esakal | अशाने कधी होणार लग्न?
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

अशाने कधी होणार लग्न?

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘अहो, दीपिकाला पाहण्यासाठी आज सांगलीवरून पाहुणे मंडळी येणार आहेत. त्यामुळे पोलिस असल्यासारखी त्यांची उलटतपासणी घेऊ नका. तुमच्या या वागण्याने दहा लग्नं मोडली आहेत.’ मालतीताईंच्या या इशाऱ्यावर जनुभाऊंना राग आला. मात्र, ‘‘मी आता तोंडाला कुलूपच लावतो. पाहुण्यांसमोर एक अक्षरही बोलणार नाही,’’ असं म्हणून खिडकीतील कुलूप त्यांनी उचललं. ‘याची चावी कुठंय?’ त्यांनी विचारलं. ‘इश्श! असं कोणी तोंडाला कुलूप लावतं का?’’मालतीताईंनी असं म्हणताच जनुभाऊ चिडले. ‘‘अगं, गोडाऊनला फक्त कडी घातलीय. तिथे हे कुलूप लावून येतो,’ त्यांनी असं म्हटल्यावर मालतीताईंनी चावी दिली. ‘पाहुण्यांसमोर चटेरी-पटेरी लेंगा आणि बनियनवर राहू नका. चांगले इस्त्रीचे कपडे घाला. मागं शिरूरचे पाहुणे आले होते, त्या वेळी त्यांच्यासमोर भोकं पडलेला बनियन घालून आमची शोभा केलीत, तेवढी पुरेशी आहे. मुलीच्या वडिलांना चांगलं बनियन नाही म्हणून त्यांनी लग्न मोडलं होतं.’’

त्यावर काहीसं चिडून जनुभाऊ म्हणाले, ‘‘उगाचंच मागचं उगाळत बसू नकोस. इस्त्रीला दिलेले कपडे आणण्यासाठीच मी कात्रजच्या चौकात चाललोय.’’ असे म्हणून जनुभाऊ घराबाहेर पडले. पंधरा- वीस मिनिटांनी इस्त्री केलेल्या कपड्यांचा गठ्ठा हाती घेऊन, रस्त्यातील पाण्याने भरलेले खड्डे चुकवण्याची त्यांची कसरत चालू होती. तेवढ्यात एका मोटारीने त्यांच्या अंगावर पाणी उडवले. त्यामुळे हातातील इस्त्रीचे कपडेही खराब झाले. ते पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी चालकाला दोन-तीन शिव्या हासडल्या. तेवढ्यात ती गाडी सिग्नलला थांबल्याचे त्यांच्या लक्षात आले. जनुभाऊ पळत जाऊन गाडीसमोर उभे राहिले. ‘‘गाडी बाजूला घ्या,’’ असं त्यांनी आवाज चढवत म्हटले.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी नगरसेवकानेच दिली आरोपीच्या खूनाची सुपारी

चालकाने गाडी बाजूला घेतली. ‘‘लोकांच्या अंगावर चिखल उडवून कोठे पळून चाललाय? मी तुम्हाला आता सोडणार नाही. समोरच्या पोलिस ठाण्यात चला.’’ रुद्रावतार धारण करून जनुभाऊ बोलले. ‘‘सॅारी आजोबा. खड्ड्यांचा अंदाज आला नाही.’’ साठीतील एका गृहस्थाने विनवणी करत म्हटले. ‘‘तुम्ही आजोबा कोणाला म्हणताय? तुमच्या माझ्या वयात काही फरक आहे का?’’ जनुभाऊ कडाडले. ‘‘सॅारी मित्रा’’ मघाचेच ते गृहस्थ बोलले.‘‘तुम्ही माझी काय चेष्टा चालवलीय काय?’’ जनुभाऊ जोरात बोलले. रस्त्यातील हे भांडण बघण्यासाठी आता बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जनुभाऊंना आणखी चेव चढला. ‘‘असल्या खटारा गाडीतून प्रवास करताय म्हणजे विमानात बसल्याचा आव आणू नका. असल्या गाड्या किलोवर भंगारात मिळतात, त्यामुळे गाडीची मिजास मला दाखवू नका.’’ जनुभाऊ किमान शब्दांत कमाल अपमान करत होते. ‘‘तुम्ही माझ्या अंगावरील व हातातील इस्त्रीचे कपडे खराब केले आहेत.

कपडे धुण्याचे व इस्त्रीचे पाचशे रुपये व कपडे खराब करून माझा अपमान केल्याचे पाचशे रुपये असे एक हजार रुपये मला नुकसानभरपाई द्या. नाहीतर पोलिस ठाण्यात चला. तुम्हाला खडी फोडायलाच पाठवतो,’’ जनुभाऊंनी रागाने म्हटले. मग गाडीतील माणसं व जनुभाऊ यांच्यात बराचवेळ वाद होत राहिला. शेवटी जनुभाऊंना एक हजार रुपये मिळाले. मग खुशीत शीळ घालत जनुभाऊंनी पाहुण्यांसाठी पाचशे रुपयांची फळे व मिठाई घेतली. घरी आल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मघाशी ते ज्यांच्याशी तावातावाने भांडत होते, तीच मंडळी दीपिकाला पाहण्यासाठी आली होती. आता हेही स्थळ आपल्या हातून जाणार याची त्यांना खात्री पटल्याने जनुभाऊ मटकन खाली बसले.

loading image