esakal | काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी
sakal

बोलून बातमी शोधा

काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी

जन्म झाल्यानंतर काही तासातच मुलाच्या पोटात अंगठी गेल्यानं नातेवाईकांच्या आनंदाची जागा मोठ्या काळजीने घेतली.

काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी

sakal_logo
By
सूरज यादव

दौंड - प्रसुती वेदना सुरु झाल्या.. नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं म्हणून सिझेरियन केलं. गोंडस मुलाचा जन्म झाला. सगळं घरच बाळाच्या कौतुकात रमलं होतं. त्याचं लाड करण्यासाठी काय करू आणि काय नको अशीच स्थिती झाली होती. दरम्यान, नवजात बाळाच्या ओठाला, जिभेला सोनं लावण्याची प्रथा काही ठिकामी आहे. त्यासाठी नातेवाईक महिलांनी 1 ग्रॅम सोन्याची अंगठी जिभेला लावली. त्यावेळी बाळाने ती अंगठी गिळली. मात्र कुणाच्याच लक्षात ही बाब आली नाही.

अंगठी दिसेना म्हणून शोध घेतला पण सापडली नाही. तेव्हा बाळाने गिळली अशी शंका आली आणि त्याचा एक्सरे काढला. तेव्हा बाळाच्या पोटात अंगठी असल्याचं दिसलं. त्यानंतर तातडीनं बाळाला पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले. तेथे डॉ. कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून रुबी हॉल दवाखान्यात दाखल करून घेतले. डॉ. किरण धनंजय शिंदे (मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ञ) यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केडगाव ( ता. दौंड ) येथील पल्लवी रोहित शेळके यांची एका खाजगी रुग्णालयात दि. ८ जुलै रोजी रात्री प्रसूती झाली. जन्म झाल्यानंतर काही तासातच मुलाच्या पोटात अंगठी गेल्यानं नातेवाईकांच्या आनंदाची जागा मोठ्या काळजीने घेतली. मात्र वेळेत ही बाब लक्षात आल्यानं आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे अंगठी काढण्यात आणि बाळाचा जीव वाचवण्यात यश आलं.

हेही वाचा: पुणे : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची धिंड

अवघ्या काही तासांच्या बाळाच्या जीवाला रिंग मुळे धोका उद्भवू शकत होता. टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती या सर्व गोष्टी विचारात घेवून नातेवाईकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाईकांनी परवानगी दिली.

भूलतज्ञ डॉक्टर नंदिनी लोंढे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाला पूर्ण भूल दिली. डॉक्टर किरण शिदे पाटील यांनी अतिशय सावधगिरीने आपले सर्व कौशल्य पणाला लावून डॉ नंदिनी लोंढे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अंगठी अलगदपणे पोटातून काढली. थोड्या वेळाने बाळ रडत असल्याची खातरजमा करून यशस्वी रित्या वॉर्डमध्ये नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.

डॉक्टर किरण धनंजय शिंदे म्हणाले की, लहान मुले बऱ्याच वेळा पैशाचे नाणे, क्लिप, पिन, खिळा, स्क्रू, पेन्सिल आशा बाहय वस्तू गिळतात. पण नुकत्याच जन्मलेल्या बाळाने काही तरी बाह्य वस्तू गिळणे ही दुर्मिळ घटना आहे. कोणत्याही वस्तू मुळे आतडे बंद होण्याची, आतड्याला जखम होण्याची शक्यता असते. विना शस्रक्रिया दुर्बिणी द्वारे अंगठी काढताना भूल तज्ञ डॉ. नंदिनी लोंढे आणि सर्व टीमची मदत झाली.

loading image