esakal | तुझ्या माझ्या संसाराला आनी काय हवं...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

तुझ्या माझ्या संसाराला आनी काय हवं...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मनोजचा उतरलेला चेहरा पाहून प्रांजली काळजीत पडली. ‘काय झालं? एवढं कसलं टेंशन आलंय?’’ तिने असं विचारल्यावर मनोजने आवंढा गिळला. डोळ्यात आलेलं पाणी लपवलं. तरीपण स्वतःला सावरत तो म्हणाला, ‘‘पुढील चार दिवसांत पाच लाख रुपये बिल्डरला दिले नाहीत, तर फ्लॅटचं बुकिंग कॅन्सल होणार आहे. दसऱ्याला आपण नव्या घरात राहण्याचं स्वप्नं बघत होतो, ते अधुरंच राहणार.’’ खाली मान घालत मनोज म्हणाला.

‘तुम्ही असं निराश होऊ नका. निघेल यातून काहीतरी मार्ग.’’ प्रांजलीने त्याची समजूत काढली.

‘मी दहा-पंधरा जणांचे उंबरठे झिजवले पण कोणीही मदत केली नाही. नातेवाइकांनीही तोंड फिरवले.’’ निराशेने मनोज म्हणाला.

लग्नानंतरची पंधरा वर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या मनोजने एका गृहनिर्माण सोसायटीत आयुष्यभराची जमा केलेली पुंजी देऊन फ्लॅट बुक केला होता. बिल्डरला अजून पाच लाख द्यायचे होते. त्यानंतर उर्वरित रक्कमेचे बॅंकेचे लोन करायचे ठरले होते. मात्र, पाच लाख जमा करणे त्याला अवघड जात होते.

‘आपण आयुष्यभर भाड्याच्याच घरात राहणार,’’ मनोजच्या डोळ्यांत नैराश्‍याने पाणी दाटले. त्याचं बोलणं ऐकून प्रांजलीही काळजीत पडली. त्या रात्री प्रांजलीने वरण-भाताचा कुकर लावला. मात्र, दोघांचीही जेवण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे दोघेही उपाशीच झोपले. नवरात्र म्हणजे स्रीशक्तीच्या आराधनेचा कालावधी. याच काळात आपण निराश होऊन कसे चालेल? उलट आपण हिंमत न हारता, यातून मार्ग काढला पाहिजे, असे प्रांजलीने ठरवले. त्यानंतर तिने कपाट, ट्रंक यात जपून ठेवलेले दागिने काढले. ‘सोन्यावर पैसे उधळू नको.’ असं म्हणून मनोज सोनेखरेदीला सतत विरोध करायचा. पण तरीही ती एक-एक ग्रॅम सोनं ती साठवत जायची.

मुलीची चांदीची साखळी, पायातील वाळा, गळ्यातील लॉकेट, पैंजणही तिने बाजूला काढून ठेवलं. त्यानंतर कपाटात, बॅगेत, छोट्या डब्यात, धान्याच्या ड्रममध्ये ठेवलेले दहा-वीस-पन्नास-शंभरच्या नोटा तिने बाहेर काढल्या. चुरगळलेल्या नोटा व्यवस्थित घडी घालून ठेवल्या. नंतर तिने त्या मोजल्या. ते ४५ हजार भरले.

दुपारी सोन्याचे दागिने घेऊन, शेजारच्या गल्लीतील सोनाराकडे गेली. सोन्याचे वजन सात तोळे भरले. घट वगैरे धरून, सोनाराने पावणेतीन लाख रुपये सांगितले. मुलीच्या चांदीच्या वस्तूंचे आठ हजार झाले. सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंकडे भरल्या डोळ्यांनी पाहत तिने ते गाठोडं सोनाराच्या हाती दिलं. सोनारानंही तासाभरात रक्कम तिच्या हाती दिली. येतानाच तिने महिला बचत गटाच्या अध्यक्षांचे घर गाठलं. त्यांना पैशांची सगळी अडचण सांगितली. अध्यक्षीणबाईंनी सहानुभुतीने विचार करून, एक लाख रुपये मंजूर केले व दोन दिवसांत पैसे देण्याची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. एवढं करूनही साठ हजार रुपये कमी पडत होते. मग मात्र तिने काळजावर दगड ठेवून, तिच्या दिवंगत वडिलांनी भेट दिलेली कर्णफुले दुसऱ्या सोनाराकडे मोडून साठ हजार उभे केले.

तिसऱ्या दिवशी जमा केलेले पाच लाख रुपये प्रांजलीने मनोजच्या हाती दिले. ते पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तिच्या रिकाम्या कानाच्या पाळ्या पाहून, त्याच्या हृदयात कालवाकालव झाली.

दुसऱ्या दिवशी मनोजने सगळे पैसे बिल्डरच्या स्वाधीन केले. त्याचदिवशी खरेदीखतावर सह्या झाल्या. मनोजने नवीन घर प्रांजलीच्या नावावर केले होते. नवीन घरावर आपल्या नावाची पाटी पाहून, प्रांजलीला गहिवरून आले.

‘तूच माझी आदीशक्ती आहेस. तुझा मान- सन्मान करणं, हे माझं कर्तव्य आहे,’’ असे म्हणून त्याने तिला डोळे बंद करायला सांगितले. प्रांजलीने तसे केल्यानंतर त्याने तिच्या हातात वडिलांनी शेवटची भेट दिलेली कर्णफुले ठेवली. प्रांजलीच्या आनंदाश्रूत ती कर्णफुले न्हावून निघाली.

loading image
go to top