esakal | पतीला आवडते क्रिकेट बायकोनेच घेतली विकेट!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पतीला आवडते क्रिकेट बायकोनेच घेतली विकेट!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘आयपीएल’चे सामने पुन्हा सुरू झाल्याने आशिष एकदम खूष होता. मात्र, जुन्या खोक्यासारख्या टीव्हीवर मॅच बघण्यात त्याला मजा वाटत नव्हती. आता कसंही करून ४२ इंची एलसीडी घ्यावा, अशी त्याची फार इच्छा होती. आता त्याला ‘आयपीएल’चं निमित्तही मिळालं होतं. पण एवढ्या खर्चाला माधवी मंजुरी देणार नाही, याची त्याला खात्री होती. त्यासाठी तिचा मूड बघून विषय काढायला हवा होता. आज सकाळी उप्पीटचा नाश्ता केल्यानंतर माधवीला खूष करण्यासाठी आशिष म्हणाला, ‘‘माधवी, आज काय मस्त उप्पीट केलं होतंस. खरंच तुझ्या हाताला एक नंबर चव आहे. व्वा! अजून चव जिभेवर रेंगाळतेय.’’ त्यावर दात-ओठ खात माधवी म्हणाली, ‘‘आजचं उप्पीट तुम्हाला आवडणारच कारण ते शेजारच्या सुमनवहिनींनी दिलं होतं. मी इतकी वर्षे राब राब राबून स्वयंपाक करते पण कधी कौतुकाचा एक शब्द नाही. माझ्या मेलीच्या कष्टाची कोणाला जाणीवच नाही.’’ माधवीनं असं म्हटल्यावर आशिषचा चेहरा पडला.

‘अगं तसं नाही’चा जप तो तासभर करू लागला. आपला बाण चुकीच्या ठिकाणी लागल्याने त्याने टीव्हीचा विषयच काढला नाही. संध्याकाळी तो टीव्ही पाहत होता. माधवीचा मूडही बरा होता. ‘‘छे...या सासू-सुनांच्या मालिका एवढुशा खोक्यात बघणं म्हणजे मोठी शिक्षाच आहे. पण जाऊ दे...मी एलसीडी घ्यायचा विचार करत होतो. पण ४० हजार रुपये खर्च करणे आपल्याला परवडणार नाही. त्या पैशात आपल्याला अजून काय काय घेता येईल. त्यामुळे मी ‘एलसीडी’ घ्यायचा नाही, असं ठरवून टाकलंय.’’ आशिषने चेहऱ्यावर भोळेपणा आणत म्हटलं. ‘‘क्काय! ‘एलसीडी’ घ्यायचा नाही, हे तुम्ही ठरवून टाकलं आणि तेही मला न विचारता. म्हणजे माझं काय मत आहे, हेही तुम्हाला विचारावंसं वाटलं नाही. बरोबर! मी आपली फुकटची मोलकरीण. मला कशाला तुम्ही किंमत द्याल.’’ माधवीने आकांडतांडव केला. ‘‘अगं आपल्याला हा खर्च झेपणार नाही म्हणून मी तसं म्हटलं.’’ आशिषने खुलासा केला. ‘‘तुम्ही कोण ठरवणार झेपणार की नाही ते? उद्याच्या उद्या घरात एलसीडी आला पाहिजे. नाहीतर बघा.’

माधवीने असा इशारा दिल्यावर आशिषच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. पण चेहऱ्यावर नाराजी दाखवत तो म्हणाला, ‘‘तू म्हणतेस म्हणून ‘एलसीडी’ घेतो. मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का’’ असे म्हणत लढाई जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. दुसऱ्याच दिवशी त्याने ‘एलसीडी’ आणला. दुपारी साडेतीनची व रात्री साडेसातची आयपीएलची मॅच त्याने त्यावर पाहिली. मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्याचा आनंद काही औरच आहे, याची त्याला जाणीव झाली. आता दसऱ्यापर्यंत हे सामने रोज नित्यनियमाने पाहायचे त्याने ठरवले. दसऱ्याला होणारा अंतिम सामना कोणात रंगेल, याचाही तो अंदाज बांधू लागला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो कामावरून घरी आल्यानंतर ‘आयपीएल’ बघण्यासाठी तो चॅनेल बदलू लागला. पण स्पोर्ट्स चॅनेल लागत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तेवढ्यात माधवी म्हणाली, ‘‘अहो, आपण चाळीस हजारांचा एलसीडी घेतलाय. आता आपल्याला एकेक रुपयाची बचत करून संसार केला पाहिजे. यासाठी मी डिश कंपनीला कळवून स्पोर्टस आणि इतर नको असणारे चॅनेल बंद केले. आता आपले दर महिन्याला तब्बल सत्तर रुपये वाचणार आहेत. अशी काटकसर केली तरच आपलं निभावून जाईल,’’ असे म्हणत तिने सासू-सुनांच्या मालिकेत लक्ष घातले.

loading image
go to top