esakal | असं नाही तर तसं; पण शेवटी जिरवलीच
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

असं नाही तर तसं; पण शेवटी जिरवलीच

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘अहो, तुमच्या आवडीचे बटाटेपोहे केलेत,’ असे मधाळ सुरात म्हणत माधवीने मंगेशच्या हातात डिश दिली. त्यानंतर दहा मिनिटांनी न मागताच मसाला चहा दिल्याने त्याला एकदम संशय आला. बायको गोड बोलायला लागली, की खिसा हलका होतो, असा त्याचा अनुभव होता. त्यामुळे त्याने पाकीट काढून पैसे मोजले. एक हजारच भरत होते. ‘अहो, येत्या रविवारी महिला मंडळाची भिशी आहे, त्यासाठी मला कांजीवरम साडी घ्यायची आहे. मला दहा हजार रुपये द्या ना. त्या बी विंगमधील नेहाची चांगलीच जिरवते. आज सकाळी मुद्दाम मला पैठणी दाखवायला आली होती.’ दात-ओठ खात माधवीने म्हटले.

‘अगं अजून कोरोना आहे. कशाला भिशी वगैरे?’ मंगेशने समजावत म्हटले. ‘‘तुम्हाला काय करायचंय आमच्या भिशीचं? नाहीतरी माझ्याकडे एकही चांगली साडी नाही.’ असे म्हणून तिने कपाट उघडून दाखवले. त्यातील शेकडो साड्या पाहून मंगेशचे तर डोळेचे दिपले. ‘आता का डोळे मिटताय. यात एकतरी साडी आहे का चांगली?’’ माधवीने रागाने विचारल्यावर मंगेशने घाबरून ‘नाही’ म्हणत मान डोलावली. शेवटी पुढचा समरप्रसंग टाळण्यासाठी मंगेशने दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, ते देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. आपल्याला उसने पैसे कोण देऊ शकतो, याची यादी त्याने मनातल्या मनात केली. महेश आणि योगेशची नावे त्याच्या डोळ्यांसमोर आली. दोघांकडे पैसे मागितल्यावर एक जण तरी देईल, याची त्याला खात्री होती. मात्र फोन करून पैसे मागण्याचा त्याला खूप संकोच वाटला. त्यापेक्षा मेसेज करण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार त्याने फेसबुकवरील मेसेंजरवर ‘मी खूप अडचणीत आहे. दहा हजार रुपये तातडीने माझ्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करा,’ असा मेसेज पाठवला व सोबत बॅंक डिटेल्सही पाठवले. एवढी माहिती पाठवल्यावर त्याच्या मनावरील ओझे कमी झाले. शेवटी मित्रच अडचणीला धावून येतात, असं त्याने अनेक ठिकाणी वाचलं होतं. त्याचा प्रत्यय त्याला येणार होता.

हेही वाचा: ड्रोनच्या धोक्यावर अत्याधुनिक यंत्रणांचा उतारा

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तो फेसबुकवर पडीक होता. मात्र, महेश आणि योगेशच्या पोस्टने त्याला मोठा धक्का बसला. दोघांनीही मंगेशने केलेल्या पैशांच्या मागणीचा स्क्रीनशॉट व्हायरल करत ‘मंगेशचे फेसबुक अकाउंट कोणीतरी ‘हॅक’ केले असून, त्याद्वारे पैशांची मागणी केली जात आहे. कोणीही त्या बॅंक डिटेल्सवर पैसे पाठवू नका. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.’ असा इशारा दिला होता. आता काय करायचे, असा त्याला प्रश्न पडला. त्याने माधवीला योगेशचा फेसबुकवरील मेसेज दु:खी अंत:करणाने दाखवला. ते पाहून माधवी आनंदाने ओरडलीच. ‘‘अय्या खरंच तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाले! किती छान ना! सकाळी ती नेहा काय नवऱ्याच्या बढाया मारत होती! ‘माझा नवरा असा’ अन् ‘माझा नवरा तसा’ माझा नवरा एवढा फेमस आहे, की मोठमोठ्या लोकांप्रमाणे त्यांचंही फेसबुक अकाउंट हॅक झालंय. कोणा ऐऱ्यागैऱ्याची फेसबुक अकाऊंट हॅक होत नाहीत? असं म्हणून आम्हाला टोमणे मारत होती. आता भिशीच्या वेळी ‘माझ्याही नवऱ्याचं फेसबुक अकाउंट हॅक झालंय,’ असं सांगून तिची चांगली जिरवतेच.’’ बांगड्या मागं सारत माधवीने म्हटलं.

loading image
go to top