esakal | ‘सौ’ पत्नीकी; ‘एक’ पतीकी...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘सौ’ पत्नीकी; ‘एक’ पतीकी...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘कधी तरी अक्कलहुशारीने वागत जा. कोणीही तुम्हाला सहज फसवतं.’

प्रदीपने आणलेला भाजीपाला पाहून स्नेहलच्या रागाचा पारा चढला.

‘सुरुवात तर तुझ्या वडिलांनी केली ना! ’’ प्रदीप पुटपुटला.

‘काय म्हणालात? माझ्या वडिलांनी तुम्हाला फसवलं. उलट तुम्हीच माझ्या वडिलांना फसवलं. ‘म्हणे तुमच्या मुलीला राणीसारखी ठेवीन.’ दिवस- रात्र नुसतं राबवून घेताय.’’ स्नेहलने त्रागा करीत म्हटले.

‘अगं, राणी आमच्या आधीच्या मोलकरणीचं नाव होतं. त्यामुळे मी तसं म्हणालो. मी शब्दांचा पक्का आहे बरं का. वागवतोय की नाही राणीसारखं.’’ प्रदीपने असं म्हटल्यावर स्नेहलने भांड्यांची आदळआपट सुरू केली.

‘आपल्यात भांडण झाले की तू मुद्दाम पितळी तांब्या आणि कढई यांची आदळआपट करतेस. कारण या दोन्ही भांड्यांवर माझं नाव लिहिलंय ना म्हणून.’’ प्रदीपने आगीत तेल ओतलं.

‘हो! या भांड्यासारखंच तुम्हाला आपटावं, असं सारखं मला वाटतं पण सव्वाशे किलोचं हे मैद्याचं पोतं मला उचलणार नाही म्हणून दुधाची तहान ताकावर भागवतेय.’’ स्नेहलने जशास तसे उत्तर दिले.

‘मी मैद्याचं पोतं आणि तू कवळी काकडी का? तरी बरं तुझ्या वजनानं दोन- तीन वेळा वजनकाटा तुटलाय.’’ प्रदीपने म्हटलं.

त्यावर स्नेहलच्या अंगाचा तिळपापड झाला. तिने तोंडाचा पट्टा जोरात सुरू केला. त्यावर शांतपणे प्रदीप म्हणाला,

‘मला नेहमी वाटतं, की माझं लग्न एखाद्या समजूतदार बाईशी व्हायला हवं होतं.’’ प्रदीप म्हणाला.

‘तोंड बघा. समजूतदार बाई कशाला तुमच्याशी लग्न करेल?’’ स्नेहलने म्हटले. त्यावर खुदकन हसत प्रदीप म्हणाला, ‘‘मला हेच सिद्ध करायचं होतं. समजूतदार बाई माझ्याशी लग्न कशाला करेल. तू माझ्याशी केलंस, याचा अर्थ तू समजूतदार नाहीस, असाच होतो ना.’’ प्रदीपने म्हटले. बाजू आपल्यावर पलटली आहे, हे लक्षात आल्यानंतर स्नेहल थोडी शांत झाली. पण भांडणात नवऱ्यानं जिंकणं, याच्यासारखा आपला मोठा पराभव नाही, याची तिला जाणीव होती. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये, हे तिला पटलं होतं. दोन पावलं माघारी घेतल्यानंतर शत्रुपक्षावर त्वेषाने हल्ला करावा, त्याप्रमाणे स्नेहल कडाडली, ‘‘परमेश्‍वर अक्कल वाटत होता, त्यावेळी तुम्ही काय झोपला होता काय? साधा भाजीपाला तुम्हाला नीट बघून आणता येत नाही. एक काम धड जमलंय का?’’ स्नेहलने मूळ विषयाला हात घातला.

स्नेहलशी भांडून काहीही फायदा होणार नाही, शेवटी आपल्यालाच माफी मागून, हे प्रकरण मिटवावं लागणार आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर प्रदीपला याची खात्री होती, त्यामुळे तो गप्प बसला.

‘आता बोला ना? बाजू तुमच्यावर उलटली की शांत बसता काय? भाजीपाला तुम्हाला नीट बघून आणता येत नाही? आयुष्यात एक काम धड केलंय का?’’ स्नेहलने परत तोच प्रश्‍न विचारला.

‘भाजीपाला नीट बघून आणता येत नाही का म्हणजे? बायको तर नीट पसंत करून आणली ना? आयुष्यात तेवढं एकच काम मी धडपणे केलंय. आता इतर किरकोळ कामं चुकली तर चुकली. फिकीर नॉट.’’ असं म्हणून तो मिश्‍कीलपणे हसला. आपलं कौतुक ऐकून स्नेहल सुखावली. ‘‘मग उगाचंच माझ्याशी कशाला भांडता?’’ स्नेहलने लाडीक तक्रार केली.

‘तुझ्याशी भांडण केल्यानंतर तू खूप चिडतेस. त्यावेळी तू अशी काय सुंदर दिसतेस, की ऐश्‍वर्या रायदेखील तुझ्यापुढे फिकी पडेल.’’

प्रदीपचं बोलणं ऐकून स्नेहल लाजली. तिने न सांगताच चहाचे आधण गॅसवर ठेवले. ‘‘प्लीज, चहात साखर नको टाकूस. फक्त तुझ्या मनातला गोडवा त्यात उतरू दे.’’ प्रदीपने असं म्हटल्यावर स्नेहल पुन्हा लाजली.

loading image
go to top