esakal | तुला शिकवेन चांगलाच धडा!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

तुला शिकवेन चांगलाच धडा!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘प्राची, तू मला विसरून जा. आईवडिलांनी माझं लग्न ठरवलंय.’ खाली मान घालून अनुपने असं म्हटल्यावर प्राचीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

‘तू माझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणणार होतास ना? आता हे काय अकलेचे तारे तोडत आहेस? गेले तीन वर्षे तू काय टाइमपास म्हणून प्रेम केलेस का? आता मी माझ्या आईवडिलांना काय उत्तर देऊ?’’ प्राचीने त्रागा करीत म्हटले.

‘तुला काय सांगायचे ते सांग. इथून पुढे आपला संबंध संपला.’ अनुप तुटकपणे बोलला.

‘हे बघ, तू मला असं फसवलंस तर मी तुला चांगलाच धडा शिकवेन! ’ प्राचीने इशारा दिला.

‘तुला काय करायचे ते कर. मी कोणाला घाबरत नाही.’ बेफिकिरीने अनुप बोलला. त्यावर मात्र प्राची गप्प बसली. अनुपवर जिवापाड प्रेम केल्याचा तिला पश्चात्ताप होत होता. पण आता खूप उशीर झाला होता.

‘अनुप, मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय. माझी शेवटची आठवण म्हणून मी तुला प्रेझेंट देऊ इच्छिते. माझ्यासाठी आज थोडा वेळ काढशील’? भावनाशील होऊन प्राचीने म्हटल्यावर अनुपनेही होकार दिला. मग ते दोघेही आपापल्या गाडीवरून तुळशीबागेत आले आणि तेथील गर्दीत ते मिसळले. थोड्याच वेळात प्राचीने आरडाओरड केली.

‘गर्दीचा फायदा घेऊन, हा माणूस माझी छेड काढतोय. आधी मी दुर्लक्ष केले; पण त्याची डेअरिंग वाढतच चाललीय.’ असे म्हणून तिने अनुपच्या कानाखाली लावली. अचानक घडलेल्या या प्रकाराने अनुप भांबावून गेला.

‘काहीही काय सांगतेस. मी कधी छेड काढली....’ अनुपने बचावाचा प्रयत्न केला.

मग काय गर्दीतील चार-पाच जणांनी अनुपला ताब्यात घेतलं. ‘ताई, तुम्ही शांत राहा. काही काळजी करू नका. आम्ही बघतो पुढचं.’ असं म्हणून तीन-चार जणांनी अनुपवर हात साफ केला.

‘अहो, माझं ऐका. मी तसला मुलगा नाही. माझं लग्न ठरलंय.’ अनुपने म्हटले.

‘ताई, तुम्ही याला ओळखता? तुमच्याशी याचं लग्न ठरलंय.’ गर्दीतील एका पहिलवानाने प्राचीला विचारले.

त्यावर प्राचीने नकारार्थी मान हलवली. ‘मी याला ओळखत नाही. गेला अर्धा तास हा माझी छेड काढतोय.’ असं सांगून प्राची तेथून निघून गेली. त्यानंतर चार-पाच जण अनुपवर अक्षरशः तुटून पडले. अनुप त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण गर्दीतील कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. कसली गर्दी जमलीय म्हणून काही जण रस्त्यावरून धावत येत होते. गर्दीत टाचा वर करून, पुढे काय चाललंय ते बघायचे. एका तरुणाची धुलाई होत असल्याचे पाहून, मग तेही एक-दोन फटके लावून पुढे मार्गस्थ होत होते. मग कोणीतरी पोलिसांना बोलावले. पाचच मिनिटांत दोन पोलिस आले. त्यांनीही अनुपला काठीचा प्रसाद दिला व त्याला पोलिस चौकीत घेऊन गेले. मुलीची छेड काढतोय म्हणून त्याच्यावर फटके तर टाकलेच शिवाय आईवडिलांनाही बोलावून घ्यायला सांगितले. ‘मी काहीही केलं नाही’ असं अनुप जसजसा सांगत होता, तसंतसे त्याच्यावर फटके पडत होते. दुसऱ्या दिवशी ‘मुलीची छेड काढली म्हणून पब्लिककडून तरुणाची धुलाई’ असा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला. ‘मी शिकवीन तुला चांगलाच धडा,’ हे प्राचीचे वाक्य अनुपच्या डोळ्यासमोर रात्रभर नाचत होते.