सुट्ट्या पैशांची ऐशी की तैशी..!!

Panchnama
Panchnama

आम्ही पहिल्यापासूनच फार तत्त्वनिष्ठ. कोणाचा रुपया बुडवणार नाही अन्‌ कोणाला रुपया फुकट सोडणार नाही, हा आमचा स्वभाव आहे. अर्थात हे तत्त्व पाळण्यासाठी कोणतीही किंमत मोजायची आमची तयारी असते. आता कालच आम्ही सदाशिव पेठेतील एका झेरॉक्‍सच्या दुकानांतून चार झेरॉक्‍स काढल्या व दुकानदाराला दहा रुपयांची नोट दिली. त्यावर  दुकानदाराने झुरळ झटकावे तसे आम्हाला झटकले. ‘सुटे चार रुपये द्या,’ असे म्हणून खेकसले. ‘सुटे पैसे असतील तरच झेरॉक्‍स काढा, नाहीतर फुटा’ या पाटीकडे बोट करत, ‘ही पाटी आम्ही काय शोभेसाठी लावली आहे का?’ असा जाब विचारला. या अचानक हल्ल्याने आम्ही गांगरलो. परंतु लगेच स्वत:ला सावरले. ‘दहा रुपयांचीही मोड तुमच्याकडे नसेल तर अजून शंभर रुपये वर देतो.’‘आता शंभर रुपये वर कशाला?’ दुकानदाराने विचारले.

‘माझ्या १०६ रुपयांचे कुलूप आणा आणि दुकानाला कायमचे टाळे लावा.’  आम्हीही बाणा दाखवला.
‘आम्हाला लावायला सांगता टाळे, माझ्यासमोरून तोंड करा काळे.’ टाळे- काळे असे यमक जुळवल्याने दुकानदार स्वत:वरच खूष झाल्याचे दिसले. ‘आधी माझे सहा रुपये परत करा,’ आम्ही असे म्हटल्यावर त्यांनी सहा रुपयांची चॉकलेट दिली. असल्या नफेखोर वृत्तीचा निषेध करून आम्ही चॉकलेट नाकारली.
‘थोडावेळ थांबा. सुटे चार रुपये आणून देतो,’ असे आम्ही म्हटले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आधी त्या झेरॉक्‍स आमच्या ताब्यात द्या. नाहीतर पैसे आणि झेरॉक्‍स घेऊन, तुम्ही गायब व्हायचे,’ दुकानदाराने आमच्यावर अविश्वास दाखवला. आम्ही त्यांना झेरॉक्‍स दिले व सुटे पैसे आणण्याच्या मोहिमेवर निघालो. वाटेत अनेक दुकानदारांकडे सुटे पैसे मागितले पण प्रत्येकाने तोंड फिरवले. ‘पंधरा रुपयांत वडा-पाव’ अशी पाटी वाचून आम्ही थांबलो. भूक अजिबात नव्हती आणि तेलकट खायची इच्छा नव्हती पण वीस रुपये दिल्यावर सुटे पैसे मिळतील, या आशेने आम्ही तेलकट वडा-पाव डोळे मिटून खाल्ला. मात्र, आम्ही वीस रुपये दिल्यानंतर सुटे पाच रुपये नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्याऐवजी दहा रुपयांची भजीप्लेट पाच रुपयांत दिली. त्यानंतर तासभर आम्ही सुट्या पैशांसाठी वणवण केली पण उपयोग झाला नाही. 

परत दुकानदाराकडे आलो. दहा रुपये त्यांच्याकडे ठेवून, झेरॉक्‍स ताब्यात घेतल्या व उद्या सुटे सहा रुपये नेण्यासाठी येतो, असे सांगितले. दुकानदाराने त्याला मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी खास सहा रुपये आणण्यासाठी धनकवडीवरून रिक्षा करून गेलो. रिक्षातून बाहेर पडताच दुकानदार दुकान बंद करत असल्याचे दिसले. ‘अहो, माझे सहा रुपये तुमच्याकडे राहिलेत. ते द्या.’ त्यावर ‘दुकान एक ते चार बंद राहील’, या पाटीकडे दुकानदाराने बोट दाखवले. ‘अहो, आता एक वाजून दोन मिनिटे झाली आहेत. त्यामुळे आम्ही दुकान बंद केले आहे. तुम्ही पैसे नेण्यासाठी आता चार वाजता या,’ असे म्हणत ते पायऱ्या उतरू लागले. आता चारपर्यंत काय करायचे म्हणून आम्ही ऐंशी रुपयांचे तिकीट काढून राजा दिनकर केळकर संग्रहालय पाहत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com