esakal | लशीचं रडगाणं!

बोलून बातमी शोधा

Vaccination

लशीचं रडगाणं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘हा काय प्रकार आहे, तुम्ही मला लस देणार आहात की नाही, की मी स्वत:च लस टोचून घेऊ?’ जनुभाऊ टेबलवरील इंजेक्शनकडे पाहात वैतागून बोलले. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने कानात काडी घालत ‘लस संपली. उद्या या’ असे निर्विकारपणे सांगितले. ‘अहो, महिनाभर मी हे रोज ऐकतोय आणि तुम्हालासुद्धा बरोबर याच प्रश्वावर कानात काडी घालायचं कसं सुचतं? आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांना उत्तर द्यायला किमान माणूस तरी बदला आणि तेही जमत नसेल तर तुम्ही काडी तरी बदला.’ जनुभाऊंनी म्हटलं. ‘हे बघा, आधीच आमच्याकडे स्टाफ नाही. त्यामुळे माणूस बदलता येणार नाही आणि काड्यांचा प्रस्ताव वर पाठवला आहे. मंजूर झाल्यानंतर बदलू काडी.’ त्या कर्मचाऱ्याने शांतपणे कान टोकरत उत्तर दिले. त्यावर जनुभाऊ आणखी पेटले. अगदी काडेपेटीवर काडी घासल्यानंतर ती जशी पेटते, तसे पेटले. ‘तुम्ही माझ्याशी आधी नीट बोला. मीदेखील महापालिकेच्या तक्रार विभागात तीस वर्षे नोकरी केलीय. तिथं मी एकालाही खोकू दिलं नाही.

‘जा काय करायचं, ते करा. मी घाबरत नसतो कोणाला?’ हा माझा फेमस डायलॉग होता. जुन्या पुणेकरांना अजून आठवत असेल. त्यामुळे तुम्ही माझ्याशी नम्रतेने बोला.’ जनुभाऊ रागाने बोलले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये डोके खुपसले. ‘मी रोज पहाटे उठून येथे बायकोसोबत येतो. सहा वाजता रांगेत उभा राहतो. तरीही मला रोज तीनशेच्या पुढं टोकन कसं मिळतं?’ असं म्हणून जनुभाऊंनी पंचवीस-तीस टोकन त्यांच्यासमोर ओतली. यातलं एकही टोकन शंभराच्या आतलं का नाही. रांगेत तर मीच पहिला असतो, हे कोडं मला उलगडून सांगता का?’ त्यावर कर्मचाऱ्याची ‘त-त-प-प’ झाली. तरीही सावरुन तो म्हणाला, ‘आम्ही रोज तीनशेच्या पुढून मोजायला सुरुवात करतो.’ तेवढ्यात शेजारचे आजोबा तावातावाने पुढे आले. ‘अहो, ज्यांना लस द्यायची नसते, त्यांना तीनशेच्या पुढचा नंबर दिला जातो.

हेही वाचा: मद्यविक्री व्यावसायिकांकडून मद्य विक्रीसाठी नवनवीन युक्त्या

नगरसेवकांचे कार्यकर्ते व त्यांच्या घरच्यांना मात्र रांगेत न उभे राहताही लगेच लस दिली जाते. हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आता बोला ना?’ त्या आजोबांनी जनुभाऊंकडे पाहात म्हटले. त्यांचे बोलणे ऐकून जनुभाऊ भडकले. ‘अहो, तुम्ही मला काय जाब विचारताय? मी रिटायर होऊन दहा वर्षे झालीत. मोबाईलमध्ये डोके घातलेल्या त्या व्यक्तीला चांगलं झापा. त्यानंतर जनुभाऊ कर्मचाऱ्याकडे पाहात म्हणाले, ‘रांगेत उभं राहून बायकोनं दहा स्वेटर व तीस पायमोजे विणले. आता काय आख्ख्या सोसायटीचं कंत्राट घेऊ काय? मीसुद्धा रांगेत उभे राहून ज्यो बायडेन, नरेंद्र मोदी यांच्यापासून महापौरांपर्यंत ‘कोरोनापासून अर्थव्यवस्था कशी वाचवता येईल’ याबाबत पत्रे लिहून सल्ले दिलेत. पुणेकर असूनही माझे सल्ले संपले; पण लस मिळाली नाही. आता मी परत वरील सगळ्यांना पत्र पाठवून मला लस कधी मिळेल? असे विचारणार आहे.’’

जनुभाऊंनी म्हटले. तेवढ्यात तो कर्मचारी लगबगीने आत जाऊन आला व म्हणाला, ‘साहेब, तुम्हाला आता कधीच रांगेत उभे राहावे लागणार नाही.’ त्याचे हे बोलणे ऐकून जनुभाऊ सुखावले. ‘तुमचा पत्र लिहण्याचा दांडगा अनुभव लक्षात घेता, लस उपलब्ध झाल्यानंतर आम्हीच तुम्हाला पत्र टाकून बोलवणार आहोत. फक्त आमचे पत्र पाच-सहा महिने पोचत नाही, एवढ्या किरकोळ गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करावे, ही विनंती.’