esakal | राहा सतत आनंदी अन् हसतमुख; खोटं बोलण्यातही मिळवा सुख!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

राहा सतत आनंदी अन् हसतमुख; खोटं बोलण्यातही मिळवा सुख!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

वयाच्या पन्नाशीतही सतत हसतमुख, चेहऱ्यावर तजेला आणि काळेभोर केस याचं काय रहस्य आहे? असा प्रश्न तीन-चार मित्रांनी आशिषला विचारला. मात्र, केवळ स्मितहास्य करून त्याने उत्तर देण्याचे टाळले. प्रदीप मात्र त्याच्या खनपटीलाच बसला.

तो म्हणाला, ‘अरे सांग ना! चाळिशीतच आमचे सगळे केस पांढरे झाले. चेहऱ्यावर सतत तणाव घेऊन कसं तरी आम्ही जगतो. बायकोच्या भावाचं पाच हजारांचं पाकीट तीन महिन्यांपूर्वी मारलं. त्या वेळी फक्त मी एकदा हसलो. त्यानंतर आजतागायत चेहऱ्यावर स्मितरेषाही नाही. तुझं रहस्य सांग.’ यावर आशिष म्हणाला, ‘वयाच्या पन्नाशीतही केस काळे राहण्याचे रहस्य सांगतो. दररोज सकाळी तळजाईवर फिरायला जायचं. तासभर योगासने आणि अर्धा तास शीर्षासन करायचं.’ त्यानंतर हळू आवाजात तो म्हणाला, ‘हे सगळं सुरू असतानाच दर पंधरा दिवसांनी ‘हेअर डाय’ न चुकता करायचं. सलूनमध्ये केलं तर उत्तमच. तिथं नाही जमलं तर घरी करायचं.’ त्यावर मंगेशने त्याच्या डोक्यात टपली मारली.

हेही वाचा: मनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश

‘बरं केसांचं रहस्य समजलं. पण सतत हसतमुख कसा काय राहतोस?’ धीरजच्या या प्रश्‍नावर आशिष गंभीर झाला. ‘घरी काडीचंही काम करायचं नाही. सतत लोळत राहायचं. पण ‘मी हे काम करणार नाही,’ तसेच ‘मला हे जमणार नाही,’ असं कधी चुकूनही म्हणायचं नाही. उलट बायकोला ‘थांब, तुझ्यासाठी मी चहा करतो,’ असं म्हणून चहा करायचा. पण त्यात साखरच टाकायची नाही. उलट बिनसाखरेचा कप तिच्यापुढे ठेवून, ‘यातील चहाचा एक घोट घे ना. म्हणजे चहा गोड होईल,’असे विनोद करायचे. मग बायको लाजून ‘‘तुम्ही म्हणजे असे आहात ना!’ असे म्हणून परत आपल्याला हवा तसा चहा करते. तिचा मूड खुलल्याने आपलाही दिवस बरा जातो. जेवणाचेही तसेच करायचं. ‘‘तू आज फेसबुकवर फिरून ये. मी स्वयंपाक करतो,’ असं म्हणून भाजीत मुद्दाम तिखट-मीठ जास्त टाकायचं. तीन-चार वेळा असं जेवण बेचव करून ‘तुझ्या हाताची चव कोणाऽ कोणाऽऽला नाही,’ असं म्हणत राहायचं. बायको एकदम खूश होते. त्यानंतर ती आपल्याला किचनमध्ये पाऊल टाकून देत नाही. आपल्यालाही तेच हवं असतं. मग काय आपण खूश अन् बायकोही खुश! हे आहे माझ्या खुशीचे रहस्य.’ आशिषने असं म्हटल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला दाद दिली. त्यानंतर पुढील आठवड्यात ही सगळी मित्रमंडळी सहज आशिषच्या घरी गेली. त्या वेळी समोरचं दृश्य पाहून ते अवाक् झाले. आशिषची बायको निवांत टीव्ही बघत होती, तर आशिष लादी पुसून घामाघूम झाला होता. मित्रांना अचानक दारात असं पाहून त्याची भंबेरी उडाली. कसनुसं हसत त्याने बसायला सांगितले. ‘लादी पुसून झाल्यावर दहा मिनिटांत भांडी घासतो. त्यानंतर थोडी कपडे आहेत. ती धुतो. मग निवांत बोलू.’ असं म्हणून त्याने कामाला जुंपून घेतलं.

किचनमधून तर दोन-तीन मिनिटांनी आशिषच्या तोंडून ‘सॅारी, सॅारी’ असे शब्द ऐकायला येत होते. ते ऐकून मित्रांची चांगलीच करमणूक झाली. तासाभरानं कामं आटोपल्यानंतर आशिष हात पुसत हॉलमध्ये आला. ‘अरे! घरी काडीचंही काम करीत नाही, हे सतत हसतमुख राहण्याचं कारण आहे, असं तू सांगितलं होतंस आणि हे काय?’’ दिनेशने विचारले. ‘मी हसतमुख व तणावमुक्त राहण्याची जी कारणं सांगितलीत, ती अगदी बरोबर आहेत. फक्त त्यात एक कारण राहिलंय.’’ आशिषने म्हटले. ‘कोणतं?’ सगळ्यांनी एका सुरात विचारलं. त्यावर आशिष म्हणाला, ‘खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं.’

loading image