
‘आबा, तुम्हाला मी सांगितलं होतं का नाय? तुम्हीच बहुमतांनी निवडून येणार आणि आपलं पॅनेल लागणार,’ सुरेश या मतदाराने आबाला बळजबरीने आलिंगन देत म्हटले. त्यानंतर स्वतःच्या हाताने स्वतःवरच गुलाल उधळून घेत त्याने आबांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.
‘आबा, तुम्हाला मी सांगितलं होतं का नाय? तुम्हीच बहुमतांनी निवडून येणार आणि आपलं पॅनेल लागणार,’ सुरेश या मतदाराने आबाला बळजबरीने आलिंगन देत म्हटले. त्यानंतर स्वतःच्या हाताने स्वतःवरच गुलाल उधळून घेत त्याने आबांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.
‘आरं, पण तू तर नानाचा प्रचार करत होतास ना. सारखा तर त्यांच्याबरोबर फिरत होतास.’ एका कार्यकर्त्याने सुरेशला डिवचले.
‘अहो, ही तर आपली खेळी होती. त्यांच्याबरोबर फक्त हिंडायचे; पण मतदान मात्र तुम्हालाच करायचे, असे आम्ही ठरवले होते. तशा शपथाही आम्ही घरातल्या घरात घेतल्या होत्या. याचा बोभाटा होऊ नये म्हणून आम्ही कोणाला बोललो नाही. त्यांच्या गोटात जाऊन, तिथं काय चाललंय, हे आपल्याला नको का कळायला म्हणून त्यांच्याबरोबर राहावं लागायचं.’ सुरेशने म्हटले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘आपली फिक्स तीस मते आबांना तर दिलीच; शिवाय वीस मतेही आपण समोरच्यांची फोडली. कसल्याही परिस्थितीत आबा व आपला पॅनेल जिंकला पाहिजे, हा आमचा ध्यास होता. गावाचा विकास फक्त आबाच करू शकतात, यावर आमचा पहिल्यापासून विश्वास आहे, असे म्हणून सुरेशने खिशातून कागद काढला.
बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण
‘कोणाला किती मतदान होणार, कोणाचा पॅनेल जिंकणार, याची सगळी माहिती मी या कागदावर मतदान झाल्यानंतर लगेच लिहलीय. माझा अंदाज किती अचूक होता, हे तुम्हाला आता कळेल. प्रत्येक उमेदवाराबाबत फक्त दोन-चार मतांनी माझा अंदाज चुकला.’’ सुरेशने म्हटले.
‘सुरेशराव, निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही मघाशी एका कागदावर काहीतरी लिहीत होता, ती आकडेवारी तर ही नाही ना.’ एका कार्यकर्त्याने शंका उपस्थित केली.
पार्टनरशिपचं आमिष दाखवलं अन् पुणेकराला दोन मुंबईकरांनी लुटलं!
‘आमच्यावर एवढा अविश्वास दाखवणे बरे नाही. या कागदाला पिवळा रंग लागलेला दिसतोय ना. शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी जेजुरीच्या खंडोबाला गेलो होतो. तिथं हा कागद ठेवून यातील अंदाजाप्रमाणे सगळं घडू दे देवा, मी दानपेटीत दहा हजार रुपये टाकेन, असा नवस बोललोय.’’ सुरेशने छातीवर हात ठेवत म्हटले. त्यानंतर खिशातून त्याने आबांचा फोटो काढून दाखवला. ‘‘आबा, मतदान जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंत तुमचा फोटो रोज खिशात ठेवायचो. रोज सकाळी उठल्याबरोबर देवाबरोबरच तुम्हाला नमस्कार घालायचो. जेजुरीत तुमच्या फोटोवर भंडारा उधळून, ‘आबांना यश दे’, असा नवस बोललोय आणि तुम्ही आमच्यावर नाही नाही त्या शंका घेताय, हे बरोबर नाही.’ असे म्हणून सुरेशने डोळ्यातून पाणी काढले. त्यावर आबांनाही गलबलून आले. त्यानंतर आबांसह विजयी उमेदवारांची मिरवणूक जोरात निघाली. गाडीत आबांच्या खांद्याला खांदा लावून सुरेश उभा होता. मध्येच गुलालाची उधळण करायचा, तर कधी गाडीतून उतरून बेफामपणे नाचायचा. दोन तासांनी मिरवणुकीची सांगता झाली. एका ढाब्यावर दारू व मटण पार्टीची जय्यत तयारी झाली होती. येथेही सुरेश आघाडीवर होता. त्यातच संधी साधून त्याने दारूचे चार बॉक्स लांबवले. तेवढ्यात समोरून आबा येताना दिसले.
त्यांना त्याने वाकून नमस्कार केला. ‘आबा सगळ्यांची जेवणं व्यवस्थित चालल्यात. उद्या सकाळी जेजुरीला जाऊन, नवस फेडावा म्हणतोय. तेवढं दहा हजार रुपये ...’ सुरेशने चाचरत म्हटले. त्यावर आबाने खिशात हात घातला व शंभराची नोट त्याच्या हातावर टेकवत म्हणाले, ‘सुरेशराव, तुम्ही उद्या जेजुरीला बिनधास्त जा. फक्त आज जेवढे दारूचे बॉक्स तुम्ही घरी पोचवलेत ना. त्यातील दारू उद्या पिऊ नका. देवाला जाताना दारू कधी पिऊ नये, म्हणून म्हटले.’’ आबांच्या या वाक्यावर सुरेशने मान खाली घातली.
Edited By - Prashant Patil