esakal | शक्कल लढवली नामी, हातातले ओझे झाले कमी!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

शक्कल लढवली नामी, हातातले ओझे झाले कमी!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

दोन्ही हातांत भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन राजदीप जयश्रीच्या मागोमाग निमूटपणे चालला होता. ‘अहो पाय उचला की लवकर. या वेगानं चालल्यास संध्याकाळपर्यंत तरी घरी पोचू का? गोगलगायीचा स्पीड तुमच्यापेक्षा जास्त असेल?’ जयश्री त्याच्यावर रागावली.

‘हे काय आता पळतोच,’ असे म्हणून त्याने खिशातून रुमाल काढून घाम पुसला व चालण्याचा स्पीड वाढवला. घराशेजारील गल्लीतून हे दोघे भाजीपाला व किराणामाल आणण्यासाठी गेले होते. सुरुवातीला राजदीप येत नव्हता. ‘अहो, भाजीपाला, किराणा माल आणि थोडं मला शॉपिंगही करायचं आहे. एवढ्याशा वस्तूंसाठी कोणाला हमाली देणं मला परवडत नाही. शिवाय, एवढ्या कमी अंतरासाठी रिक्षावाले येत नाहीत. मी कुठं त्यांची मनधरणी करत बसू? तुम्ही असला की सगळेच प्रश्न सुटतात’, असं जयश्रीने म्हटल्याने तो नाइलाजाने तयार झाला. थोडं चालल्यानंतर राजदीपचा लग्नाआधीचा मित्र प्रवीण भेटला. राजदीपची ही अवस्था पाहून त्याला आश्चर्य वाटले. ‘राजदीप, अरे तुझ्या लग्नात आम्ही सगळे मित्र ‘आया है राजा!’ या गाण्यावर किती नाचलोय आणि मी आता काय बघतोय.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

लग्नानंतर माणूस बदलतो हे मी ऐकलं होतं. राजाचा थेट ओझं वाहणारा गाढव होतो, हे मी प्रथमच पाहतोय.’ पण त्याला हाताने इशारा करीत राजदीप म्हणाला, ‘‘अरे हळू बोल! बायकोने ऐकलं तर माझ्या जेवणाचे वांदे होतील,’ असे म्हणून प्रवीणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजदीप चालू लागला. थोडं चालल्यानंतर राजदीपची मामी आणि तिच्या तीन मैत्रिणी भेटल्या. त्यांना अचानक समोर बघताच जयश्रीचीही भंबेरी उडाली, तर राजदीप नजर चुकवू लागला. तरीही त्याने पिशव्या सोडून त्यांना दोन्ही हातांनी नमस्कार घातला. मात्र, त्यामुळे पिशवीतील कांदे व बटाटे हे रस्त्याशी मैत्री करण्यासाठी घरंगळत गेले. त्यांना पकडण्यासाठी राजदीपची धावपळ उडाली. ‘‘काय हे जयश्री! नवऱ्याच्या हातात दोन-दोन पिशव्या देऊन, तू मोकळी चालली आहे, हे बरं दिसतं का?’ मामींनी विचारलं. ‘अहो, आताच त्यांनी पिशव्या घेतल्यात आणि घर तर जवळच आहे,’ जयश्रीने खुलासा केला. ‘मामी, इथं रस्त्यात बोलण्यापेक्षा घरी चला ना! आधीच खूप उशीर झालाय. मला अजून लादी पुसायची आहे. भांडी घासायची आहेत आणि स्वयंपाकही करायचा आहे,’ राजदीपने सांगितले. ‘काऽय, ही सगळी कामं तुम्ही करता?’ मामींच्या मैत्रिणीने विचारले. ‘‘त्यात काय विशेष!

तरी इकडे येण्याआधीच मी कपडे धुऊन वाळत टाकले आहेत. शिवाय नोकरी सांभाळून मुलांचा अभ्यासही घ्यावा लागतो. सुरुवातीला मला त्रास झाला, पण नंतर सवय झाली.’ राजदीपचे हे बोलणे ऐकून मामींना धक्काच बसला. ‘‘राजदीप, माझ्या मुलीशी लग्न केलं असतं तर तुम्ही राजासारखं राहिला असता. माझ्या लेकीनं तुम्हाला इकडची काडी तिकडं करू दिली नसती. हे काय मी आता लेकीकडून येतेय. नवऱ्याला ती किती जपते,’ असे म्हणून तोंडाने ‘चक...चक’ करीत व हळहळत चौघी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर जयश्री चवताळलीच. ‘काय गरज होती तुम्हाला मध्येच तोंड खुपसायची. आता या बया सगळ्या नातेवाइकांत आणि मैत्रिणींत माझी बदनामी करत हिंडणार. द्या इकडे त्या पिशव्या आणि घरी गेल्यावरही नुसतं लोळत बसा. अजिबात कामाला हात लावायचा नाही,’ जयश्रीने असं म्हणताच राजदीपचा चेहरा उजळला.

loading image