esakal | थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘गं, परदेशात मस्तपैकी हिंडायचं-फिरायचं तुझं स्वप्नं लवकरच पूर्ण होणार आहे. आपण मॉरिशस, इंग्लंड आणि इटलीला फिरायला जातोय. तिथं काय काय करायचं याची यादी आताच कर. नंतर धावपळ नको.’’ श्रीधरने श्रृतीला आनंदाने सांगितले.

‘अय्या ! खरंच’’ श्रृतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. लग्नानंतर कितीतरी वर्षे ती परदेशात जाऊन मौजमजा करायची स्वप्ने बघत होती; पण काही ना काही कारणाने तो बेत पुढे ढकलला जात होता. त्यातच गेला महिनाभर दोघेही घरातच असल्याने वैतागून गेले होते.

‘अहो, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे ना. परदेशातही तो असेलच ना.’ श्रृतीने शंका विचारली. ‘अगं, तू काळजी करू नको. मॉरिशस आणि इंग्लंडमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे तेच पर्यटनाचा आग्रह करीत आहेत. विविध योजनांमुळे आपल्याला ही ट्रीप जवळजवळ फुकट पडतेय.’’ श्रीधरने म्हटले. त्यानंतर श्रृतीच्या मनावरील ओझे उतरले. मग काय तिने बॅगा भरायला सरुवात केली. खरेदीच्या याद्या तयार केल्या. अखेर जाण्याचा दिवस उजाडला. दोन तासांत श्रृतीने मेकअप केला. छानसा ड्रेस घालून ती तयार झाली. मग श्रीधरने लगेचच लॅपटॉप चालू केला व गुगल मॅपवर जाऊन, मॉरिशसवर क्लिक केले.

‘श्रृती, आता येथे मस्तपैकी हिंड. त्यानंतर आपण इंग्लंडला जाऊ.’ श्रीधरचे हे बोलणे ऐकून श्रुतीचा चेहरा पडला. त्यानंतर खळखळून हसत तो म्हणाला, ‘अगं सरकारने अत्यावश्‍यक कारणांशिवाय घराबाहेर पडायला बंदी घातली आहे; पण गुगल मॅपवरून परदेशात फिरायला बंदी घातली नाही. तुला अजून कोठे फिरायचं आहे का’? श्रीधरने असं विचारल्यावर श्रुती रागाने किचनमध्ये आली.

‘अगं, मी गंमत केली. सॉरी. सॉरी..’ असे श्रीधरने अनेकदा म्हटले. रुसवाफुगवीतच दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी त्यांचा वाद मिटला.

‘श्रुती, काही तरी चमचमीत जेवायला कर गं. शेपूची आणि भेंडीची भाजी महिनाभर खाऊन कंटाळा आलाय.’ श्रीधरने म्हटले.

हेही वाचा: पुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; ICU बेड्सच्या संख्येत वाढ

‘अहो, माझी मैत्रिण माधवीचा आताच फोन आला होता. तिने आपल्यासाठी एक किलो मटण घेतलंय. ती आता येईलच. हैद्राबादी मटण बिर्याणी आणि कोल्हापुरी मटण मसाला करते. सोबत तांबडा आणि पांढरा रस्साही करते. फक्त नाश्‍त्याला आपण काट मारू. दुपारी चारपर्यंत जेवण तयार होईल.’ श्रृतीने म्हटले. त्यावर श्रीधरनेही आनंदाने ‘चालेल.. चालेल.’ म्हटले. थोड्याच वेळात माधवी डबा घेऊन आली. ते पाहून श्रीधरचे डोळे लकाकले. श्रीधरने पुढची तयारी केली. एका डब्यातून चकणा व फ्रीजमधून ‘खंबा’ बाहेर काढून, बेडरूममध्ये जाऊन बसला. नाश्‍ता नसल्याने दुपारी दोनलाच त्याला कडाडून भूक लागली. शेवटी साडेपाचला जेवण तयार झाले.

डायनिंग टेबलवर तो वाट पाहू लागला. श्रृतीने भांडी सजवून आणली. श्रीधरनेही खूश होत झाकण काढले. एकात हैद्राबादी मटण बिर्याणीचे चित्र व दुसऱ्यात कोल्हापुरी मटण मसाल्याचे चित्र होते. एका बाऊलमध्ये तांबड्या व दुसऱ्या बाऊलमध्ये पांढऱ्या रश्‍श्‍याचे चित्र होते. ‘‘करा सुरुवात.’ श्रुतीने असे म्हटल्यावर श्रीधरचा राग अनावर झाला.

‘अहो, गुगल मॅपवरून जग हिंडता येतं, तर या चित्रांवरूनही शाही भोजन करायला काय हरकत आहे.?’ श्रुती असे बोलल्यावर श्रीधर गप्प बसला.

‘सकाळी माधवीने इडली-चटणी दिली होती. त्याचवेळी ही आयडिया सुचली.’ असे म्हणत चार इडल्या श्रीधरला दिल्या. त्या इडल्यासुद्धा त्याला पंचपंक्वानापेक्षा भारी वाटल्या.

‘अहो, संध्याकाळी व्हेज कोल्हापुरी, शाही पनीर व काजू मटर करते. वाटल्यास व्हेज कोल्हापुरीही करते...’ तिला मध्येच थांबवत श्रीधर म्हणाला,

‘माझे आई, यातलं काही करू नकोस. साधा खिचडी भात केला तरी चालेल; पण आजच्यासारखं परत गंडवू नको.’ यावर श्रुती खळखळून हसली.

loading image
go to top