esakal | आपल्याला काय करायचंय म्हणा!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

आपल्याला काय करायचंय म्हणा!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘कशी आहेस संगीता? बरेच दिवस आवाज ऐकला नाही. म्हटलं आहेस की की

गेलीस... माहेरी.’’ मालतीने विचारले. तिला दारात बघून संगीताच्या चेहऱ्यावर हसू फुललं. गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून सोसायटीतील कसलीच खबरबात तिला मिळाली नव्हती. शिवाय टाइमपास होत नव्हता. मालती आल्याने दोन्ही गोष्टी होणार होत्या.

‘संगीता, मी आता खूप घाईत आहे. दहा मिनिटांवर मला काही थांबता यायचं नाही.’ असं म्हणत मास्क नीट करत ती आत आली. ‘मी खूप घाईत आहे’ हे वाक्य तिने म्हटल्याने पुढील तीन -चार तास ही बया इथून हलायचे नाव घेणार नाही, याची खात्री संगीताला पटली. मग तिने मालतीचा फोन चार्जरला लावला.

‘अगं, दर तीन- चार तासांनी मोबाईल चार्ज करायला लागतो. मला बाई दोन- तीन मिनिटंच फोनवर बोलायला आवडतं. काही बायका तास- दोन तास खुशाल गप्पा मारतात. पण कधीकधी समोरची बाई जर बोलतच सुटली असेल तर मलाही नाईलाजाने तास- दोन तास बोलावे लागते. बरं ते जाऊ दे. लस घेतली का नाही"? मालतीने विचारले.

'अगं दोन - तीन वेळा रांगेत उभे राहिले पण नंबरच आला नाही." संगीताने असं म्हटल्यावर मालती फसकन हसली.

‘रांगेचे फायदे तुला कसे कळणार म्हणा? आपल्या सी विंगमधील माधवीचं रोज रांगेत उभं राहूनच शेजारच्या गल्लीतील अविनाशशी जमलं. आता दोघे लशीच्या नावाखाली हुंदडतायत गावभर. आपल्याला काय करायचं म्हणा. मी बाई नसते कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण डोळ्यांना दिसतं म्हणून बोलते.

हेही वाचा: पुण्यात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अखेर प्रशांत जगताप यांची निवड

तुझे मिस्टर कोठे दिसेनात’’? मालतीने विचारले.

‘अगं ते बाहेर गेले आहेत.’’ संगीताने म्हटले.

‘अगं संचारबंदीच्या काळात बाहेर जाताना काळजी घ्यायला सांग. नाहीतर त्या ए विंगमधील प्रधानांसारखे व्हायचे. सहज फिरायला म्हणून बाहेर पडले आणि पोलिसांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. आता तीन- चार दिवसांपासून सोफ्यावर साधं बसता येईना. आपल्याला काय करायचंय म्हणा.’ मालतीने म्हटलं.

‘मालती, बी विंगमधल्या कोळसेकरांना कसला अपघात झालाय गं. डाव्या पायाला प्लॅस्टर केलंय.’ संगीताने सहज विचारले.

‘डोंबलाचा आलाय अपघात. तो कोळसेकर पक्का बनेल माणूस आहे. तीन आठवड्यांपूर्वी संचारबंदी लागू झाली. त्यावेळी त्यांची कंपनीही बंद झाली. लॉकडाऊनच्या काळात बायको सगळं घरकाम करून घेते, हा त्याचा मागचा अनुभव आहे. त्यामुळे परत घरकाम बोकांडी बसायला नको म्हणून कंपनीतून येतानाच त्याने एका पायाला प्लॅस्टर केलंय. आता त्याची बायको बसलीय त्याची सेवा करत आणि हा बसलाय मेवा खात. आपल्याला काय करायचं म्हणा.’’ मालतीने म्हटले. मग मालतीताईंनी सोसायटीतील अनेक घरांची कुंडली मांडली. कोणाची सून का नांदत नाही? कुणाचं कुणाशी सूत जुळलंय? पैसा खाताना कोण पकडलं गेलं? कोणाचा मुलगा रोज दारू पितोय अशी सगळी माहिती त्यांनी संगीताला पुरवली. मात्र, प्रत्येक कहाणीच्या शेवटी ‘आपल्याला काय करायचं म्हणा’ हे पालुपद ठरलेलं असायचं. चार तास कसे गेले, हे दोघींनाही कळलं नाही. तेवढ्यात संगीताचा नवरा बाहेरून आला. ‘‘अहो मालतीताई, तुमचा नवरा दारू पिऊन, सोसायटीबाहेर कुत्र्यांबाहेर भांडत बसलाय. केवढी गर्दी जमलीय. सगळेजण तुम्हाला केव्हापासून शोधतायत.’ हे ऐकून मालतीचा चेहरा पडला.

‘आमचे हे कधी दारू पीत नाहीत पण मित्रांच्या नादाने थोडी पिली असेल. आपल्याला काय करायचं म्हणा.’ शेवटचं सवयीचं वाक्य बोलत ती लगबगीने बाहेर पडली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा