esakal | वर्गणीची पावती अन् नियमांची आरती...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

वर्गणीची पावती अन् नियमांची आरती...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

लागोपाठ तीनदा बेल वाजल्याने जनुभाऊ वैतागून गेले. झटकन दरवाजा उघडून ते तरुण मुलांच्या अंगावर खेकसले. ‘दोनदा बेल वाजवूनही दार न उघडल्यास आपण सरळ फुटावे’ ही पाटी काय आम्ही दाराची शोभा वाढविण्यासाठी लावलीय का? कोणीही लुंग्यासुंग्याने उठायचे आणि आमच्या दाराची बेल वाजवायला आमची बेल म्हणजे काय मंदिरातील घंटा वाटली काय? अशानं आम्हाला बेलमधील सेल सतत बदलायला लागतात, याचा विचार कोणी केलाय? गेल्यावर्षी वर्षभरात दोनदा सेल बदलावे लागले, त्याचा भुर्दंड कोणी सोसायचा? जनुभाऊ चांगलेच रागावले.

‘आजोबा, त्यापेक्षा तुम्ही लाइटवरील बेल बसवा ना. ते स्वस्त पडतं.’’ एकाने सल्ला दिला. ‘‘ते आमचं आम्ही बघू. तुमचा सल्ला मागायला मी तुमच्या दारात आलोय का? आणि तुम्ही काय महावितरणची वकिली घेतलीय काय?’’ जनुभाऊंनी सुनावले.

‘बरं कामाचं बोला. मला वायफळ बोलायला अजिबात वेळ नाही.’’ असं म्हणून आपण पंधरा मिनिटे बोलत असण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ‘‘आजोबा, गणपतीची वर्गणी मागायला आलोय.’’ त्यातील एका तरुणाने धीर एकवटून म्हटले.

‘मी कालच तुम्हाला काय सांगितलं, तुमच्यातील एकाला तरी गणपतीची आरती व अथर्वशीर्ष म्हणता येतं का? जर येत नसेल तर सरळ फुटायचं.’’ जनुभाऊंनी म्हटले. ‘‘या बंटीला म्हणता येतं. काल आम्ही दिवसभर अशाच मुलांचा शोध घेत होतो. आता सगळ्यांची वर्गणी मिळेपर्यंत आम्ही त्याला सोबतच ठेवणार आहोत.’’ एका तरुणाने खुलासा केला. त्यानंतर बंटीने अथर्वशीर्ष व आरती म्हणून दाखवली.

‘आजोबा, झाले ना समाधान. द्या आता वर्गणी.’’ एका मुलाने म्हटले.

‘तुमच्या मंडळाच्या अध्यक्षांचे वर्गणी गोळा करण्याचे संमतीपत्र दाखवा. तसेच मंडळाच्या कार्यकारिणीच्या ठरावासह तुम्हालाच वर्गणी गोळा करण्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दाखवा. तसेच गेल्यावर्षीचे हिशेबपत्रकही दाखवा. एक सर्वसामान्य वर्गणीदार म्हणून हा माझा हक्क आहे. त्यामुळे या गोष्टी मला दाखवा.’’ जनुभाऊंच्या या बोलण्याने मुलांसमोर पेच पडला.

‘मी सगळी कागदपत्र घेऊन येतो.’ असं म्हणून एकजण पळत गेला. तोपर्यंत जनुभाऊंनी ‘आमच्या तरुणपणातील गणेशोत्सव’ या विषयावर उभ्या उभ्याच व्याख्यान दिले. अर्धा तासाने त्या मुलाने सगळी कागदपत्रे जनुभाऊंच्या हातात दिली. ‘‘आता तुमच्यापैकी जो पैशांचा हिशेब ठेवणारा आहे, त्याने त्याच्या आधारकार्डची झेरॉक्स मोबाईल नंबरसह पावतीला जोडावी. गेल्यावर्षी एकाच मंडळाच्या मुलांनी तीन-तीनदा वर्गणी मागितली. बरं मला त्यांची नावे सांगता येईनात. तुमच्यातील एखाद्याचा आधारकार्ड व मोबाईल नंबर असला की कोणाची हिंमत होणार नाही, असं करायची. मग एकजण आधारकार्ड आणण्यासाठी घरी आला. तोपर्यंत जनुभाऊंनी ‘वर्गणी मागण्यासाठी जाताना घ्यावयाची काळजी’ या विषयावर एक व्याख्यान दिले. अर्ध्या तासात त्या मुलाने आधारकार्ड आणले. जनुभाऊंनी सगळी कागदपत्रे पुन्हा तपासली व घरात जाऊन पैसे आणले.

‘ही घ्या तुमची वर्गणी. पटकन मला पावती देऊन टाका. मला अजिबात वेळ नाही,’’ असे म्हणून २१ रुपये एकाच्या हातावर ठेवले. ते पाहून एकजण शांतपणे म्हणाला, ‘‘आजोबा, एवढी मोठी वर्गणी कशाला? अकरा रुपयेही चालले असते. फक्त आमचे देखावे पाहायला येताना आधारकार्डबरोबरच घरच्यांचे व पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’, डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जवळ ठेवा. नाहीतर परत सांगितले नाही, असे म्हणाल.’’, असे म्हणून त्या तरुणाने‍ २१ रुपयांची पावती जनुभाऊंच्या हातात ठेवली.

loading image
go to top