‘सीसीटीव्ही’साठी पाठपुरावा अखेर तोच ठरला पुरावा!

सु. ल. खुटवड
Friday, 19 February 2021

‘एका महिन्यांत माझ्या मोटारसायकलमधील तिसऱ्यांदा पेट्रोल चोरीला गेले आहे. याला जबाबदार कोण? तुम्ही अध्यक्ष म्हणून काय करणार आहात की नाही? की मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू’? जनुभाऊंनी सोसायटीचे चेअरमन कारंडे यांना गेटवरच अडवून जाब विचारला.

‘एका महिन्यांत माझ्या मोटारसायकलमधील तिसऱ्यांदा पेट्रोल चोरीला गेले आहे. याला जबाबदार कोण? तुम्ही अध्यक्ष म्हणून काय करणार आहात की नाही? की मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू’? जनुभाऊंनी सोसायटीचे चेअरमन कारंडे यांना गेटवरच अडवून जाब विचारला.
‘हे बघा, मी आताच रात्रपाळीवरून येतोय. मला थोडावेळ झोपू द्या.’ कारंडे म्हणाले. 

‘झोपा. झोपा. अगदी कुंभकर्णासारखे डाराडूर झोपा. तुम्हाला आम्ही झोपण्यासाठीच चेअरमन म्हणून निवडून दिलंय ना. सभासदांच्या अडचणींशी तुम्हाला काय देणं- घेणं आहे म्हणा.’ जनुभाऊंनी त्रागा करीत म्हटले.
‘अहो, माझी अडचण समजून घ्या.’ काकुळतेला येत कारंडे म्हणाले.
‘हे बघा, आमच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला चेअरमन म्हणून आम्ही निवडून दिलं आहे. तुमच्या अडचणी ऐकाव्यात म्हणून आम्ही सभासद झालो नाही.’ जनुभाऊंनी स्पष्ट म्हटलं. 
‘तुमचे चोरीला गेलेले पेट्रोल मी भरून देतो. पण मी आता झोपायला जाऊ का?’ नांगी टाकत कारंडे म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘हे बघा कारंडे, मी फार तत्त्वनिष्ठ माणूस आहे. मी कोणाचं फुकट काही घेत नाही आणि कोणाला फुकट देत नाही. मी आयुष्यभर...’ कारंडे यांनी जांभया द्यायला सुरवात केल्यानंतर जनुभाऊंनी आवरते घेतले. त्यानंतर दोनच दिवसांत जनुभाऊंच्या आग्रहाखातर सोसायटीची विशेष सभा बोलाविण्यात आली.‘‘गृहनिर्माण सोसायट्यांच्या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सोसायटीने सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. मी गेल्या काही वर्षापासून आग्रह धरत आहे. पण आमच्या सूचनांना विचारतो कोण? सीसीटीव्ही असते तर माझ्या गाडीतून पेट्रोलची चोरी झालीच नसती. झाली असती तर चोर सापडले असते. पण सभासदांना त्रास कसा होईल, हेच चेअरमनचं उद्दिष्ट आहे.’ जनुभाऊंनी कारंडे यांची भर मिटिंगमध्ये पुन्हा खरडपट्टी काढली. कारंडे यांनी सीसीटीव्हीचा खर्च शिलकीतून करणे अवघड असल्याचे सांगितले. त्यावर जनुभाऊ पुन्हा उखडले. ‘आम्ही दर महिन्याला मेंटेनस देतो, त्याचा उपयोग तुम्‍ही काय तुमचं घर चालविण्यासाठी करता काय? आमच्या कष्टाचा पैसा 
तुम्ही तुमच्या संसारासाठी वापरता, हे कोठल्या नैतिकतेत बसते.’ जनुभाऊंनी जाब विचारला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अहो, प्रत्येकी चारशे रुपये मेंटेनस येतो. एकूण वीस हजार रुपये जमा होतात. त्यातून वॉचमनचा पगार, लाईटबिल, अधून- मधून पाण्याचे टॅंकर, साफ-सफाई यातच खर्च होतो. सीसीटीव्हीसाठी कसा खर्च करणार’? कारंडे यांनी म्हटले.
‘तुम्ही जर सोसायटीत सीसीटीव्ही बसवत नसाल तर मी रोज अकरा ते पाच या वेळेत महिनाभर आमरण उपोषण करील.’ जनुभाऊंच्या या धमकीनंतर सीसीटीव्ही बसवण्याचे ठरले व फक्त सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी आणखी एक वॉचमन नेमण्याचे ठरले. या सर्व खर्चासाठी प्रत्येक सभासदांकडून पाच हजार रुपये वर्गणी काढण्याचा निर्णय घेतला. ‘जनुभाऊंच्या तीन लिटर पेट्रोलच्या चोरीसाठी प्रत्येक सभासदाला पाच हजार रुपयांचा भुर्दंड पडला.’ अशी कुजबूज अनेक सभासदांनी केली. पुढील तीन-चार दिवसांतच सोसायटीत सगळीकडे सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. त्यावर नजर ठेवण्यासाठी आणखी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. हे बघून जनुभाऊंची छाती अभिमानाने भरून आली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत सेल्फी घेऊन, सोसायटीच्या ग्रुपवर ती पोस्ट केली. ‘माझ्या अथक पाठपुराव्यामुळे सोसायटीत सीसीटीव्ही लावले. त्याबद्दल जनुभाऊंचे हार्दिक आभार’ असा मजकूरही त्यांनी स्वतःच सेल्फीसोबत टाकला. पुढील दोन-तीन दिवस सोसायटीतील कोणाला ना कोणाला पकडून ‘मी होतो म्हणून सोसायटीत सीसीटीव्ही बसले’ असे ते ऐकवू लागले. 

पुढच्या आठवड्यात जनुभाऊंना एका नातेवाइकाला भेटण्यासाठी तातडीने रात्री अकरा वाजता हॉस्पिटलमध्ये जायचे होते. पार्किंगमध्ये आल्यानंतर त्यांनी दुचाकी स्टार्ट करायला सुरवात केली. पण बराचवेळ किक मारूनही ती चालू झाली नाही. त्यावेळी गाडीतील पेट्रोल संपले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता एवढ्या रात्री काय करावे, हा प्रश्‍न त्यांना पडला. मग गाडी पेट्रोलपंपापर्यंत जाईल, एवढे पेट्रोल दुसऱ्याच्या गाडीतून काढायचे त्यांनी ठरवले. त्यानुसार ते एका मोटारसायकलमधून पेट्रोल काढू लागले. तेवढ्यात गलबला झाल्याने त्यांनी मागे वळून पाहिले तर सीसीटीव्हीचा वॉचमन, चेअरमन कारंडे, सचिव पांढरे, तसेच दोन-तीन सभासद जनुभाऊंकडे निरखून पहात होते. 
‘अहो, गाडीतील... पेट्रोल.... संपले... म्हणून....’ जनुभाऊ ततपप् करीत एवढेच म्हणू शकले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SL Khutwad Writes about CCTV