भांडणाच्या आनंदाला रुसवा-फुगव्याचं कोंदण! SL Khutwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
भांडणाच्या आनंदाला रुसवा-फुगव्याचं कोंदण!

भांडणाच्या आनंदाला रुसवा-फुगव्याचं कोंदण!

‘अहो, नेट किती स्लो आहे. तुम्हाला कितीवेळा सांगितलं असेल ऑनलाइन काहीही घेत जाऊ नका म्हणून. कंपन्यांवाले आपल्या माथी भंगार मालच मारतात. गेल्या आठवड्यात तुम्ही ऑनलाइन टॉवेल मागवले होते. त्याची क्वालिटी एवढी खराब होती, की तुम्हाला हातरूमाल म्हणून त्यांचा वापर करावा लागतोय. तुम्ही ऑनलाइन रिचार्ज मारल्यानेच नेट स्लो चालतंय. तुम्ही आताच्या आता कोपऱ्यावरील दुकानातून रिचार्ज मारून या.’ रेशमाने जिभेचा पट्टा चालवत अरुणला सुनावले.

‘अगं नेट स्लो चालतंय तर तुझ्या जिभेला ते कनेक्ट कर ना. मग बघ नेटला ‘फाईव्ह जी’चा वेग येतोय का नाही?’ अरुणने टोमणा मारला.

‘तुमच्या जिभेला काही हाड आहे का? हल्ली तुमची जीभ फारच सैल सुटत चाललीय बरं का? तरी बंर तुमच्या जिभेचं चोचले पुरवण्यात माझं निम्मं आयुष्य गेलं, त्याची तरी जाणीव ठेवा. का उचलली जीभ लावली टाळ्याला! तुम्ही तुमच्या जिभेला लगाम घाला.’ रेशमा चिडल्यावर अरुण सावध झाला कारण तिचं चिडणं आणि रूसणं कमीत कमी दहा- बारा हजारांच्या आत येत नाही. अगदीच गेला बाजार पंखे पुसायची तरी शिक्षा मिळतेच, याची त्याला जाणीव होती.

‘अगं मी गंमत केली. थांब तुझ्यासाठी मी आलं घालून चहा करतो. तू थोडा वेळ व्हॉटसॲप चालव.’ असं म्हणत तो पटकन स्वयंपाकघरात गेला. ने स्पेशल दुधाचा चहा केला व दोन कप घेऊन तो दिवाणखान्यात आला.

‘आपल्या सेवेशी सादर,’ गुडघ्यावर टेकत त्याने चहाचा कप तिच्या हातात दिला. पहिला घोट पिल्यानंतर त्याने तोंड वेडेवाकडं केलं. गडबडीत चहात साखरेऐवजी आपण मीठच टाकल्याचं त्याच्या लक्षात आलं. रेशमानंही पहिला घोट पिल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘राणीसाहेब, तुम्ही एक घोट माझ्या चहाचा घ्या. म्हणजे सगळा गोडवा चहात उतरेल.’ अरुणने म्हटलं. त्यावर रेशमानं त्याच्याकडं रागानं बघितलं.

हेही वाचा: पुणे : भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

‘एक साधा चहा धडपणे करता येत नाही. मी केलेला पदार्थ मात्र जिभल्या चाटून खाता आणि वर माझ्याच जिभेला नावं ठेवता.’ रेशमाचं राग अजूनही कमी झाला नव्हता. त्यावर दोन्ही कान पकडून अरुणने ‘सॉरी’ म्हटले. त्याचं हे बावळट ध्यान व डोळ्यांतील प्रेम बघून ती खुदकन हसली. काही लढाया मुद्दाम हरण्यातही किती मजा असते, हे त्याला पुन्हा जाणवलं. थोड्यावेळानं अरुणने फ्रीजमध्ये ठेवलेला गजरा बाहेर काढला. आपल्या भांडणात गजराच आपल्याला सहीसलामतपणे बाहेर काढू शकतो, असा विश्‍वास त्याला असल्यानं फ्रीजमध्ये एकतरी गजरा तो ठेवून द्यायचाच. ‘यह रेशमी झुल्फे’ हे गाणं गुणगुणत रेशमाच्या केसात त्याने गजरा माळला. हे करताना गडबडीत त्याने गजऱ्याची एक बाजू क्लीपलाच बांधली.

‘अगंबाई ! हे काय करताय? आता चाळिशीत गजरा माळणं, बरं दिसतं का?’ असं म्हणत रेशमा गोड लाजली.

‘अगं तुझं हे लाजणं बघण्यासाठीच तर मी तुझ्याशी भांडण उकरून काढतो. तू लाजतेस तेव्हा किती गोड दिसतेस !

अगदी सोळा वर्षांएवढी! फक्त हा आकडा मागे-पुढे केला की झालं.’ शेवटचं वाक्य अरुण हळूच म्हणाला. पण सोळाचा आकडा मागे-पुढे केला, की ६१ होतात, हे तिच्या लक्षात आलं नाही.

‘चला! तुमचं आपलं काहीतरीच,’ असं म्हणून ती पुन्हा लाजली.

‘थांबा ! तुमच्यासाठी मी गरमागरम कॉफी करते.’’ रेशमाने उत्साहाने म्हटले.

‘चालेल. पण कॉफीत साखरच टाक बरं का? नाहीतर माझ्यासारखं मीठ टाकशील.’ असं अरुणने म्हटल्यावर दोघेही खळखळून हसले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Panchnama
loading image
go to top