बायको मिळाली भारी, तीही डोकं खाणारी...

एकदा तो सोनलला पाहण्यासाठी दोन मित्रांसमवेत गेला. एक वाजता येतो, असा निरोप देऊन, तो अडीचला पोचला. त्या वेळी सोनल नेमकी फरशी पुसत होती.
Panchnama
PanchnamaSakal

‘डोकं आहे, खाणारी पाहिजे’ अशी जाहिरात महेंद्रने पेपरमध्ये दिल्यावर अनेक मुलींची स्थळं त्याला सांगून येऊ लागली. ‘आपल्याला धाकात ठेवणारी व गुणवंत नवरा घडवण्यासाठी प्रसंगी टाकीचे घाव देणारी, चूक झाल्यावर सरळ न सांगता टोचून बोलणारी बायको’ त्याला हवी होती. अशी बायको असेल तरच संसार यशस्वी ठरतो, हे त्याने अनेक ठिकाणी पाहिले होते. अशी बायको शोधण्यासाठीच त्याचे प्रयत्न सुरू होते. पाच-सहा ठिकाणी तो मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमालाही गेला होता. मात्र, आपली मुलगी किती गुणी आहे, हे सांगण्यासाठीची तिच्या घरच्यांची धडपड पाहून, तो वैतागला होता. मला आहे त्या मूळ स्वभावातच मुलगी पाहायची आहे. जे काही आहे, ते रोख-ठोक असावं, उगाचंच काहीतरी दडवून ठेवावं, अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती.

एकदा तो सोनलला पाहण्यासाठी दोन मित्रांसमवेत गेला. एक वाजता येतो, असा निरोप देऊन, तो अडीचला पोचला. त्या वेळी सोनल नेमकी फरशी पुसत होती. मात्र, महेंद्र बुटांसह त्या ओल्या फरशीवरून चालत गेला. त्यामुळे सोनल भडकली. ‘‘ओ डोकं वगैरे काही आहे का? खुशाल ओल्या फरशीवर चालत येऊन, घरभर चिखल केलाय. आधी बाहेर व्हा.’’ तिने रागावत म्हटले.

‘मी नवरा मुलगा आहे. मुलगी पाहायला आलोय,’’ महेंद्रने अपमान गिळत उत्तर दिलं. ‘‘नवरदेव आहे तर काय घोड्यावरून मिरवणूक काढू का? दहा मिनिटे बाहेर थांबा. फरशी सुकल्यावर आत या,’’ सोनलचं हे उत्तर ऐकून महेंद्रच्या मित्रांना धक्का बसला. दहा मिनिटांनी सगळे आत आले. मग त्यांना चहा व पोहे दिले. महेंद्रसह तिघांनी ते निमूटपणे खाल्ले. ‘‘कसे होते पोहे? सोनलने केले होते,’’ मुलीच्या वडिलांनी सांगितले.

Panchnama
काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी

‘‘पोहे छान होते. मात्र, त्यात मीठ घालायला हवं होतं. चहाही एकदम कडक होता. पण त्यात साखर घातली असती तर गोडी आणखी वाढली असती.’ महेंद्रने सोनलची नजर टाळत, खाली मान घालत उत्तर दिले. एवढं बोलल्यावरच त्याला घाम फुटला. त्याने घाम पुसून रुमाल सोफ्यावर टाकला. ‘‘सोफ्यावर असलं काही टाकायचं नाही. उचला तो रुमाल आणि खिशात घाला,’ पाटावर बसलेल्या सोनलचं बोलणं ऐकून महेंद्रचे मित्र भांबावून गेले. तिचे वडील मात्र माफी मागू लागले. ‘‘सोनल थोडी शिस्तप्रिय आहे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका,’ असा खुलासा करू लागले. पोहे अळणी होते म्हणून मुलीच्या आईने रव्याची खीर आणली. मात्र, खाताना ती महेंद्रच्या हातावर सांडली. त्यामुळे त्याने पटकन उठून पडद्याला हात पुसले. त्याचं हे कृत्य बघून सोनलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘हात कशाला पुसावेत, याची तुम्हाला अक्कल आहे का,’ असं म्हणून तिने त्याचा पाणउतारा केला. सोनलचा हा अवतार बघताच, हेही स्थळ आपल्या हातून गेलं, याची तिच्या घरच्यांना खात्री पटली. सोनललाही हे स्थळ तसं पसंत पडलं होतं. पोहे अळणी व बिनसाखरेचा चहा असूनही, नवऱ्यामुलाने कसली तक्रार केली नव्हती. असला तक्रार न करणारा, पुढ्यात येईल ते निमूटपणे खाणारा, अपमान पचवण्याची ताकद असणारा नवरा तिला हवा होता. पण आपल्या वागणुकीने नकार येणार, यात तिला काही शंका नव्हती. थोड्या वेळाने महेंद्र मित्रांसह जायला निघाला. जाताना तो म्हणाला ‘‘मुलगी पसंत आहे, मला अशीच बायको पाहिजे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com