esakal | तुचि कृष्ण, तुचि प्रकाश तुचि भुकेल्यांचे आकाश
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

तुचि कृष्ण, तुचि प्रकाश तुचि भुकेल्यांचे आकाश

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘साहेब, मी पलीकडील घरात आता भीक मागायला गेलो होतो. मात्र, त्यांनी अपमानास्पद बोलून हाकलून दिले. तुम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करा.’ पिंपरीतील पोलिस ठाण्यात रात्री दोनच्या सुमारास एका भिकाऱ्याने तक्रार केली. हवालदार सुरवसे यांनी ती निमूटपणे ऐकून घेतली. रात्री दोनच्या सुमारास एखाद्या घराची बेल वाजवून भीक मागायला तुला लाज वाटत नाही का? असा सज्जड दम देऊन, दोन फटके त्याच्यावर टाकण्याची इच्छा सुरवसे यांच्या मनात आली. मात्र, लगेचच त्यांना पिंपरी-चिंचवडच्या मोठ्या साहेबांचे ‘मी वेषांतर करून पुन्हा येईन...पुन्हा येईन..’ हे वाक्य आठवल्याने ते शांत बसले. (SL Khutwad Writes about Begger)

तीन-चार दिवसांपूर्वी मोठ्या साहेबांनी मुस्लिम व्यक्तीची वेषभूषा करून चार पोलिस ठाण्यांना भेट देऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी माहिती घेतली होती. त्यामुळे आजही साहेबच वेशांतर करून आले असावेत, असा अंदाज सुरवसे यांनी बांधला व लगेचच त्यांनी भिकाऱ्याला सॅल्यूट ठोकला. मात्र, या आदरामुळे भिकारी भांबावून गेला.

‘तुम्ही आधी खुर्चीवर बसा. चहा-कॉफी काय घेणार’’? सुरवसे यांनी विचारले.

‘साहेब, चहा-कॉफीचं नंतर बघू. खूप भूक लागलीय. खाण्याची व्यवस्था करा.’’ असे म्हटल्यावर सुरवसे यांनी आपल्या सहकाऱ्याला जेवणाची तजवीज करायला सांगितली.

‘मी तुमची फिर्याद घेतो; पण त्याआधी तुम्ही फ्रेश होता का?’’ हवालदार सुरवसे यांच्या आपुलकीच्या बोलण्याने भिकारी एकदम भारावला. पटकन तो पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन सूर्य पश्‍चिमेला उगवलाय काय? याची त्याने खात्री केली. मात्र, रात्री दोनच्या सुमारास आकाशात सूर्यच नव्हता. मग भिकारी बाथरूमला जाऊन फ्रेश होऊन आला.

हेही वाचा: पुण्यात दररोज १२१० रुग्ण होताहेत कमी; आतापर्यंत ६६ हजार कोरोनामुक्त

तोपर्यंत सुरवसे यांनी रात्रपाळीचे सहकारी भारंबे यांच्याशी चर्चा केली. ‘‘साहेबच दिसतायत. केशभूषा करताना मिशा फक्त बारीक ठेवल्यात. सर्वसामान्य माणसाशी आपण किती प्रेमाने आणि आपुलकीने वागतो. त्यांची तक्रार नोंदवून, लगेचच कार्यवाही करतो’, हे साहेबांच्या निदर्शनास आणून देऊ. प्रमोशन मिळवण्याची ही चांगली संधी आहे,’’ असे सुरवसे यांनी म्हटल्यावर भारंबे यांनीही सुरात सूर मिसळला.

भिकारी फ्रेश होऊन येईपर्यंत गरमागरम जेवणही आले होते. ‘‘साहेब, पिझ्झा किंवा बर्गर मिळाला असता तर बरं झाले असते.’’ भिकाऱ्याने असं म्हटल्यावर सुरवसे यांच्या कपाळाची शीर तडतडू लागली. मात्र, त्यांनी एक ते दहा अंक मोजून रागावर नियंत्रण मिळाले. ‘‘ठीक आहे. आपण तेही मागवू. तुम्ही आधी जेवण करा. मग फिर्याद घेऊ.’’ सुरवसे यांनी असे म्हटल्यावर भिकारी जेवणावर तुटून पडला. मग सुरवसे यांनी भिकाऱ्याची फिर्याद नोंदवून घेतली. ‘‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही तातडीने कायदेशीर कारवाई करू.’’ असा दिलासा दिला.

‘साहेब, तुमच्या पाहुणचाराने आणि माणुसकीने मी भारावून गेलोय. माझ्या मित्रांना बोलवू का?’’ असा प्रश्‍न विचारून उत्तराची वाट न बघता, त्याने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. पाचच मिनिटांत दहा-बारा भिकारी पोलिस ठाण्यात आले. मग सुरवसे यांनी नाइलाजाने त्यांचीही सरबराई केली. त्यांनाही खायला दिलं. तेवढ्यात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यात आले व त्यांनी सुरवसे यांना झापले, ‘‘हा काय प्रकार आहे, एवढे सगळे भिकारी पोलिस ठाण्यात कशाला जमलेत.’’ मग सुरवसे यांनी ‘मी पुन्हा येईन..पुन्हा येईन...’ या साहेबांच्या वेशांतराबाबतची माहिती दिली. ‘मोठे साहेबच वेशांतर करून आले असून, ते पोलिसांची कार्यपद्धत तपासत आहेत.’ असे हळू आवाजात सांगितले. मग मात्र ते वरिष्ठ अधिकारी उखडले. ‘सुरवसे, तुम्हाला काही अक्कल आहे का? आपले मोठे साहेब, आजच महत्वाच्या कामासाठी परगावी गेले आहेत. ते वेशांतर करून लगेच कसे काय येतील?’’ त्यावर सुरवसे फक्त ‘ततपप’ करू लागले.