकायचं, हा निर्णय आपण घ्यायचा असतो.’’ दत्तूचं उत्तर ऐकून आम्ही खजिल झालो.

‘साहेब, मी रोज शेकडो प्रवाशांसोबत प्रवास करतो. पण त्यातील माझं कोणीही नाही. मग मी त्यांच्यात विनाकारण का गुंतून पडू? जवळच्या नातेवाईकांबाबतही मी हा नियम पाळतो. पीएमपी बसमध्ये मी रोज आठ तास प्रवास करतो. पण प्रत्यक्षात मला कोठंही जायचं नसतं. वरिष्ठांनी ठरवलेल्या रूटनुसार आम्ही प्रवास करतो. दुसरा मार्ग कितीही चकाचक व विनाखड्ड्यांचा असला तरी आम्ही तिथे घुसत नाही वा दुसऱ्या रस्त्यांशी तुलना करीत नाही. जीवनातही ही शिस्त कामी येते. दुसरा किती श्रीमंत आहे, सुखी आहे, असे म्हणून त्याच्याशी तुलना करून, मी कधी दुःखी होत नाही.’’

हेही वाचा: Pune : वरंधा घाटातील अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी

‘लोभ, माया, मत्सर यांच्यापासूनही दूर राहण्याचं शिक्षणही मला आमच्या पीएमपीनेच दिलं आहे. ज्या बसमधून प्रवास करायचा आहे, ती बसही माझ्या मालकीची नाही. त्यामुळे मी कशाचा रूबाब करू? माझ्या बॅगेत तिकीटाचे हजारो रूपये असतात. पण ते पैसेही माझे नाहीत. मग मी कशाचा गर्व करू? आणि कशाच्या जोरावर प्रवाशांशी हुज्जत घालू? ड्युटी संपल्यानंतर आगारात सगळं सुपूर्द केलं की आपण आपलं कर्तव्य निभावलं, याच्यातच मी समाधान मानतो. आयुष्यातही ‘माझी जमीन, माझे घर, माझा पैसा यात गुंतून पडत नाही. बसमध्ये रोज धक्के बसतात. आयुष्यातील असंख्य धक्के पचविण्यासाठी त्याचा मला उपयोग होतो. त्यामुळे मी खूप सुखी आणि समाधानी जीवन जगतो.’’

शिवाजीनगरपर्यंत दत्तूच्या जीवनविषयक तत्वज्ञानानं आम्ही भारावून गेलो होतो. त्याच अवस्थेत घरी आलो.

‘तुम्ही मला वाढदिवसानिमित्त साडी आणणार होतात. तुमचे हात रिकामेच दिसतायत?’’ बायकोनं चिडून म्हटलं. त्यावर आम्ही तिला शांत करत म्हटलं.

‘अगं, या जगात आपण मोकळ्या हातानंच आलोय आणि मोकळ्या हातानेच जाणार आहोत. या मोह- मायेच्या दुनियेपासून तू लांब राहा. साडी, दागिने अशा नश्‍वर वस्तूंमध्ये अडकून पडणं चांगलं नाही...’’ आमचं बोलणं ऐकून बायको भडकली.

काही भडकलं, की पाणी ओतून ते विझवावं, अशी शिकवण आम्हाला दत्तूनं दिल्याचं आम्हाला पुसटसं आठवत होतं. आम्ही तातडीने पाण्याची कळशी तिच्या अंगावर उपडी केली. मात्र, ती शांत होण्याऐवजी आणखी भडकली. त्यानंतरचं आम्हाला काही आठवत नाही. डोळे उघडले तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये असल्याचे जाणवले. आजच आमचा डिस्चार्ज झाला असून, सध्या आम्ही दत्तू कंडक्टरचा शोध घेत आहोत.

loading image
go to top