धुळीचे लोळ; मनात कल्लोळ | SL Khutwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
धुळीचे लोळ; मनात कल्लोळ

धुळीचे लोळ; मनात कल्लोळ

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

पुण्याच्या मध्यवस्तीसह शहरात दररोज उठणारे धुळीचे लोट पाहून, एखाद्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे का? अशी शंका आम्हाला येऊ लागली. बरं हे चक्रीवादळ दररोज पुण्यालाच का धडका देतंय, याचंही आम्हाला आश्‍चर्य वाटू लागले. जागतिक हवामान बदलाचा हा परिणाम असावा, असा एक निष्कर्ष आम्ही नेहमीप्रमाणे काढला. सध्या आम्ही पुण्यापासून दूर एका खेडेगावी मुक्कामी असलो तरी पुण्याविषयी कमालीची आत्मीयता आहे. त्यामुळेच धुळीचे लोट दिसत असल्याने काहीतरी गंभीर मामला आहे, अशी शंका आम्हाला आली. त्यामुळे घटनास्थळी भेट दिल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता.

आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्यातील मध्यवस्तीत दाखल झालो. पण समोरचं दृश्‍य पाहून आम्ही रिक्षावाल्यावरच डाफरलो. ‘‘आम्ही मध्यवस्तीत सोडायला सांगितलं होतं. कोठल्या खेडेगावात आणून सोडलंय?’ असे खडे बोल त्याला सुनावले. कारण जिकडे तिकडे खोदलेले रस्ते, सगळीकडे पसरलेला राडारोडा, मोठमोठे खड्डे पाहून आम्हाला ही शंका आली.

‘साहेब, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच सोडलंय.’’ असं त्याने छातीठोकपणे सांगितले. खरंच की आम्ही शहराच्या मध्यवस्तीतच होतो.

‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही,’ असं म्हणून अनेकजण हळहळत असतात. त्याची प्रचिती आम्ही घेत होतो. ‘पुणे बदललंय’ असंही अनेकदा आम्ही ऐकलंय पण ते ‘इतकं’ बदललेलं असेल, असं वाटलं नव्हतं. आमच्या गावाकडील रस्तेही यापेक्षा चांगले असल्याचा आम्ही अनुभव घेत आहोत.

‘एवढे मोठे मोठे खड्डे येथे खणले आहेत. मोटोक्रॉस स्पर्धा आयोजित केल्या आहेत का?’’ आम्ही हा प्रश्‍न शेजारील कपड्यांच्या दुकानात जाऊन विचारला.

हेही वाचा: ‘ती’च्या शोधामुळे खगोलशास्रात नवा अध्याय

‘उद्या तुम्ही आमच्या दुकानात येऊन, बाकरवडी कशी किलो आहे, असे विचाराल. आमचा संबंध आहे का त्याच्याशी? तुम्हाला कपडे घ्यायचे असतील तर तसा प्रश्‍न विचारा. नाहीतर फुटा.’’ दुकानदार आमच्यावर चांगलाच तडकला. ‘पुणे कितीही बदलले तरीही ग्राहकाचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याचा गुणधर्मात काहीही फरक पडला नसल्याचे पाहून आम्हाला आनंद वाटला. थोडावेळ आम्ही रस्त्याच्याशेजारी थांबलो. त्यावेळी मातीमिश्रित रस्त्यांवरून धुळीचे लोळ उडत असल्याचे आम्हाला दिसले. गावातून दिसणारे हेच लोट आहेत, याची आम्हाला खात्री पटली. कोरोनापेक्षाही या धुळीपासून वाचण्यासाठीच काहीजण मास्क घालत असल्याचे आम्हाला समजले. एकाच दगडात दोन पक्षी मारण्यात पुणेकरांचा हात कोणी धरणार नाही, हे आम्ही अनुभवत होतो. मात्र, तरीही शेजारील ‘श्‍वसन विकारतज्ज्ञ’ अशी पाटी असणाऱ्या क्लिनिकमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होती. काहीजण पहाटेपासूनच रांगेत उभे होते, असे त्यांच्या बोलण्यावरून कळले.

त्यानंतर आम्ही रस्ते खोदणाऱ्या व्यक्तींकडे गेलो. ‘‘तेच ते रस्ते तुम्ही सारखे सारखे का खोदता?’’ असा प्रश्‍न आम्ही विचारला.

त्यावर तो म्हणाला, ‘‘साहेब, आधी तुम्ही सिस्टीम समजावून घ्या मग आम्हाला बोल लावा. रस्ता खोदणे, पाइपलाइन टाकणे व त्यानंतर खड्डे बुजविणे यासाठी तीन गट काम करत असतात. पहिला गट जेसीबीने रस्ता खोदतो. दुसरा गट त्यात पाइप टाकतो व त्यानंतर तिसरा गट ते बुजवतो. मी तिसऱ्या गटातील आहे. मात्र, अनेकदा पाइप टाकणारा दुसरा गट कामावर येत नाही वा कामचुकारपणा करतो. अशावेळी आम्ही काय करावं? पाइपलाइन टाकणाऱ्यांची आम्ही काही तास वाट पाहतो. समजा ते आले नाहीत तर आम्ही आमचे बुजवण्याचे काम करतो. सोपवलेलं काम आम्ही इमाने इतबारे करतो. मात्र, दोन-तीन दिवसांनी पुन्हा आमच्या वरिष्ठांच्या लक्षात येतं की ‘अरे आतमध्ये पाइपच टाकले नाहीत.’ मग पुन्हा खोदाखोदी सुरू होते. वर्षभर असं सारखं चालू राहतं. साहेब, या एकाच रस्त्यावर माझ्यासारखे शेकडो लोक आनंदाने पोट भरत आहेत.’’ त्या कामगाराचं बोलणं ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं. एक रस्ता वा एका खड्डा कितीजणांचे आयुष्य मार्गी लावतो, हे पाहून आम्ही त्या रस्त्यासकट खड्ड्यालाच साष्टांग दंडवत घातला.

loading image
go to top