मिठाचा सत्याग्रह! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
मिठाचा सत्याग्रह!

मिठाचा सत्याग्रह!

‘भाजीत मीठ काय मुठीने टाकतेस काय? किती खारट झालीय.’ परेशने आवाज चढवत म्हटले.

‘भाजी खारट झालीय, यात माझा काय दोष? तुम्हीच चांगल्या क्वालिटीचं मीठ आणलं नाही. स्वस्तातलं मीठ आणल्यास भाजी खारट होणार नाही तर काय गोड होईल का? तरी बरं तुम्ही आणलेलं मीठ मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलंय म्हणून कमी खारट झालंय.’ पल्लवीनं खुलासा केला.

‘अगं वेडाबाई! मीठ खारटच असतं. भाजीत तू मीठ जास्त टाकलंय, असं माझं म्हणणं आहे.’ परेशने संयमानं म्हटलं. ‘भाजीत मी नेहमी दोन चमचे मीठ मोजून टाकते. आजही तितकंच टाकलंय. तुम्ही आज भाजीच कमी आणली. त्याला मी काय करु?’ पल्लवीनं असं म्हटल्यावर परेशने डोक्यावर हात मारला. ‘आता इतके वर्षे तू स्वयंपाक करत आहेस. समोरच्या भाजीत किती मीठ टाकायचं, याची तुझ्या हाताला सवय का होऊ नये?’ परेशने रागानं म्हटलं. ‘माझ्या हाताला नसेल झाली सवय पण तुमच्या जिभेला सवय व्हायला काय हरकत होती? पण नाही. काही बिघडलं की दुसऱ्याला दोष द्यायची सवय कशी जाईल? म्हणून मी सारखे म्हणते, जिभेला चांगल्या सवयी लावून घ्या पण आमच्याकडं लक्ष कोण देतंय?’ पल्लवीने पलटवार केला.

‘जिभेला चांगल्या सवयी लावायच्या म्हणजे खारट, बेचव जेवण गोड मानून घ्यायचं, हेच ना? मला जमणार नाही.’ परेश ठामपणे म्हणाला. ‘तुम्हाला खाण्यपिण्याव्यतिरिक्त काही सुचतं का? जिभेला चांगल्या सवयी लावणं म्हणजे नेहमी खरं बोलावं, चांगलं बोलावं.’ पल्लवीनं म्हटलं. ‘‘मग माझ्या जिभेला चांगल्या सवयी आहेत. मी खरंच बोलतोय. भाजी खरंच खारट आहे.’ परेशने सांगितले. ‘‘तुम्ही फिरून फिरून तिथंच येताय. तुम्हाला नावं ठेवण्याशिवाय दुसरं येतंय का? तुम्ही भाजी खारट आहे, असं सांगितल्यावर मी भाजीचा फोटो लगेच फेसबुकवर टाकला. आतापर्यंत साठ लाईक व चाळीस कमेंट आल्या आहेत. ‘किती छान भाजी आहे’, ‘काय चविष्ट भाजी आहे’, ‘आम्हाला अशी भाजी करायला शिकवा ना’ अशा कमेंट्स आहेत. मी केलेली भाजी खाण्यासाठी लोकं तडफडतायत आणि त्याच भाजीला तुम्ही नावं ठेवताय? कमेंट करणारी चाळीस माणसं काय वेडी आहेत आणि तुम्हीच एकटे शहाणे?’ पल्लवीने रागाने म्हटले. त्यावर परेश शांत बसला.

थोड्यावेळाने शेजारच्या सुमनवहिनींनी पावभाजीचे ताट आणले. ते पाहून परेशचा चेहरा खुलला. त्याने लगेचच मिटक्या मारत पावभाजी खायला सुरवात केली. ‘याला म्हणतात चव...व्वा वहिनी व्वाऽऽ ! तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात. तुम्ही भाजीत मीठ कसं टाकता?’ परेशने निरागसपणे विचारलं. पण या प्रश्नानं दुधात मिठाचा खडा पडला होता. त्यानंतर वहिनींनी भाजीत मीठ टाकायची त्यांची पद्धत सांगितली. वहिनी गेल्यानंतर परेश पल्लवीला म्हणाला, ‘भाजी अशी चवदार झाली पाहिजे. खारट नाही की अळणी नाही. भाजीत मीठ कसे आणि किती टाकावे, हे वहिनींकडून शिकून घे.’ त्यावर दातओठ खात पल्लवीने होकार दिला.

दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजले तरी पल्लवीने जेवण न वाढल्याने त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले. त्यानं ताट करण्यास सांगितलं. त्यावर पल्लवी शांतपणे म्हणाली, ‘‘तुम्ही काल सांगितल्यानुसार, भाजीत मीठ कसे आणि किती टाकायचे, याबाबतचा क्लास वहिनींकडे लावलाय. त्यांच्याकडं आठवडाभर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुमच्यासाठी परिपूर्ण स्वयंपाक करू शकेल. त्यामुळं फक्त एक आठवडा तुम्ही बाहेर जेवत चला.’’ गेल्या दोन-तीन दिवसांपासून परेश कधी हॉटेलमध्ये तर कधी वडा-पाव खात दिवस काढतोय. ‘यापेक्षा बायकोच्या हातचं खारट जेवण परवडलं’, असं म्हणत तो हल्ली आठवड्याचे दिवस मोजतोय.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 18th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top