बाकडे, पिशवी अन् बकेट कार्यकर्त्यांची घेतली विकेट

‘नमस्कार सर, आम्ही नगरसेवक कुसळे यांच्याकडून आलो आहोत. बकेट व ज्यूट बॅंगांची ॲडव्हान्स बुकिंग करतोय. शिवाय तुमच्या सोसायटीत किती बाकडी हवी आहेत, तेही सांगा.
Panchnama
PanchnamaSakal

‘नमस्कार सर, आम्ही नगरसेवक कुसळे यांच्याकडून आलो आहोत. बकेट व ज्यूट बॅंगांची ॲडव्हान्स बुकिंग करतोय. शिवाय तुमच्या सोसायटीत किती बाकडी हवी आहेत, तेही सांगा. त्याआधी तुमच्या घरात किती मतदार आहेत, त्याची माहिती द्या.’’ एका कार्यकर्त्याने जनुभाऊंना विचारले. त्यावर जनुभाऊंनी ‘आम्ही खाऊन-पिऊन सुखी आहोत. कृपया आजी व भावी नगरसेवकांनी कोणतेही गिफ्ट देण्याचा आगाऊपणा करू नये. अन्यथा विरोधकांना मतदान करून, तुमचा निषेध केला जाईल.’ या पाटीकडे बोट दाखवले.

‘ही पाटी काय आमच्या दाराची शोभा वाढवण्यासाठी लावली आहे का?’’ जनुभाऊंनी कार्यकर्त्यांना धारेवर धरले.

‘आम्ही पुण्यात राहत असल्यानं पाट्यांचं एवढं मनावर घेत नसतो. ‘येथे गाडी पार्क करू नये’ अशी पाटी लावलेल्या ठिकाणीच मी आता गाडी पार्क केली आहे. ‘येथे कचरा टाकू नये’ असे कोपऱ्यावर लिहिलं होतं. तिथंच आम्ही दोन बकेट कचरा टाकलाय.’’ एक कार्यकर्ता फुशारकीने म्हणाला.

‘एवढा बेशिस्तपणा अंगी असेल तर तुम्ही ताबडतोब निघा. अन्यथा शिस्तीत अपमान केला जाईल.’’ जनुभाऊ कडाडले.

‘बरं ते जाऊ द्या. बकेट व ज्यूट बॅगांशिवाय तुम्हाला आणखी काय हवंय का?’’ दुसऱ्या कार्यकर्त्याने प्रेमाने विचारपूस केली.

‘हवंय ना ! आमच्या घराचे पोपडे उडालेत. त्यामुळे संपूर्ण घराला कलर करा. शिवाय किचनही खराब झालंय. तिथं नवीन किचन ट्रॉली बसवा आणि बेडरूमला स्टायलिश फरशी बसवा.’’ जनुभाऊंनी कुत्सितपणे म्हटले.

‘अहो वाट्टेल ते काय सांगताय? याचा खर्च महापालिका देणार आहे का? महापालिकेच्या पैशातूनच आमचे नगरसेवक कुसळे गिफ्ट देणार आहेत. ‘खर्च महापालिकेचा पण वस्तूंवर नाव आमच्या साहेबांचं’ अशी ती योजना आहे. शिवाय तुमच्या घराला रंगकाम करून दिल्यावर आमच्या साहेबांचं नाव कोठं टाकायचं.?’’ दुसरा कार्यकर्ता म्हणाला.

Panchnama
पुणे जिल्हा फेरफार नोंदीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

‘संपूर्ण रंगकाम करा आणि त्याखाली ‘सौजन्य ः नगरसेवक कुसळे’ असे लिहा. नाहीतरी गल्लोगल्ली कशावरही सौजन्य - अमके तमके नगरसेवक असं असतंच की. उलट लोकांची घरं रंगवून दिल्यावर लोकं तुम्हाला दुवा देतील. ’’ जनुभाऊंनी हसत म्हटलं.

‘लोकांची घरं रंगवून द्यायला लागल्यावर आमच्या साहेबांचं दिवाळं निघेल. दोन-तीन मतांसाठी एवढा खर्च करणे परवडेल का? शिवाय आमचं घर रंगवून द्या, अशी मागणी अजून कोणत्याही मतदाराने केलेली नाही.’’ एका कार्यकर्त्याने हिरिरीने मुद्दा मांडला. ‘‘अगदी बरोबर बोललात. जसं आमचं घर रंगवून द्या, हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्या नगरसेवकांकडे जात नाही. त्याचप्रमाणे आम्हाला बकेट, पिशव्या व बाकडी द्या, अशाही मागण्या आम्ही कधी करत नाही. उलट आम्हाला नको असलेल्या गोष्टी आमच्या माथी का मारता?’’ जनुभाऊंनी तात्त्विक संताप व्यक्त केला.

‘मग दुसऱ्याच्या खर्चाने आमच्या साहेबांची फुकट जाहिरात कशी होणार? पाच वर्षांत आम्हाला काय दिले? या मतदारांच्या प्रश्‍नावर काय उत्तर देणार? आणि अशा वाटपातून फायदा मिळवून निवडणूक कशी लढवणार?’ या तिन्ही प्रश्‍नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे ‘बकेट, पिशव्या आणि बाकड्यांचे वाटप’’ तिसरा कार्यकर्ता असे बोलल्यावर जनुभाऊंच्या संतापात भर पडली. ‘पण प्रत्येक नगरसेवकाने दिलेल्या बकटेचं आम्ही करायचं काय’? असे म्हणत जनुभाऊ आत गेले व त्यांनी दहा-बारा बकेट कार्यकर्त्यांच्या पुढ्यात आपटली. ‘गेल्या निवडणुकीत वाटलेली ही बकेट आहेत. ती तशीच पडून आहेत. जो येतो, तो हेच वाटतो. याचं आम्ही काय लोणचं घालायचं काय?’ असं त्यांनी खडसावून विचारलं. ‘आमच्या पुढील चार पिढ्यांची बकेटची सोय झाली आहे. त्यामुळे भावी नगरसेवकांनी आम्हाला पाचव्या पिढीसाठी बकेटचा आग्रह करू नये.’ अशी नवीन पाटी जनुभाऊंनी लावून कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com