esakal | गुलाब गेले चोरीला... जास्वंदांनी पकडले चोराला
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

गुलाब गेले चोरीला... जास्वंदांनी पकडले चोराला

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘आपल्या दारासमोरील कुंडीतून रोज गुलाबाची टपोरी फुले चोरीला जात असल्याचे पाहून जनुभाऊंच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. फुले चोरीला जाण्यामागे सोसायटीचे अध्यक्ष कारंडे यांचेच कटकारस्थान असावे, अशी शंका त्यांना होती. एकदिवस रस्त्यात गाठून जनुभाऊंनी कारंडेंना याबाबत जाब विचारला.

‘सोसायटीची सुरक्षाव्यवस्था अतिशय भिकार असल्याने माझ्या दारासमोरून गुलाबाची फुले रोज चोरीला जातात. अध्यक्ष म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतरच तुमचे डोळे उघडणार आहेत का?’’ जनुभाऊंचे वरच्या पट्टीतील बोलणं ऐकून कारंडे शांतपणे म्हणाले, ‘‘तुम्ही याबाबत आमच्याकडे लेखी तक्रार द्या. पुढील महिन्यांतील मिटिंगमध्ये आम्ही पदाधिकारी त्यावर चर्चा करू,’’ असे म्हणून कारंडे निघून गेले.

तीन-चार दिवसांनी चोराला पकडण्यासाठी जनुभाऊंनी दारासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. आता रोज सकाळी साडेसहापासून ते संगणकासमोर बसून, गुलाबाच्या कुंडीवर लक्ष ठेवू लागले. साडेसातच्या सुमारास टेरेसवर जाण्याच्या नावाखाली म्हापसेकर यांनी इकडे तिकडे बघून हळूच चार-पाच गुलाबाची फुले तोडली. हे दृश्य पाहून जनुभाऊंनी तातडीने कारंडेंचं घर गाठलं. रात्रपाळी करून आल्याने कारंडे गाढ झोपले होते. पण पाच-सहा वेळा बेल वाजल्याने जांभई देतच त्यांनी दरवाजा उघडला. समोर जनुभाऊंना बघताच त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या.

हेही वाचा: पुणे महापालिकेचे डोळे राज्य शासनाकडे थकीत असलेल्या १००० कोटीकडे

‘फुलांच्या चोरीचा अर्ज सोसायटीच्या ऑफिसमध्ये दिला असता तरी चाललं असतं, एवढ्या सकाळी माझी झोप मोडायची आवश्यकता नव्हती.’’ त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘‘कारंडे, चोर रेडहॅंड सापडला आहे. आताच्या आता तुम्ही माझ्याबरोबर चला.’’ मात्र जनुभाऊंच्या आग्रहाला कारंडे यांनी विरोध केला. ‘‘अहो, मी अजून अंघोळ केली नाही.’’ जनुभाऊंनी फारच आग्रह केल्याने नाइलाजाने कारंडे त्यांच्यासोबत म्हापसेकरांच्या घरी आले.

‘तुम्ही आमच्या कुंडीतील गुलाबाची फुले चोरली आहेत.’’ जनुभाऊंनी थेट हल्ला चढवला.

‘वाट्टेल ते बोलू नका. मी अजून घराच्या बाहेरही पडलो नाही.’’ म्हापसेकरांनी सावध पवित्रा घेतला. मग, मात्र जनुभाऊंनी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून म्हापसेकर यांच्यासह सगळ्यांना आपल्या घरी नेलं व सीसीटीव्हीतील चित्रण दाखवलं.

‘देवासाठी दोन फुले नेली तोडून तर किती आकांडतांडव करताय.’’ म्हापसेकरांनी म्हटले. ‘‘मघाशी छाती ताणून ‘मी घराबाहेर पडलो नाही’, असे सांगत होतात ना. मग हे काय तुमचे भूत आहे का?’’ जनुभाऊंनी त्यांना जाब विचारला. म्हापसेकरांनी जनुभाऊंची माफी मागून हे प्रकरण मिटवलं. तेव्हापासून जनुभाऊ ताठ मानेने सोसायटीत फिरू लागले. आठवडाभराने जनुभाऊ मंडईमध्ये गेले होते. भाजीपाला खरेदी करून ते घरी निघाले. त्यावेळी जास्वंदीची फुले आणण्यास कावेरीबाईंनी सांगितल्याचे त्यांना आठवले पण परत माघारी जाऊन फुले आणण्याचे त्यांच्या जिवावर आले. सोसायटीजवळच एका बंगल्यात जास्वंदाची फुले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंपाऊंडबाहेरून चार-पाच फुले तोडू. नेने आजी-आजोबांच्या कशाला लक्षात येतंय? असा त्यांनी विचार करून ते फुले तोडू लागले. तेवढ्यात नेनेआजोबा बाहेर आले व ‘फुलचोर’ असे म्हणून जोरात ओरडले. नेमकं तेथून त्यावेळी म्हापसेकर जात होते. ‘फूलचोर’ हे शब्द ऐकल्यावर ते दचकले. आपली ही कीर्ती आख्ख्या परिसरात जनुभाऊंनीच पसरली असणार, अशी शंका त्यांच्या मनात आली. पण दोन-तीन मिनिटांतच त्यांना उलगडा झाला. जनुभाऊ हे चोरून फुले तोडत असून, नेनेआजोबा त्यांना चोर म्हणत होते. म्हापसेकरांनी या प्रसंगाचं तातडीने मोबाईलवर शूटिंग करून, ते सोसायटीच्या ग्रुपवरही टाकलं. तेव्हापासून सोसायटीत कोणी ‘मोर’ ‘दोर’ असे शब्द वापरले तरी जनुभाऊंना ते ‘फूलचोर’ असं ऐकू येऊ लागलंय.

loading image
go to top