esakal | रांग पुढे काही सरेना; जेवण काही मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

रांग पुढे काही सरेना; जेवण काही मिळेना

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘हे बघा, स्टार्टर आणि जेवणामध्ये दोन तासाचे अंतर असेल तर ते प्रकृतीसाठी उत्तम आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. प्रत्येकाला स्टार्टर आणि जेवण मिळेलच.’ वधुपिता सुरेंद्र फणसे यांनी वऱ्हाडीमंडळींना आश्वासन देत म्हटले.

‘अहो, आधी तुम्ही स्टार्टर आणि जेवणामध्ये अर्ध्या तासाचे अंतर ठेवले जाईल, असे सांगितले होते. मग हा कालावधी वाढवून, तो तुम्ही एक तासावर नेला आणि आता हा कालावधी तुम्ही दोन तासांवर नेत आहात. अशाने भूक- भूक करून, आम्ही मरून जायचो.’ वराकडील एका आजोबांनी वधुपित्याला फैलावर घेतले.

‘तुम्ही मनोसक्त जेवावे आणि जेवणही पचावे, यासाठीच आमचा अट्टहास आहे. प्रत्येकाला स्टार्टरसह पोटभर जेवण देणं, ही आमची जबाबदारी आहे.’ फणसे यांनी म्हटले.

प्रशांत व प्रियाच्या लग्नातील भोजनाची व्यवस्था किरण केटरर्स व हिंदुस्थान केटरर्स या दोघांना संयुक्तरीत्या दिली होती. सुरवातीला वऱ्हाड मंडळीही मर्यादित होती. त्यातच ‘लग्नात जेवल्याने पोट दुखते’, अशी अफवा कोणीतरी पसरवली. त्यामुळे सुरवातीला वऱ्हाडातील अनेकांनी जेवणास नकार दिला. हा प्रकार पाहून वर व वधुपित्याच्या पोटात गोळा आला.

हेही वाचा: दिलासादायक! तब्बल सत्तर दिवसानंतर पुण्यातील रुग्ण एक हजाराच्या आत

‘एवढं सारं अन्न वाया जातंय काय’? अशी भीती त्यांना वाटली. मग वधुपिता फणसे, वरपिता कोळेकर, मुलीचे मामा गाडेकर यांनी सगळ्यांदेखत जेवण घेतले व हे ‘जेवण अतिशय सुरक्षित आहे,’ याची ग्वाही दिली. त्यानंतर मात्र लोकांचा विश्‍वास बसला व लोकांनी जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये गर्दी करण्यास सुरवात केली. प्रत्येक जेवणाऱ्याच्या मागे पाच-सहा जण रांगेत उभे राहू लागले व हळूच ‘आटपा लवकर’ असे म्हणू लागले. त्यातच वऱ्हाडाच्या एकाचवेळी आणखी चार गाड्या आल्याने वधू व वर पक्षाची त्रेधातिरपीट उडाली. पोलिस आले तर दंड भरायला लागणार, याचा अंदाज त्यांना आला. पण त्यापेक्षा जेवणाचे नियोजन कसे करावे, हा मोठा प्रश्‍न त्यांना सतावू लागला. गर्दी टाळण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी व त्यानंतर कुपन दिले जाईल व त्यानुसारच डायनिंग हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले.

अतिमहत्त्वाचे काम असणारे व ज्येष्ठ नागरिकांना आधी जेवण द्यावे, असा निर्णय झाला व त्यानुसार त्यांची पंगत बसविण्यात आली व त्यांना स्टार्टर देण्यात आला. अर्ध्या तासाने जेवण दिले जाईल, असे सांगण्यात आले. ही पंगत उठल्यानंतर सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांपुढील व्यक्तींना डायनिंग हॉलमध्ये सोडण्यात येऊ लागले. त्यानंतर तरुणांना परवानगी देण्यात आली. आधीच्या पंगती चालू असतानाच या परवानग्या दिल्यामुळे डायनिंग हॉलमध्ये जाण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या. ज्येष्ठांसह अनेकांना फक्त स्टार्टरच मिळाला होता. त्यामुळे जेवणासाठी ते परत रांगेत उभे राहू लागले. त्यातच जेवण संपले, असे जाहीर झाल्याने मोठा गोंधळ उडाला. जेवण बनविण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी वधुपित्याने स्टार्टर व जेवणातील वेळ अर्ध्या तासाने वाढवला. त्यानंतर पुन्हा हा कालावधी वाढवला.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात १९१ घरांचे नुकसान

मात्र, लांबलचक रांगा पाहून वधू व वरपक्षाची घाबरगुंडी उडाली. किरण व हिंदुस्थान केटरर्सकडील पुरवठा कमी पडू लागल्याने वधूचे मामा गाडेकर धावतच रांगेकडे आले. ‘काळजी करू नका. आपण जागतिक टेंडर काढू व सगळ्यांना जेवण देऊ,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, किरण केटरर्सचे मुख्य आचारी अचानक परगावी गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मग गाडेकर मामांनी आणखी एका केटरर्सला जेवणाची आॅर्डर दिली. आता तिन्ही केटरर्स वेगाने जेवण बनवू लागले. मात्र, वऱ्हाडी मंडळींची रांग काही कमी होईंना. रांगेत उभे राहूनच अनेकांना चक्कर येऊ लागली. मात्र, ज्यांच्या ओळखीचे वाढपी आहेत, त्यांना स्टार्टरसह जेवणही रांगेत उभे न राहताही मिळू लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

जेवणासाठीचा गोंधळ वाढत असल्याचे पाहून नवरदेव प्रशांत व नवरी प्रिया यांनी हनिमूनला जाण्यासाठी हळूच तेथून पोबारा केला.